LokSabha: भाजपाने उमेदवारी नाकरल्याने ज्येष्ठ नेत्याने राजकारणातून घेतला संन्यास, म्हणाले ‘आता यापुढे…’

( प्रगत भारत । pragatbharat.com)

लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाने पहिल्या उमेदवारांची यादी जाहीर केलेली असताना दुसरीकडे काही नेते पक्षापासून दूर जात असल्याचं दिसत आहे. एकीकडे गौतम गंभीर आणि जयंत सिन्हा यांनी तर उमेदवारांची यादी जाहीर होण्याआधीच सक्रीय राजकारणात रस नसून, आपल्याला जबाबदारीतून मुक्त करण्याची विनंती केली होती. दरम्यान या यादीत आणखी एका नावाची भर पडली आहे. डॉक्टर हर्षवर्धन यांनी राजकारणातून संन्यास घेत असल्याची घोषणा केली आहे. भाजपाने शनिवारी ज्या उमेदवारांची नावं जाहीर केली, त्यातून हर्षवर्धन यांना वगळलं होतं. यानंतर दुसऱ्याच दिवशी त्यांनी एक्सवर पोस्ट शेअर करत राजकारणापासून दूर जाण्याचा निर्णय घेत असल्याची माहिती दिली आहे. 

डॉक्टर हर्षवर्धन यांनी एक्सवर सविस्तर पोस्ट लिहिली असून, 30 वर्षातील आपल्या कामगिरीबद्दल सांगितलं आहे. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांचे आभार मानले आहेत. 

केंद्रीय आरोग्यमंत्री पद भूषवणारे डॉक्टर हर्षवर्धन सध्या चांदणी चौक लोकसभा मतदारसंघातून खासदार आहेत. पण भाजपाने आगामी 2024 लोकसभा निवडणुकीत त्यांना वगळलं आहे. भाजपाने हर्षवर्धन यांच्या जागी प्रवीण खंडेलवाल यांना चांदणी चौकातून उमेदवारी दिली आहे. 

“तीस वर्षांच्या गौरवशाली कारकिर्दीनंतर, ज्या दरम्यान मी सर्व पाच विधानसभा आणि दोन संसदीय निवडणुका लढल्या. या निवडणुका मी मोठ्या फरकाने जिंकल्या आणि पक्ष संघटनेत आणि राज्य आणि केंद्रातील सरकारांमध्ये अनेक प्रतिष्ठित पदे भूषवली, शेवटी मी माझ्या मुळांकडे परत जाण्यासाठी तुमची परवानगी मागत आहे,” असं माजी केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन म्हणाले आहेत.

“मला आता पुढे जायचं आहे, मी वाट पाहू शकत नाही. मला आश्वासनांची पूर्तता करायची आहे. मला बराच प्रवास करायचा आहे. माझं एक स्वप्न आहे आणि तुमचे आशीर्वाद माझ्यासह आहेत याची मला कल्पना आहे. कृष्णानगरमधील माझं क्लिनिक मी परत येण्याची वाट पाहत आहे,” असं डॉक्टर हर्षवर्धन म्हणाले आहेत. 

लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांच्या पहिल्या यादीत, भाजपाने दिल्लीतील चार विद्यमान खासदार परवेश वर्मा, रमेश बिधुरी, मीनाक्षी लेखी आणि हर्षवर्धन यांना डावलून मोठी पुनर्रचना जाहीर केली. पक्षाने त्यांच्या मतदारसंघात नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे. तत्कालीन आरएसएस नेतृत्वाच्या सांगण्यावरूनच आपण निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली होती असं हर्षवर्धन यांनी सांगितलं. माझ्यासाठी राजकारण म्हणजे गरिबी, रोग आणि दुर्लक्ष या प्रमुख शत्रूंशी लढण्याची संधी असल्याने मी तयार झालो होतो असंही त्यांनी सांगितलं. 

“मी दिल्लीचा आरोग्य मंत्री तसंच दोनदा केंद्रीय आरोग्य मंत्री म्हणून काम केले. हा माझ्यासाठी फार जवळचा विषय आहे. मला एक दुर्मिळ संधी मिळाली होती, ज्यामध्ये पोलिओमुक्त भारत निर्माण करायचा होता. तसंच दुसऱ्या टप्प्यात कोविड-19 चा सामना करणाऱ्या आपल्या लाखो देशवासीयांच्या आरोग्याची काळजी घ्यायची होती,” असं सांगत त्यांनी आपला प्रवास उलगडला.

भाजपने आपल्या पहिल्या यादीत विविध जागांवर 33 विद्यमान खासदारांच्या जागी नवीन चेहरे आणले आहेत.

Related posts