पतीने पत्नीला केलं ठार, मृतदेह ओढत नेत असतानाच मुलाने पाहिलं अन् त्यानंतर…

( प्रगत भारत । pragatbharat.com)

दिल्लीत एका 52 वर्षीय व्यक्तीने आपल्या पत्नीची हत्या केली आहे. पत्नीने कामावर जाण्याला पतीचा विरोध होता. यावरुन भांडण झालं असता पतीने गळा दाबून पत्नीची हत्या केली अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. जोडप्याच्या मुलाने पोलिसांना माहिती देताना सांगितलं की, मंगळवारी रात्री आई-वडिलांमध्ये भांडण झालं होतं. वडिलांनी रात्री मला आवाज दिल्यानंतर मी पहिल्या माळ्यावरील माझ्या खोलीतून खाली आलो असता, ते बाथरुमधून आईचा मृतदेह खेचत बाहेर आणत होते. 

मुलगा आकाशने विचारणा केली असता आरोपी वेद प्रकाश याने आपण दुपट्ट्याने गळा दाबून हत्या केल्याची कबुली दिली. यानंतर आरोपी वेद प्रकाश आपल्या मुलासह दुसऱ्या दिवशी मृतदेह घेऊन रुग्णालयात गेले. रुग्णालयाने महिलेचा मृत्यू एक दिवस आधीच झाला असल्याचं म्हटलं. यानंतर रुग्णालय प्रशासनाने पोलिसांना कळवलं. महिलेचा गळा दाबलेला होता. तसंच तिच्या शरिरावर जखमांच्या खुणा होत्या अशी माहिती रुग्णालयातील अधिकाऱ्याने दिली आहे. 

अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, “मुलाने आम्हाला सांगितलं की तो घराच्या पहिल्या मजल्यावर राहतो. तर त्याचे आई-वडील तळमजल्यावर राहतात. आई कामावर जात असल्याने वडिलांचा विरोध होता आणि यावरुन त्यांच्यात नेहमी भांडण होत होतं”.

पोलिसांनी आकाशच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, त्याच्या आईने वडिलांविरोधात पोलीस ठाण्यात घऱगुती हिंसाचाराची तक्रारही दाखल केली होती. साकेत जिल्हा न्यायालयात याप्रकरणी सुनावणी सुरु होती. पण मुलाच्या लग्नावेळी दबाव असल्याने त्यांनी खटला मागे घेतला होता. 

आकाशने पोलिसांना सांगितलं की, मंगळवारी रात्री आई रात्री कामावर गेली असल्याने वडील तिच्याशी भांडत होते. बुधवारी सकाळी 6 वाजता वडिलांनी मला फोन केला. “आकाश तळमजल्यावर गेला असता वडील आईला बाथरुममधून खेचत बाहेर आणत होते. त्यावेळी आई बेशुद्ध दिसत होती असं आकाशचं म्हणणं आहे. जेव्हा त्याने वडिलांना विचारणा केली तेव्हा त्यांनी भाडंण झालं असता मी दुपट्ट्याने गळा दाबून तिला ठार केलं आणि नंतर मृतदेह बाथरुममध्ये ठेवल्याची कबुली दिली,” अशी माहिती पोलीस अधिकाऱ्याने दिली आहे. 

यानंतर बुधवारी सकाळी आरोपी वडील आणि मुलगा मृतदेह घेऊन रुग्णालयात पोहोचले होते. पोलिसांना चौकशीनंतर आरोपी पतीला अटक केली असून जेलमध्ये रवानगी केली आहे. 

Related posts