( प्रगत भारत । pragatbharat.com)
Weather Update : अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळं चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण होऊन त्याचं चक्रीवादळात रुपांत होण्याची शक्यता वर्तवण्यात आली. आयएमडीनं वर्तवलेल्या शक्यतेनुसार प्रथमत: हे वादळ मुंबई आणि गुजरातच्या दिशेनं येईल असा इशारा देण्यात आला होता, पण या वादळानं दिशा बदलली आणि शहरावरचं संकट टळलं.
कमी दाबाच्या पट्ट्यामुळं मागील 24 तासांमध्ये अंदमान, निकोबार, तामिळनाडू आणि केरळात, पावसानं अंशत: हजेरी लावली. तर, इथं महाराष्ट्रात ऑक्टोबर हिटचा तडाखा वाढताना दिसला. पुढील काही दिवसांसाठीसुद्धा महाराष्ट्रात हवामानाची अशीच परिस्थिती राहणार असून, मधूनच काही ठिकाणी परतीच्या पावसाच्या तुरळक सरींचा वर्षाव होऊ शकतो. नव्यानं समोर आलेल्या हवामान वृत्तानुसार मागील काही तासांमध्ये 6 किमी प्रतीतास इतक्या वेगानं वारे उत्तर पश्चिमेला वळले आणि हवामानात मोठे बदल झाले.
सध्या बंगालच्या उपसागरामध्ये पूर्व आणि उत्तर पूर्व दिशेला वारे वाहत असून, पूर्वोत्तर मान्सून पुढील 48 तासांमध्ये दारावर उभा ठाकू शकतो. त्यातच एक पश्चिमी विक्षोभ 21 ऑक्टोबरला रात्रीच्या सुमारास उत्तर पश्चिम भारताच्या दिशेनं येण्याची शक्यता आहे. त्यामुळं देशाच्या काही भागांमध्ये पाऊस, काही भागांमध्ये उन्हाचा तडाखा आणि काही भागांमध्ये हिवाळ्याची चाहूल असं एकंदर संमिश्र हवामान पाहायला मिळणार आहे.
कसं असेल पुढील 24 तासांमधीस हवामान?
पुढील 24 तासांमध्ये अंदमान, निकोबार बेट समूह आणि केरळातील काही भागांमध्ये हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कर्नाटक, आंध्र प्रदेश, सिक्कीम, आसाम, मेघालय आणि पश्चिमी राजस्थानमधील काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर, पुढाल 2 ते 3 दिवसांमध्ये पंजाब, हरियाणा आणि पश्चिम हिमालयातील काही भागांमध्येही पावसाची शक्यता आहे.
हिमाचल आणि उत्तराखंडसह जम्मू काश्मीरच्या मैदानी भागांमध्ये पावसाच्या तुरळक सरी बरसणार असून, पर्वतीय क्षेत्रांमध्ये मात्र बर्फवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ज्यामुळं या भागांमध्ये येणाऱ्या पर्यटकांना निसर्गाचं वेगळं रुप अनुभवता येणार आहे.