फ्रीजमधून पाण्याची बाटली काढली, १४ वर्षांच्या मुलावर झाडली गोळी, तपासात समोर आलं वेगळंच सत्य

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Shop Owner Killed 14 Year Old Boy: एका १४ वर्षांच्या मुलाची पाठीत गोळी झाडून हत्या करण्यात आली आहे. सायरस कारमॅक बेलटन असं मयत तरुणाचे नाव असून अमेरिकेतील (America) दक्षिण कॅरोलिना शहरातील ही घटना आहे. आरोपीचे किराणा मालाचे दुकान आहे. रविवारी रात्री एका संशयातून दुकानदाराने १४ वर्षांच्या मुलाची हत्या केली आहे. या घटनेने परिसरात संतापाचे वातावरण पसरले होते. 

एका संशयावरुन हत्या

रविवारी रात्री १४ वर्षांच्या मुलाने दुकानातील फ्रीजमधील पाण्याच्या चार बॉटल चोरल्या असल्याचा संशय दुकानदाराला होता. याचाच राग मनात ठेवून त्याने मुलावर गोळ्या झाडल्या, असं पोलिसांनी म्हटलं आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, सायरसने पाण्याच्या बॉटल चोरल्या नव्हत्या तर दुकानातील फ्रीजमध्ये पुन्हा नेऊन ठेवल्या होत्या. त्यानंतर तो दुकानातून पळून जात असताना त्याची हत्या करण्यात आली. 

आरोपीकडून अटक

पोलिसांनी आरोपी रिक चाऊला अटक केली असून त्याच्यावर हत्येचा खटला दाखल करण्यात आला आहे. त्याला न्यायालयातदेखील हजर करण्यात आले आहे. दरम्यान, मयत मुलाच्या मृतदेहाजवळून बंदुकही जप्त करण्यात आली आहे. तर, या गुन्ह्यात चाऊचा मुलगादेखील सहभागी असल्याचा पोलिसांना संशय आहे. त्यानेच त्याच्या वडिलांना सायरसकडे शस्त्र असल्याचं त्याने म्हटलं होतं. मात्र, पोलिस तपासात सायरसने चाऊ किंवा त्याच्यामुलावर हल्ला केल्याचे कोणतेही पुरावे सापडले नाहीत.

आरोपीविरोधात गुन्हा दाखल

आरोपी चाऊकडे बंदूकीचा परवाना आहे. तसंच, मयत सायरसच्या पाठीत गोळी झाडल्याचे शवविच्छेदन अहवालात समोर आलं आहे. त्यानंतर आरोपीविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस अधिकारी लियॉन लॉट, यांनी म्हटलं आहे की, सायरसने चार बॉटल घेतल्या होत्या, त्याने सुरुवातीला फ्रीजमधून बॉटल काढल्या आणि नंतर पुन्हा फ्रीजमध्ये ठेवून दिल्या. सायरसचा गुन्हा इतकाही मोठा नव्हता की त्याच्यावर गोळी झाडण्यात यावी, तो फक्त १४ वर्षांचा मुलगा होता. 

आरोपीविरोधात संतप्त नागरिकांचे आंदोलन

दरम्याम, परिसरात गोळीबाराची घटना घडल्यानंतर नागरिक संतप्त झाले आहेत. चाऊच्या दुकानाबाहेर लोकांनी आंदोलन करत दुकानाची तोडफोड केली आहे. पोलिसांना याबाबत माहिती मिळताच त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी काही जण चाऊच्या दुकानातील सामान चोरी करत निघून जात होते. पोलिसांनी यांच्याविरोधातही गुन्हा दाखल केला आहे. 

दक्षिण कॅरोलिनाच्या नियमानुसार, एखाद्याला समोरील व्यक्तीकडून धोका वाटत असेल तर धोका टाळण्याचा कोणताच मार्ग नसेल तरच एखादी व्यक्ती स्वसंरक्षणासाठी गोळी झाडू शकते, असं पोलिसांनी सांगितलं आहे. 

Related posts