( प्रगत भारत । pragatbharat.com)
WeWork Company in Bankruptcy: अमेरिका, कॅनडासह भारतातील विविध राज्यांमध्ये काम करणारी मोठी कंपनी दिवाळखोरीत निघाली आहे. याचा परिणाम कंपनीचे ग्राहक तसेच कर्मचाऱ्यांवर होणार आहे. ऐन दिवाळीतच कंपनीने ही घोषणा केल्याने अमेरिकेतील कर्मचाऱ्यांना मोठा धक्का बसला आहे. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
ऑफिस शेअरिंग कंपनी WeWork ने दिवाळखोरीत निघाली आहे. ही कंपनी मोठ्या कालावधीसाठी जागा भाड्याने घेते. त्यानंतर इतर ऑफिसेसना कमी कालावधीसाठी जागा भाड्याने देते. पण कोरोना काळानंतर कंपनीचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात गडगडला. सोमवारी न्यू जर्सी फेडरल कोर्टात कंपनीने दिवाळखोर घोषित करण्यासाठी अर्ज दाखल केला. कंपनीने आपल्या सुरक्षित फायनान्सर्सच्या बहुमतानुसार एक करार केला आहे. “नॉन-ऑपरेटिंग” लीज संपुष्टात आणणे हा यामागचा हेतू असल्याचे सांगण्यात आले.
सॉफ्टबँकने गुंतवणूक केलेली सहकारी कंपनी WeWork सध्या वाईट काळातून जात आहे. कर्ज आणि मोठ्या तोटा यामुळे कंपनीचे दिवाळे निघाले आहे. जूनच्या अखेरीस, Wework कडे निव्वळ दीर्घकालीन कर्जाचे $2.9 अब्ज आणि दीर्घकालीन भाडेपट्ट्यांमध्ये $13 अब्जाहून अधिक होते. 2019 मध्ये, WeWork चे खासगी मूल्यांकन $47 अब्ज होते. या वर्षी कंपनीचे शेअर्स सुमारे 96 टक्क्यांनी घसरले आहेत. कंपनीसाठी ही चिंतेची बाब आहे. त्यामुळे स्वत:ला दिवाळखोर घोषिक करवून घेण्याचा पर्याय कंपनीकडे उरला आहे.
2019 मध्ये ‘वुई वर्क’ने पब्लीक कंपनी झाल्याची योजना जाहीर केली. पण तेव्हापासून कंपनीत काही ठिक सुरु नाही. मागच्या 4 वर्षाच्या काळात कंपनीत मोठ्या प्रमाणात उलधापालथ झाली. कंपनीचा ग्राहक दूर गेला, व्यवसाय गडगडला. तेव्हापासून कंपनी अस्थिरतेचा सामना करत आहे.
मोठ्या कालावधीसाठी भाड्याने जागा घेण्याच्या आणि अल्प मुदतीसाठी भाड्याने देण्याचे वुई वर्क कंपनीचे व्यावसायिक मॉडेल आहे. यामुळे गुंतवणूकदारांचा आधीच WeWork वर कमी विश्वास होता. मोठ्या नुकसानीच्या चिंतेने परिस्थिती आणखी बिकट झाली.
2021 मध्ये वुई वर्क कंपनी अत्यंत कमी मूल्यांकनात सार्वजनिक कंपनी होण्यात यशस्वी झाली.
भारतामध्ये परिणाम नाही
WeWork India मध्ये एम्बेसी ग्रुपचा 73 टक्के हिस्सा आहे. तर WeWork ग्लोबलचा 27 टक्के हिस्सा आहे. WeWork India ची भारतातील 7 शहरांमध्ये 50 केंद्रे आहेत. मुंबई आणि पुण्यासह नवी दिल्ली, गुरुग्राम, नोएडा, बेंगळुरू आणि हैदराबाद या शहरांमध्ये कंपनीच्या ब्रांच आहेत.व्यवसायाची आर्थिक गणिते सुधारण्यासाठी वुई वर्क ग्लोबलने अमेरिकेसाठी हा निर्णय घेतला आहे. वुई वर्क इंडिया ही वुई वर्क ग्लोबलपेक्षा स्वतंत्रपणे काम करते आणि आमच्या ऑपरेशन्सवर कोणत्याही प्रकारे परिणाम होणार नाही, असे स्पष्टीकरण वुई वर्क इंडियाचे सीईओ करण विरवनी यांनी दिले आहे. वुई वर्क इंडिया ही स्वतःच एक वेगळी संस्था आहे आणि आम्ही या धोरणात्मक पुनर्रचना प्रक्रियेचा भाग नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.