( प्रगत भारत । pragatbharat.com)
Cyclone Michaung : बंगालच्या उपसागरामध्ये तयार झालेल्या मिचौंग या चक्रीवादळाचे थेट परिणाम देशाच्या दक्षिणेकडे असणाऱ्या राज्यांमध्ये अगदी स्पष्टपणे दिसू लागले आहेत. तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशात या वादळामुळंएकच विध्वंस पाहायला मइळत आहे. तर, चेन्नईमध्ये अतिमुसळधार पावसानं पाचजणांचा बळी घेतला आहे. देशावर घोंगावणाऱ्या या मिचौंग चक्रीवादळामुळं आणि नव्यानं सक्रिय असणाऱ्या पश्चिमी झंझावातामुळं तामिळनाडूपासून थेट दिल्लीपर्यंत पावसाचं सावट आहे. तुलनेनं दक्षिण भारतात पावसाचं आणि वादळाचं रौद्र रुप पाहायला मिळत असून, नागरिकांना धडकी भरली आहे.
चक्रीवादळाच्या धर्तीवर तामिळनाडू, आंध्र प्रदेश, ओडिशा, पश्चिम बंगालला हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तर, उत्तर प्रदेश आणि झारखंडमध्येही होणाऱ्या हवामान बदलांच्या रुपात या वादळाचे परिणाम दिसून येत आहेत.
देशाच्या दक्षिण किनारपट्टीला प्रभावित करणाऱ्या चक्रीवादळामुळं सध्या इतर राज्यांतील तापमानातही बरेच चढउतार पाहायला मिळत आहेत. भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या माहितीनुसार याच्या परिणामस्वरुप पुढील तीन ते चार दिवसांसाठी हवामान अस्थिर असेल. तर, काही राज्यांमध्ये पावसाची हजेरी पाहायला मिळेल. 5 डिसेंबर (मंगळवारी) हे चक्रीवादळ नेल्लोर आणि आंध्र प्रदेशच्या दक्षिण किनारपट्टीवरून पुढे सरकणार असल्यामुळं थेट मिर्झापूर, वाराणासीपर्यंत पावसाची हजेरी असेल.
महाराष्ट्रावर काय परिणाम?
मिचौंग चक्रीवादळामुळं महाराष्ट्राच्या किनारपट्टी भागाला थेट धोका नसला तरीही सावधगिरी म्हणून यंत्रणांनी मासेमारांना खोल समुद्रात न जाण्याचा इशारा दिला आहे. राज्याच्या विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये पुढील 24 तासांत विजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी असेल. इथं पावसाची शक्यता पाहता हवामान विभागानं यलो अलर्ट जारी केला आहे. दरम्यान राज्यातील तापमानातही यामुळं चढ उतार पाहायला मिळणार आहेत. (Maharashtra Weather News)
देशाच्या उत्तरेकडे असणाऱ्या राज्यांवर हे चक्रीवादळ फारसा परिणाम करताना दिसणार नाही. मात्र जम्मू, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश या राज्यांच्या मैदानी क्षेत्रांमध्ये मात्र पावसाची हजेरी असेल. तर, डोंगररांगांवर जोरदार बर्फवृष्टी होणार आहे. काश्मीरच्या खोऱ्यात अती बर्फवृष्टीमुळं वाहतुकीसह जनजीवनही विस्कळीत होत असल्याचं चित्र सध्या समोर येत आहे. पुढील दोन दिवस हीच परिस्थिती कायम राहणार असून, इथं थंडीचा कडाका वाढेल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.