डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची वंशवेल, जाणून घ्या कोण आहेत कुटुंबातील सदस्य

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Mahaparinirvan Din 2023: दरवर्षी 6 डिसेंबर रोजी भारतीय राज्यघटनेचे जनक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पुण्यतिथी साजरी केली जाते. थोर समाजसुधारक आणि विद्वान म्हणून ओळखले जाणारे डॉ. भीमराव आंबेडकर यांनी 6 डिसेंबर 1956 रोजी अखेरचा श्वास घेतला, म्हणून त्यांची पुण्यतिथी हा ‘महापरिनिर्वाण दिवस’ म्हणून साजरा केला जातो. त्यांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी मध्य प्रदेशातील महू या छोट्या गावात झाला. त्यांचा जन्म महार जातीत झाल्यामुळे लोक त्यांना अस्पृश्य आणि खालच्या जातीतील मानत होते. यामुळे त्यांना आयुष्यात अनेक समस्यांना सामोरे जावे लागले. सामाजिक भेदभाव, जातीयवाद आणि अस्पृश्यतेचा सामना करणाऱ्या भीमराव आंबेडकरांनी आपले संपूर्ण आयुष्य समाजातील गरीब, दलित आणि मागासवर्गीयांच्या उन्नतीसाठी समर्पित केले. समाजातील अस्पृश्यता, जातिवाद, भेदभाव यांसारख्या दुष्कृत्यांचा अंत करण्यासाठी त्यांनी अनेक चळवळीही केल्या.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे त्यांच्या काळातील राजकारणी होते जे सामाजिक कार्यात व्यस्त असूनही वाचन आणि लेखनासाठी वेळ काढत. आजच्या दिवशी बाबासाहेबांचे स्मरण केले जाते आणि त्यांच्या पुण्यतिथी म्हणजेच महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांना आदरांजली वाहिली जाते. अशा वेळी आपण त्यांच्या कुटुंबाची वंशावेळ जाणून घेऊया. 

मूळ गाव 

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे (सकपाळ) कुटुंब हे मूळचे कोकणातील “आंबडवे” गावचे रहिवासी होते. बाबासाहेबांचे आजोबा मालोजी सकपाळ हे भारतीय ब्रिटिश सैन्यात सैनिक म्हणून कार्यरत होते. त्यांचा मुलगा म्हणजे बाबासाहेबांचे वडिल रामजी हे सुद्धा भारतीय ब्रिटिश सैन्यात सुभेदार पदावर कार्यरत होते. रामजी व त्यांच्या पत्नी भीमाबाई यांचा सर्वात लहान पुत्र भीमराव म्हणजे आपले डॉ. बाबासाहेब आंबेडकर.

(हे वाचा – महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रेरणादायी विचार)

पहिली पिढी

मालोजी सकपाळ आणि आयु सकपाळ हे बाबासाहेबांचे आजोबा. हे भारतीय ब्रिटिश सैन्यात शिपाई होते. मालोजी इंग्लिश राजसत्तेच्या सैन्यात शिपाई म्हणून भरती झाले होते. सैन्यातील नोकरीमुळे मालोजीराव सैनिकी शाळेत शिक्षण घेऊ शकले. त्यांनी रामानंद पंथाची दीक्षा घेतली होती

दुसरी पिढी

आजोबा मालोजींना ४ मुले व १ मुलगी होती. त्यांची माहिती जाणून घेऊया. 
मिराबाई मालोजी सकपाळ – डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आत्या, ती अपंग होती व माहेरी राहत. बाळ भिवाचा मिराबाईने सांभाळ केलेला आहे.
रामजी मालोजी सकपाळ (१८३८-१९१३)  – भारतीय ब्रिटिश सैन्यात सुभेदार पदावर व नंतर सैनिक शिक्षक म्हणून कार्य, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे वडील होते.
भीमाबाई रामजी सकपाळ ( १८९६) – रामजींची पत्नी व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आई. 
जीजाबाई रामजी सकपाळ – रामजींची दुसरी पत्नी, व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची सावत्र आई

(हे पण वाचा – आपल्या मुलांना देऊ शकता डॉ. बाबासाहेबांच्या कुटुंबातील नावं; जाणून घ्या त्यांचा अर्थ)

तिसरी पिढी 

रामजी मालोजी सकपाळ आणि भीमाबाई रामजी सकपाळ यांचा शेवटचा मुलगा म्हणजे आपले डॉ. बाबासाहेब आंबेडकर. डॉ. बाबासाहेब आंबेडकर व रमाबाई यांना एकूण पाच अपत्ये झाली होती.  यशवंत, गंगाधर, राजरत्न, रमेश व इंदू (मुलगी). यशवंत खेरीज इतर चार अपत्ये त्यांच्या वयाची दोन वर्षे पूर्ण होण्याच्या आतच दगावली. एकटा यशवंत आंबेडकर (भैयासाहेब आंबेडकर) बाबासाहेबांचा वंशज म्हणून जगला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना दुसऱ्या पत्नी सविता आंबेडकरांपासून (माईसाहेब) एकही अपत्ये झाले नाही. सविता आंबेडकरांना एकदा गर्भधारणा झाली होती मात्र नंतर गर्भपात झाला.

यशवंत आंबेडकरांचा विवाह मीरा आंबेडकर यांचेशी झाला. मीराबाई पासून त्यांना एकूण चार अपत्ये झाली. त्यांची नावे पुढील प्रमाणे : प्रकाश (बाळासाहेब), रमाबाई, भीमराव व आंनदराज. यशवंतरावांचे निधन झालेले असून मीरा व त्यांची चारही अपत्ये सध्या हयात आहेत.

प्रकाश आंबेडकरांचे लग्न अंजली यांचेशी झाले असून त्यांना सुजात हा एक मुलगा आहे. तर रमाबाईंचा विवाह प्राध्यापक व अभ्यासक आनंद तेलतुबंडे यांचेशी झालेला असून त्यांना दोन मुली आहेत, पैकी एक विदेशात शिकते तर दुसरीचे लग्न झालेले आहे. भीमराव यांना एक मुलगी आहे व आनंदराज यांनाही दोन मुलगे आहेत, जी लहान असून शालेय-महाविद्यालयीन शिक्षण घेत आहेत. आंबेडकर कटुंबातील हे सर्व सदस्य वेगवेगळ्या क्षेत्राशी निगडीत आहेत, मात्र राजकारण-समाजकारण व आंबेडकरवादी चळवळीशी, तसेच बौद्ध चळवळीशी सर्वजन कमी अधिक प्रमाणात जोडलेले आहेत.

Related posts