Viral Video: सिगारेटवरुन सेक्युरिटी गार्ड्स आणि विद्यार्थ्यांमध्ये तुफान राडा; रस्त्यावर अक्षरश: दंगल

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Viral Video: ग्रेटर नोएडा (Greater Noida) येथील गौतम बुद्ध युनिव्हर्सिटीत तुफान राडा झाला आहे. विद्यार्थी आणि सुरक्षारक्षकांमध्ये यावेळी जबरदस्त हाणामारी झाली. या हाणामारीचा व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल (Viral Video) झाला आहे. पोलिसांनी याप्रकरणी 33 खासगी सुरक्षा रक्षक आणि काही विद्यार्थ्याना ताब्यात घेतलं आहे. 

पोलीस प्रवक्त्याने पीटीआयला दिलेल्या माहितीनुसार, काही विद्यार्थी धुम्रपान करत असताना सुरक्षारक्षकांनी त्यांना रोखलं. यानंतर युनिव्हर्सिटी कॅम्पसमधील मुन्शी प्रेमचंद वसतिगृहात (Munshi Premchand Hostel) हा वाद झाला. “रविवारी रात्री 10.30 वाजता दोन्ही बाजूंमध्ये शाब्दिक वाद झाला. यानंतर ते आपापसात भिडले. घटनास्थळी पोहोचल्यानंतर याप्रकरणी 33 जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. पोलिसांनी दोन्ही बाजूंची तक्रार दाखल करुन घेतली असून तपास केला जात आहे,” अशी माहिती पोलीस प्रवक्त्याने दिली आहे. 

ताब्यात घेण्यात आलेल्यांमध्ये खासगी सुरक्षारक्षक आणि विद्यार्थी आहेत. अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, हे सर्वजण राड्यात सहभागी होते. यामध्ये विद्यार्थी किती आणि सुरक्षारक्षक किती आहेत हे मात्र समजू शकलेलं नाही. दरम्यान, सुरक्षा कर्मचाऱ्याने आपल्या पाच सहकाऱ्यांना बोलावून मारहाण केली असा विद्यार्थ्यांचा आरोप आहे. मारहाणीत 15 विद्यार्थी जखमी असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. 

इकोटेक 1 पोलिस स्टेशन परिसरात घडलेल्या या प्रकरणाची वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून चौकशी केली जात असून आणखी लोकांना ताब्यात घेतले जाऊ शकते, असं प्रवक्त्याने सांगितलं आहे. 

या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत काहीजण हातात काठ्या घेऊन दिसत आहेत. काठीच्या सहाय्याने दुचाकी, चारचाकींच्या काचा फोडत असल्याचं दिसत आहे. तसंच परिसरात सगळीकडे धावपळ सुरु असल्याचं दिसत आहे. 

पोलीस याप्रकरणी चौकशी करत असून, दोषींविरोधात कडक कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. 

विद्यार्थ्यांचा दावा काय?

एक विद्यार्थी धुम्रपान करत असताना हॉस्टेलच्या सुरक्षा कर्मचाऱ्याने त्याला रोखलं. यावरुन दोघांमध्ये वाद झाला. दोघांमध्ये हाणामारीदेखील झाली. यानंतर सुरक्षा कर्मचाऱ्याने आपल्या पाच सहकाऱ्यांना बोलावलं. हॉस्टेलमधील इतर विद्यार्थीही यावेळी गोळा झाले होते. यानंतर सगळेच आपापसात भिडले. यावेळी लाठ्या-काठ्यांनी मारहाण केली. सुरक्षा कर्मचाऱी लाठ्या घेऊन रुममध्ये घुसले आणि मारहाण करत गंभीर जखमी केलं असा विद्यार्थ्यांचा आरोप आहे. 

Related posts