( प्रगत भारत । pragatbharat.com)
Lok Sabha Speaker On Parliament Security Breach: संसदेच्या सुरक्षेमध्ये त्रुटी निर्माण झाल्याची धक्कादायक घटना घडल्यानंतर लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सर्व खासदारांना उद्देशून एक निवेदन सादर केलं. खासदारांनी घाबरुन जाण्याची गरज नाही असं ओम बिर्ला सर्व खासदारांना आश्वस्त करताना म्हणाले. संसदेमध्ये या गोंधळादरम्यान दिसलेला धूर हा सर्वसाधारण धूर असल्याचंही ओम बिर्लांनी सांगितलं. तसेच या प्रकरणाचा प्राथमिक तपास सुरु करण्यात आला आहे. संसदेची कारवाई पुन्हा सुरु झाल्यानंतर ओम बिर्ला यांनी या साऱ्या प्रकरणाचा तपास सुरु झाला असून तपासाअंतर्गत जे काही समोर येईल ती माहिती संसदेच्या सदस्यांबरोबर मी स्वत: शेअर करेल असा शब्द ओम बिर्लांनी दिला आहे. खासदारांनी त्यांना खटकत असलेल्या गोष्टींबद्दल मला कळवलं आहे. मात्र सध्या कोणतीही चिंता करण्याची गरज नाही असं ओम बिर्ला म्हणाले.
अटकेबद्दल काय म्हणाले ओम बिर्ला?
ओम बिर्ला यांनी संसदेच्या सभागृहात घुसखोरी करणाऱ्या दोन्ही संशयितांना अटक करण्यात आल्याची माहिती दिली. संसदेच्या बाहेरही दोघांना अटक करण्यात आली. ओम बिर्ला यांनी संसदेच्या सभागृहामध्ये उडी मारणाऱ्यांना दोघांना अटक करुन त्यांच्याकडील सर्व सामान ताब्यात घेतलं आहे. संसदेबाहेर आंदोलन करणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली आहे.
नक्की घडलं काय?
लोकसभेचं हिवाळी सत्र सुरु असतानाच बुधवारी दुपारी एक ते दीड वाजण्याच्या सुमारस एकच खळबळ उडाली जेव्हा दर्शक गॅलरीमधून 2 तरुणांनी संसदेच्या सदनातील हॉलमध्ये उडी मारली. यानंतर संसदेचं कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत स्थगित करण्यात आलं. संसदेच्या शून्य प्रहारामध्ये दुपारी एकच्या आसपास 2 व्यक्तींनी संसदेच्या हॉलमध्ये उडी घेतली. एक व्यक्ती खासदार बसतात त्या टेबलांवरुन उड्या मारत अध्यक्षांच्या दिशेने जाऊ लागला. सुरक्षारक्षकांनी तसेच काही खासदारांनी या व्यक्तीला चारही बाजूंनी घेरलं आणि त्यानंतर या दोघांना ताब्यात घेण्यात आलं.
उद्या बॉम्ब घेऊन घुसतील
संसदेच्या सदनामध्ये उडी मारणाऱ्या व्यक्तीबद्दल बोलताना उपस्थित खासदारांपैकी अनेकांनी या व्यक्तीने संसदेत अशी गोष्ट फवारली की त्यामधून पिवळा धूर निघू लागला. काँग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरी यांनी यासंदर्भातील माहिती दिली. समाजवादी पक्षाचे खासदार एस. टी. हसन यांनी 2 तरुणांनी हॉलमध्ये उड्या मारल्या. त्यानंतर त्यांनी बुटांमधून अशी गोष्ट काढली की ज्यामुळे सगळीकडे पिवळा गॅस पसरला, अशी माहिती दिली. “हा कोणता गॅस होता? हा विषारी गॅस होता का? आम्हाला संसदेच्या सुरक्षेमध्ये फार त्रुटी आढळून आल्या. अशाप्रकारे कोणीतरी बुटांमध्ये बॉम्ब ठेऊन प्रवेश करु शकतो,” असं हसन म्हणाले. सुरक्षेकडे विशेष लक्ष देण्याची गरज असल्याचं मत हसन यांनी मांडलं.