( प्रगत भारत । pragatbharat.com)
Is Dawood Ibrahim dead : मुंबई बॉम्बस्फोटाचा मास्टरमाईंड अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमवर पाकिस्तानात विषप्रयोग (Dawood Ibrahim Poisoned) करण्यात आल्याची माहिती समोर आली होती. दाऊदला विष देऊन मारण्याचा प्रयत्न झाल्याची माहिती सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दाऊदची प्रकृती चिंताजनक असून, त्याच्यावर कराचीत उपचार सुरू असल्याचं सांगितलं जातंय.मात्र, याबाबत पाकिस्तानकडून कुठलीही पुष्टी झालेली नाही. अशातच आता सुत्रांच्या हवाल्याने मोठी माहिती समोर आली आहे.
एका पाकिस्तानी युट्यूबरने रविवारी रात्री उशिरा एक व्हिडिओ शेअर केला. त्यात त्याने इब्राहिमच्या विषबाधा आणि हॉस्पिटलायझेशनचा अंदाज लावला होता. मात्र, दाऊद इब्राहिम याच्यावर कोणतीही विषबाधा झाली नाही किंवा त्याचा मृत्यूही झालेला नाही, अशी माहिती विश्वसनीय सुत्रांच्या हवाल्याने समोर आली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, दाऊद इब्राहिमला मृत्यू झाला नसून त्याला विषबाधा झाल्याची माहिती चुकीची आहे. जागतिक इंटरनेट स्वातंत्र्यावर नजर ठेवणाऱ्या इंटरनेट वॉचडॉग नेटब्लॉक्सने यासंबंधी काही घटना समोर ठेवल्या आहेत.
कुख्यात डॉन दाऊद गेल्या अनेक वर्षांपासून पाकिस्तानातील कराचीमध्ये वास्तव्याला आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या बातमीनुसार दाऊदची प्रकृती गंभीर असल्याचं सांगितलं जातं होतं. तसंच पाकिस्तानात इंटरनेट सेवाही बंद असल्याने याबाबत आणखीनच संशय बळावला होता. दोन आठवड्यापूर्वीच 26/11 मुंबई हल्ल्याचा मास्टरमाईंड साजिद मीरवरही पाकिस्तानात जेलमध्ये विषप्रयोग केल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर दाऊदचा खेळ खल्लास केल्याचं वृत्त समोर आलं होतं. मात्र, ही घटना विरोधी पक्षनेते इम्रान खान आणि त्यांचा पक्ष पीटीआयला लक्ष्य करणाऱ्या इंटरनेट सेन्सॉरशिपच्या मागील घटनांशी सुसंगत आहे, असं नेटब्लॉक्सने सांगितलं आहे.
कोण आहे दाऊद इब्राहिम?
दाऊद इब्राहिम हा मुंबईतील 1993 च्या बॉम्बस्फोटाचा मास्टरमाईंड आहे. या बॉम्बस्फोटात 250 हून अधिक लोकांचा बळी गेला होता. मुंबई बॉम्बस्फोटानंतर दाऊद पाकिस्तानात फरार झाला. मुंबई हल्ल्यानंतर दाऊदला मोस्ट वॉन्टेड दहशतवादी घोषित केलं. दाऊद पाकिस्तानात असल्याचे पुरावे देऊनही भारताकडे ताबा मिळाला नाही. बॉम्बस्फोट, दहशतवाद, ड्रग्ज तस्करीत दाऊदचा हात असल्याचे पुरावे भारत सरकारकडे आहेत.