बस डंपरला धडकल्याने मोठा अपघात; 13 प्रवाशांसह बस जळून पूर्णपणे खाक

( प्रगत भारत । pragatbharat.com)

MP Accident : मध्य प्रदेशात भीषण रस्ते अपघाताची अपघाताची घटना समोर आली आहे. बुधवारी रात्री प्रवाशांनी भरलेली बस डंपरला धडकल्याने हा अपघात झाला आहे. या अपघातामुळे बसला आग लागली आणि 13 प्रवाशांची होरपळून मृत्यू झाला. हा अपघात झाला तेव्हा प्रवासी बस गुनाहून आरोनकडे जात होती. बसमधील प्रवासी संख्या 30 च्या आसपास होती. काही मृतदेह पूर्णपणे जळाले असून, डीएनएद्वारे त्यांची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरु आहेत.

मध्य प्रदेशातील गुना येथे झालेल्या भीषण रस्ता अपघातात 13 जणांचा मृत्यू झाला. प्रवाशांनी भरलेली बस डंपरला धडकल्यानंतर बसला आग लागली होती. हा अपघात झाला तेव्हा प्रवासी बस गुना येथून आरोनच्या दिशेने जात होती. घटनास्थळी जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक उपस्थित झाले होते. बसमधील जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून काहींची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.

हा अपघात कसा घडला याबाबतची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. खासगी बस आणि डंपर यांच्यात समोरासमोर धडक झाल्याची घटना गुना-आरोन रोडवर घडली. डंपरला धडक दिल्यानंतर बस पलटी होऊन रस्त्यावर उलटली आणि तिने  लगेचच पेट घेतला. ही आग एवढी भीषण होती की, अनेक प्रवाशांचा कोळसा झाला. अपघातातील 14 जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

“या अपघातात बसमध्ये प्रवास करणाऱ्या 13 प्रवाशांचा मृत्यू झाला असून 14 जण भाजले आहेत. रात्री नऊच्या सुमारास हा अपघात झाला तेव्हा बस आरोनच्या दिशेने, तर डंपर गुनाच्या दिशेने जात होता. घटनेच्या वेळी बसमध्ये सुमारे 30 प्रवासी होते आणि त्यापैकी चार जण कसेतरी बसमधून बाहेर पडण्यात यशस्वी झाले,” असेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. अनेक मृतदेह गंभीररित्या जळाले असून, त्यांचे चेहरे पाहून त्यांची ओळख पटवणे शक्य नाही. त्यामुळे घरातील सदस्य त्याला ओळखू शकत नाहीत. दुसरीकडे, हा अपघात कसा घडला आणि त्याला जबाबदार कोण याचा शोध घेऊन प्रशासनाने तपास सुरू केला आहे. डंपर परमिट आदींचीही माहिती गोळा केली जात आहे, असेही जिल्हाधिकारी म्हणाले.

मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला शोक

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी या घटनेवर शोक व्यक्त केला आहे. “गुनाहून आरोनला जाणाऱ्या बसला भीषण आग लागल्याने प्रवाशांच्या मृत्यूची बातमी अत्यंत दुःखद आहे. या हृदयद्रावक अपघातात अकाली मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांच्या संवेदना व्यक्त करतो. या भीषण परिस्थितीत राज्य सरकार पीडित कुटुंबांच्या पाठीशी उभे आहे,” असे मुख्यमंत्री मोहन यादव म्हणाले. त्यांनी प्रत्येक मृतांच्या नातेवाईकांना 4 लाख रुपये आणि जखमींना 50 हजार रुपयांची मदत जाहीर केली. या घटनेच्या चौकशीचे आदेशही त्यांनी दिले आहेत.

Related posts