बाबर, अयोध्या वाद, कायदेशीर लढाई आणि प्राणप्रतिष्ठा… जाणून घ्या श्री राम मंदिराचा संपूर्ण इतिहास

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Ayodhya Ram Mandir : अयोध्येतील भव्य राम मंदिरात रामल्लाच्या प्राणप्रतिष्ठापनेची जय्यत तयारी सुरू आहे. राम मंदिराच्या इतिहासाला बाबरपासून राम मंदिरापर्यंत सुमारे 500 वर्षे लागली. राम मंदिराच्या उभारणीत बाबरपासून ते सर्वोच्च न्यायालय आणि त्यानंतर वर्षानुवर्षे अनेक घडामोडी घडल्या आहेत. अयोध्या वसवण्यापासून ते अयोध्येत राम मंदिर होण्यापर्यंतचा इतिहास नेमका कसा होता हे आपण जाणून घेऊया.

अवध शहर अयोध्या हे मुळात मंदिरांचे शहर होते. असे म्हटले जाते की अयोध्या शहर भगवान श्री रामाचे पूर्वज वैवस्वत मनू यांचे पुत्र विवस्वान (सूर्य) यांनी वसवले होते. त्यामुळे अयोध्या नगरीमध्ये महाभारत काळापर्यंत सूर्यवंशी राजांची सत्ता कायम होती. भगवान श्रीरामांचा जन्म अयोध्या शहरातील दशरथ राजवाड्यात झाला.  या शहराचे अतुलनीय सौंदर्य आणि सुंदर वास्तूंचे वर्णन वाल्मिकी रामायणातही केले आहे. म्हणूनच महर्षि वाल्मिकींनी रामायणात अयोध्या नगरीच्या सौंदर्याची तुलना करताना त्याला दुसरे इंद्रलोक म्हटले आहे.

भगवान श्रीरामांनी जलसमाधी घेतल्यावर अयोध्या काही काळ उजाड झाली. त्यानंतर प्रभू श्रीरांमाचा मुलगा कुशने पुन्हा अयोध्येची पुनर्बांधणी केली आणि त्यानंतर सूर्यवंशाच्या पुढील 44 पिढ्यांपर्यंत तिचे अस्तित्व तसेच राहिले. यानंतर महाभारत काळात युद्ध होऊनही अयोध्या पुन्हा उजाड झाली. पण श्री राम जन्मभूमी अयोध्येला अनेकदा हल्ल्यांना सामोरे जावे लागले. मुघलांनी अयोध्येला उद्ध्वस्त करण्यासाठी अनेक मोहिमाही सुरू केल्या, मंदिरात बाबरीची रचना उभारण्यात आली. भव्य मंदिरे पाडण्यात आली आणि मशिदी बांधण्यात आल्या. पण प्रभू श्रीरामाची जन्मभूमी कधीही नष्ट होऊ शकली नाही.

1528 – मुघल सम्राट बाबरचा सेनापती मीर बाकी याने वादग्रस्त जागेवर मशीद बांधली होती. या जागेबाबत हे भगवान रामाचे जन्मस्थान असून या ठिकाणी एक प्राचीन मंदिरही होते, असा दावा हिंदू पक्षाकडून करण्यात येत होता. मशिदीमध्ये बांधलेल्या तीन घुमटांपैकी एक हे भगवान रामाचे जन्मस्थान आहे, असे सांगण्यात येत होते.

1853-1949 – 1853 मध्ये पहिल्यांदा श्री राम जन्मभूमीवर मशीद बांधलेल्या जागेच्या आजूबाजूला अनेक ठिकाणी दंगली उसळल्या. यानंतर, 1859 मध्ये, ब्रिटिश प्रशासनाने विवादित जागेजवळ कुंपण घातले आणि मुस्लिमांना इमारतीच्या आत पूजा करण्याची परवानगी दिली तर हिंदूंना बाहेर पूजा करण्याची परवानगी दिली.

1949 –  23 सप्टेंबर 1949 रोजी जेव्हा मशिदीत प्रभू रामाच्या मूर्ती सापडल्या तेव्हा अयोध्या श्री रामजन्मभूमीचा खरा वाद सुरु झाला. कोणीतरी गुपचूप या मूर्ती येथे ठेवल्याचा आरोप मुस्लिम समाजातील लोकांनी केला. तेव्हा उत्तर प्रदेश सरकारने तातडीने मूर्ती तेथून हटवण्याचे आदेश दिले. पण दंगली भडकण्याच्या भीतीने जिल्हा दंडाधिकारी के के नायर यांनी हा आदेश जारी करण्यास असमर्थता दर्शवली. त्यामुळे अशाप्रकारे सरकारने ती वादग्रस्त रचना मानून त्या जागेला कुलूप ठोकले.

1950 – त्यानंतर याप्रकरणी न्यायालयीन वाद सुरु झाला. फैजाबादच्या दिवाणी न्यायालयात यांसदर्भात दोन याचिका दाखल झाल्या. यामध्ये एक वादग्रस्त जमिनीवर रामल्ंलाच्या पूजेच्या परवानगीसाठी आणि दुसरी मूर्ती ठेवण्याची परवानगी होती.

1961 – उत्तर प्रदेश सुन्नी वक्फ बोर्डाने वादग्रस्त जमीन ताब्यात घेण्याची आणि मूर्ती हटवण्याची मागणी करणारा अर्ज दाखल केला.

1984 – 1 फेब्रुवारी 1986 रोजी यूसी पांडे यांच्या याचिकेवर फैजाबाद जिल्हा न्यायाधीश केएम पांडे यांनी हिंदूंना पूजा करण्याची परवानगी दिली आणि तिथले कुलूप काढून टाकण्याचे आदेश दिले.

1992 – 6 डिसेंबर 1992 रोजी विहिंप आणि शिवसेनेसह अनेक हिंदू संघटनांच्या लाखो कार्यकर्त्यांनी वादग्रस्त संरचना पाडली. त्यामुळे देशभरात जातीय दंगली उसळल्या आणि हजारो लोक मारले गेले.

2002 – हिंदू कारसेवकांना घेऊन जाणारी गोध्रा ट्रेन जाळण्यात आली आणि सुमारे 58 लोक मारले गेले. त्यामुळे गुजरातमध्येही दंगल उसळली आणि या दंगलीत दोन हजारांहून अधिक लोक मारले गेले.

2010 – अलाहाबाद उच्च न्यायालयाने वादग्रस्त जमीन सुन्नी वक्फ बोर्ड, राम लल्ला विराजमान आणि निर्मोही आखाडा यांच्यात तीन समान भागांमध्ये विभागण्याचे आदेश दिले.

2011 – अयोध्या वादावर अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली.

2019 – 8 मार्च 2019 रोजी सर्वोच्च न्यायालयाने प्रकरण लवादाकडे पाठवले आणि 8 आठवड्यांच्या आत कार्यवाही पूर्ण करण्याचे आदेश दिले.

2019 – 09 नोव्हेंबर 2019 रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या 5 न्यायाधीशांच्या खंडपीठाने श्री रामजन्मभूमीच्या बाजूने निर्णय दिला. हिंदू बाजूने 2.77 एकर वादग्रस्त जमीन मिळाली आणि मशिदीसाठी स्वतंत्र 5 एकर जमीन मुस्लिम बाजूस देण्याचे आदेश दिले.

2020 – 25 मार्च 2020 रोजी, 28 वर्षांनंतर, राम लल्ला तंबूतून बाहेर पडले आणि फायबर मंदिरात स्थलांतरित झाले आणि त्यानंतर 5 ऑगस्ट रोजी भूमिपूजन करण्यात आले.

2023 – रामल्ंलाच्या भव्य मंदिराचे उद्घाटन 22 जानेवारी 2024 रोजी होणार आहे.

Related posts