( प्रगत भारत । pragatbharat.com)
Asaduddin Owaisi Slams Eknath Shinde Devendra Fadnavis: राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठवाड्याच्या दौऱ्यामध्ये ‘बाबरी पाडली तेव्हा मी तिथे होतो, लालकृष्ण अडवाणी यांच्यासह भाजपचे वरिष्ठ नेते तिथे होते,’ असं विधान काही दिवसांपूर्वी केलं होतं. आता याच विधानावरुन ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुस्लिमीन म्हणजे एआयएमआयएमचे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबरच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला आहे. फडणवीस यांच्यामध्ये एवढी हिंमत आली असेल तर त्यांनी कोर्टात जाऊन सांगावं, असं ओवेसी म्हणाले आहेत.
फडणवीसांमध्ये एवढी हिंमत असेल तर…
ओवेसींनी प्रसारमाध्यमांशी चर्चा केल्याचा व्हिडीओ एआयएमआयएमच्या युट्यूब अकाऊंटवरुन पोस्ट करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये ओवेसी फडणवीसांच्या विधानावर प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. “भाजपाशी संबंध असलेले आणि संवैधानिक पदावर असलेले महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, यांनी असं म्हटलं आहे की 6 डिसेंबरचा दिवस त्यांच्यासाठी फार आनंदाचा होता. ज्या दिवशी बाबरी मशीद शहीद करण्यात आलं त्या दिवशी आपण तिथे होते असं ते म्हणाले. अरे तुम्ही उपमुख्यमंत्री आहात. तुम्ही संविधानावर हात ठेऊन शपथ घेतली आहे. ज्या दिवशी मशीद पडली त्याबद्दल बोलताना तुम्ही म्हणत आहात फार चांगलं झालं. ते लोकांना उकसवण्याचं काम करत नाहीयेत का? एक उपमुख्यमंत्री असून ते अशा बकवास गोष्टी करत आहेत,” असं म्हणत ओवेसींनी फडणवीसांवर टीका केली आहे.
तुम्ही तुरुंगवासाला घाबरता का?
“जर देवेंद्र फडणवीसांमध्ये एवढी हिंमत आली असेल तर कोर्टात जाऊन त्यांनी सांगायला हवं की, होय, मी तोडली मशीद. तुम्ही नाही म्हणालात. तुम्ही घाबरुन नाही म्हणालात. कोणालाच शिक्षा झाली नाही या प्रकरणात. हिंमत असेल तर कोर्टात जाऊन बोलावं की होय मी तोडली होती मशीद. शिवसेनेचेही आता जे लोक बोलत आहेत ते कोर्टात जाऊन काय नाही सांगत. तुम्ही तुरुंगवासाला घाबरता का? पंतप्रधानांच्या सरकारने या गुन्हेगारी निकालाविरोधात याचिका दाखल केली नाही,” असं ओवेसी म्हणाले.
एकनाथ शिंदेंवरही साधला निशाणा
ओवेसी यांनी एकनाथ शिंदेवरही टीका केली आहे. “दुसरे आहेत भाजपाचा पाठिंबा असलेले एकनाथ शिंदे! ते म्हणतात की, जे 200-300 वर्षांपूर्वीचे दर्गे आहेत ते बदलणार. अरे तुम्ही मुख्यमंत्री आहात महाराष्ट्राचे. तुमच्या नजरेत सर्वजण समान हवे. कोणाचा धर्म हिंदू असो, मुस्लीम असो, शीख असो किंवा ईसाई असो. तुम्ही मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री असून एका समुदायाकडून बोलताना अशी बकवास विधानं करत आहात. बाबरी मशीदसंदर्भातील कोर्टाचा जो निकाल आला आहे त्यामुळे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मोदी सरकारमधील मंत्र्यांची हिंमत वाढली आहे. त्या निकालामुळेच ते अशी उकसवणारी, द्वेषपूर्ण वक्तव्य करत आहेत. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री अशी विधान करत असतील तर ही पंतप्रधान मोदींची जबाबदारी आहे की त्यांनी देशाला सांगावं की त्यांच्या सरकारचं धोरण काय आहे,” असं ओवेसी म्हणाले.