Mumbai News : मुंबईतील ‘या’ भागात सुरु होतं चुकीचं काम; रुपया नव्हे, डॉलरमध्ये होत होती कमाई

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Mumbai News : मुंबईतून सध्या एक धक्कादायक माहिती समोर आली असून, एका मोठ्या जाळ्याची यामुळं पोलखोल झाली आहे. एका खळबळजनक घटनेमुळं पोलीसही सतर्क झाले असून, नव्या नोकरीच्या शोधात असणाऱ्या आणि हाताशी काही काम नाही म्हणून कॉल सेंटरची वाट धरणाऱ्या अनेकांनाच यंत्रणांनी सावध केलं आहे. मुंबईतील अंधेरी (Mumbai Andheri) येथील एका कॉल सेंटरमध्ये चालणाऱ्या गैरव्यवहाराचा पर्दाफाश नुकताच पोलिसांनी केला असून, 10 जणांवर अटकेची कारवाई केली आहे. 

भारतात बंदी असणाऱ्या औषधांची विक्री थेट अमेरिकेतील नागरिकांना करून त्यातून रुपये नव्हे, डॉलर्समध्ये कमाई करणाऱ्या अंधेरीतील एका कॉल सेंटरवर ही कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार अंधेरी पूर्व येथे असणाऱ्या द समिट बिझने बेमधील ग्लोबल सर्व्हिसेस येथे बेकायदेशीररित्या कॉल सेंटर सुरु असल्याची माहिती मिळताच सूत्र पुढे गेली आणि गुन्हे शाखेकडून या ठिकाणी धाड टाकण्यात आली. 

पोलिसांनी कॉल सेंटरवर धाड टाकताच तिथं काम करणाऱ्या इरफान कुरेशी, सलमान मोटरवाला आणि राशीद अन्सारी यांनी सर्व्हर बंद करत तातडीनं सिस्टीममध्ये असणाऱ्या Files डिलीट करून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांच्या धडक कारवाईमध्ये या कॉल सेंटरमधून एक लॅपटॉप, तीन मोबाईल, 24 हार्ड डिस्क, एक राऊटर, एक सर्व्हर अशा गोष्टी जप्त करण्यात आल्या. त्याशिवाय डिलीट करण्यात आलेल्या माहितीचा तपशीलही मिळवण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत. 

डॉलर्समध्ये व्यवहार, कसं सुरु होतं काम? 

उपलब्ध माहितीनुसार यश शर्मा (26), साकीब मुस्कार सय्यद (38) त्यांच्या साथीदारांसह अवैध कॉल सेंटर चालवत होते जिथं आठजण काम करत होते. VOIP यंत्रणेच्या माध्यमातून या कॉल सेंटरमधून अमेरिकेतील नागरिकांशी संपर्क साधला जात होता. जिथं विविध औषध कंपन्यांच्या नावानं त्या नागरिकांना व्हायग्रा, सियालिस, लिविट्रो आणि ट्रेमोडोल अशा प्रतिबंधात्मक औषधांची विक्री केली जात होती. 

मुंब्रा येथे राहणारा सलमान मोटरवाला नामक व्यक्ती या औषधांची विक्री करत होता. दरम्यान, सदर प्रकरणी आरोपी आणि संशयितांना ताब्यात घेत आणि गुन्हा नोंदवत यंत्रणांनी पुढील तपास सुरु केला आहे. 

Related posts