( प्रगत भारत । pragatbharat.com)
उत्तर प्रदेशातील कानपूर येथे एका माकडाच्या मृत्यूवरुन गदारोळ सुरु आहे. या माकडाची एअर गनने गोळी घालून हत्या करण्यात आल्याचा आरोप आहे. हिंदू संघटनांनी याविरोधात रस्त्यावर उतरुन आंदोलन केलं. तसंच पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. यानंतर तब्बल 8 दिवसांनी माकडाचा पुरलेला मृतदेह खोदून बाहेर काढण्यात आला आहे. यानंतर माकडाच्या मृतदेहाचा पोस्टमॉर्टम केला जाणार आहे.
नौबस्ता येथील वाय ब्लॉकमध्ये राहणाऱ्या सुरेंद्र सिंह याच्यावर माकडाला गोळी घातल्याचा आरोप आहे. परिसरात राहणाऱ्या अंजनी मिश्राने दावा केला आहे की, एअर गनने गोळी घालून माकडाला ठार करण्यात आलं.
अंजनीच्या म्हणण्यानुसार, 16 जानेवारीला सुरेंद्र सिंह, अखंड प्रताप सिंह आणि सोनी हजर होते. सुरेंद्रच्या हातात एअर गन होती. त्यांनी माझ्यासमोर एअर गनने माकडाला गोळी घालून ठार केलं. गोळी लागल्यानंतर माकड खाली कोसळलं आणि तिथेच जीव सोडला.
अंजनीने पुढे सांगितलं आहे की, यानंतर आम्ही माकडाचा मृतदेह उचलला आणि भगव्या कपड्यात गुंडाळून दफन केलं. यावरुन आरोपी नाराज झाले आणि आम्हाला मारहाण केली. यानंतर पोलीस ठाण्यात तक्रार दाखलकेली. पण सुरुवातीला सुनावणी झाली नाही.
माकडाच्या हत्येवरुन गदारोळ
पोलिसांनी कारवाई न केल्याने अंजनीने सनातन मठ मंदिर रक्षा समितीच्या कार्यकर्त्यांना याची माहिती दिली. यानंतर त्यांनी हा मुद्दा उचलला. दबाव वाढल्यानंतर पोलिसांनी नौबस्ता ठाण्यात तीन जणांविरोधात एफआयआर दाखल केला.
सनातन संस्थेच्या लोकांनी जाहीर केलं आहे की, पोस्टमॉर्टम नंतर जिथे माकडाची हत्या झाली आहे तिथे त्याचं एक मंदिर उभारणार आहोत. आरोपींना अटक होईपर्यंत सनातन संस्था आंदोलन करत राहणार आहे.
दरम्यान याप्रकरणी पोलिसांचं म्हणणं आहे की, 16 तारखेला कथितपणे माकडाची हत्या करण्यात आली होती. त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. एफआयआर दाखल करण्यात आला आहे. शवविच्छेदनानंतर पुढील कारवाई केली जाणार आहे.