शुभमंगल सावधान! पूजा सावंत ‘या’ महिन्यात चढणार बोहल्यावर

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Pooja Sawant Marriage Month : मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून पूजा सावंतला ओळखले जाते. तिने अभिनयासोबतच नृत्य कौशल्याने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. निखळ सौंदर्य आणि सोज्वळ अशी ओळख असलेली पूजा सावंत आज तिचा वाढदिवस साजरा करत आहे. त्यातच गेल्या काही महिन्यांपासून पूजा ही लग्न करणार असल्याच्या चर्चांनाही उधाण आले आहे. आता एका मराठी दिग्दर्शकाने तिच्या लग्नाचा तारीख जाहीर केली आहे. 

प्रसिद्ध दिग्दर्शक चंद्रकांत कानसे हे सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतात. चंद्रकांत कानसे यांनी ‘दगडी चाळ’, ‘दगडी चाळ 2’, ‘भेटली तू पुन्हा’, ‘लव्ह एक्सप्रेस’ यासारख्या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. त्यांनी नुकतंच इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात त्यांनी पूजाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्याबरोबरच त्यांनी पूजा सावंत आणि सिद्धेश चव्हाण कधी लग्नबंधनात अडकणार याचाही खुलासा केला आहे. 

चंद्रकांत कानसे यांची पोस्ट

“वरील फोटोमध्ये दिसणाऱ्या दोन बायका, माफ करा एक बाई आणि दुसरी पुढच्या महिन्यात होऊ घातलेली बाई… बाईचं  नाव रेणुका आणि होऊ घातलेलीच नाव पूजा… नीट बघाल तर दोन्ही नावं देविंशी संबंधित, देवीच म्हणाना… तर, या दोन देव्या माझ्या आयुष्यात आल्या, एक जिवाभावाची प्राणप्रिय बायको म्हणून तर दुसरी जिवाभावाची प्राणप्रिय मैत्रीण म्हणून… एवढं सगळं लिहिण्याच कारण आज माझ्या जिवाभावाच्या प्राणप्रिय मैत्रिणीचा शेवटचा वाढदिवस, माफ करा माफ करा, स्वातंत्र्यातला शेवटचा वाढदिवस… पुढच्या महिन्यात तीच लग्न आहे म्हणून स्वातंत्र्यातला शेवटचा वाढदिवस असं म्हणालो… तर तिला या स्वतंत्र वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा…

पुढच्या वर्षीपासून बंधनातल्या शुभेच्छा देईन… कारण पुढच्या वर्षीपासून नवरा नावाचं बंधन गळ्यात असेल तुझ्या म्हणून आज स्वातंत्र्यातला शेवटचा वाढदिवस मनाप्रमाणे जगून घे, खूप मज्जा कर, धुडगूस घाल… तशी तू बंधन मानणारी आणि कोणाला घाबरणारी ( मलासोडून) मुलगी नाहीस तरीही नवरा नामक धाक हा थोडासा का असेना असतोच…आता म्हणाल लिहायचं तर मैत्रिणीबद्दल होतं तर बायकोचा दिखावा कशाला तर आपल्या पेक्षा अवाजवी महत्त्व दुसऱ्या मुलीला दिले तर बायको नामक प्राणी कुठल्याही थराला जाऊ शकतो.. (माझी बायको तशी नाही ती माझ्या धाकात आहे असे फक्तं आणि फक्तं मीच मानतो)”, असे कॅप्शन त्यांनी दिले आहे. 

दरम्यान चंद्रकांत कानसे यांच्या या पोस्टवर पूजा सावंतनेही प्रतिक्रिया दिली आहे. “चंदू सर तुमचे खूप खूप आभार. किती सुरेख लिहीले आहे आणि फक्त तुम्हीच हे करू शकता. माझ्याकडे भावना व्यक्त करण्यासाठी शब्द नाही. असेच कायम माझ्या पाठीशी राहा”, असे पूजा सावंतने म्हटले आहे. सध्या चंद्रकांत कानसेंची ही पोस्ट व्हायरल होत आहे.

Related posts