( प्रगत भारत । pragatbharat.com)
Kalkaji Temple Stampede : दिल्लीत अपघाताची मोठी घटना समोर आली आहे. राजधानी दिल्लीतील प्रसिद्ध कालकाजी मंदिरात शनिवारी रात्री उशिरा जागरणाचा कार्यक्रम सुरू असताना मोठी दुर्घटना घडली. कालकाजी मंदिरात स्टेज कोसळल्याने चेंगराचेंगरी झाली. या गोंधळात एका महिलेचा मृत्यू झाला, तर 17 जण जबर जखमी झाले. या कार्यक्रमासाठी पोलिसांची कोणतीही परवानगी घेण्यात आली नाही. या घटनेनंतर पोलिसांनी कार्यक्रमाच्या आयोजकांविरुद्ध गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
शनिवारी रात्री दिल्लीच्या कालकाजी मंदिरात जागरण सुरू असताना स्टेज कोसळून सुमारे 17 जण जखमी झाले आणि एका 45 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. ही घटना रात्री साडे बाराच्या सुमारास घडल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिसांनी याप्रकरणी आयोजकांविरुद्ध गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या कार्यक्रमामध्ये प्रसिद्ध बॉलीवूड गायक बी प्राक पोहोचला होता. त्याला पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. त्याच दरम्यान, मंदिर परिसरात चेंगराचेंगरी झाली. त्यानंतर अचानक स्टेज खाली कोसळला.
#WATCH | Delhi | 17 people injured and one died when a platform, made of wood and iron frame, at a Mata Jagran at Mahant Parisar, Kalkaji Mandir collapsed at midnight on 27-28 January. Case registered against the organisers.
(Video: Viral visuals confirmed by Fire Department) pic.twitter.com/haaC9TZe4D
— ANI (@ANI) January 28, 2024
शनिवारी रात्री 12.30 च्या सुमारास महंत कॉम्प्लेक्स कालकाजी मंदिरातील माता जागरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या दरम्यान लाकूड आणि लोखंडी फ्रेमचा स्टेज कोसळून 17 जण जखमी झाले तर एका 45 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. मृत महिलेची ओळख अद्याप पटलेली नाही. सर्व जखमींना एम्स ट्रॉमा सेंटर, सफदरजंग हॉस्पिटल आणि मॅक्स हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
‘या कार्यक्रमाची कोणतीही परवानगी घेण्यात आली नव्हती. मात्र, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पुरेसे जवान तैनात करण्यात आले होते. जवळपास 1500-1600 लोकांची गर्दी तिथे जमली होती. अपघातानंतर गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळी भेट दिली. सर्व जखमींची प्रकृती स्थिर आहे, तर काहींना फ्रॅक्चर झाले आहे. याप्रकरणी आयोजकांविरुद्ध कलम 337/304ए/188 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे,’ अशी माहिती पोलिसांनी दिली.
बी प्राकने व्यक्त केले दुःख
“मनाने मी खूप दुःखी आहे. कारण पहिल्यांदाच माझ्यासमोर अशी घटना घडली आहे. ज्यांना जखमा झाल्या आहेत ते लवकरात लवकर बरे व्हावेत. कार्यक्रमाचे नियोजन महत्त्वाचे आहे. आयोजन करणाऱ्यांनी लोकांना मागे जायला सांगितले होते. यापुढे आपल्याला सर्वांची काळजी घ्यायला हवी. कारण जीवापेक्षा जास्त महत्त्वाचं काहीच नाही. त्यामुळे आपल्याला सगळ्यांची काळजी घ्यायला हवी. मी पुन्हा येणार आहे,” असे बी प्राकने म्हटलं आहे.