महिला उपजिल्हाधिकाऱ्याची बेरोजगार पतीकडून हत्या; वॉशिंग मशिनमुळे झाला खुलासा

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Man Killed Bureaucrat Wife: मध्य प्रदेशमध्ये एका सनदी महिला अधिकाऱ्याची तिच्या बेरोजगार पतीने हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या व्यक्तीने पुरावे लपवण्याचा प्रयत्नही केला आहे. तसेच पोलिसांना तपासादरम्यान खोटी माहिती देऊन तपासाची दिशा भरकटवण्याचा प्रयत्नही केला आहे. आरोपीचं नाव मनीष शर्मा असं आहे. उपजिल्हाधिकारी असलेल्या निशा नापीत यांची दिंडोरी जिल्हातील सहापुरा येथे नियुक्ती करण्यात आली होती. निशा यांनी वारस म्हणून पती मनीषचं नाव आपल्या विमा तसेच बँक अकाऊंटसाठी नोंदवलेलं नव्हतं. याचाच राग मनिषच्या मनात होता आणि त्यातूनच त्याने पत्नीची हत्या केली. 

त्या दाव्यामुळे झाला खुलासा

मनीषने उशीने तोंड दाबून पत्नीची हत्या केली. त्यानंतर त्याने पत्नीच्या रक्ताचे डाग पुसून काढले. तसेच त्याने सर्वच पुरावे पुसून टाकण्याचा प्रयत्न केला. पोलिसांना उशीचे कव्हर आणि बेडशीट वॉशिंग मशिनमध्ये सापडले. पोलिसांना या महिला उपजिल्हाधिकाऱ्याच्या घरात सापडलेले बेडशीट आणि उशीचे कव्हर मुख्य पुरावे म्हणून या प्रकरणामध्ये फार महत्त्वाचे ठरले. निशाची बहिण निलिमा नापीत यांनी शर्माने पत्नीची हत्या केल्याचा आरोप केला. बहिणीचा पती पैशांसाठी तिचा छळ करायचा असा आरोपही मृत महिलेच्या बहिणीने केला.

“तो पैशांसाठी निशाचा छळ करायचा. माझ्या बहिणीला कोणताही आजार नव्हता. मनिषनेच तिच्याबरोबर काहीतरी चुकीचं केलं आहे. त्याने निशाच्या रुममध्ये मोलकरणीला घुसू दिलं नाही,” असा दावा मृत महिलेच्या बहिणीने केला. 45 वर्षीय मनिषला अटक करण्यात आली आहे. त्याच्याविरुद्ध कलम 302,304 ब आणि 201 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निशा नापीत आणि मनिष शर्मा यांचं लग्न मॅट्रोमोनियल साइटवरुन जमलं होतं. या दोघांचं 2020 मध्ये लग्न झालं. निशाच्या लग्नामध्ये तिच्या कुटुंबातील कोणतीही व्यक्ती नव्हती कारण तिने लग्नाबद्दल कुटुंबाला फारच उशीरा कळवल्याचा दावा तिच्या बहिणीने केला आहे.

नेमकं घडलं काय?

रविवारी दुपारी चारच्या सुमारास पती मनीष हा निशाला घेऊन रुग्णालयामध्ये गेला. जिथे निशाला मृत घोषित करण्यात आलं. महिला उपजिल्हाधिकाऱ्याचा मृत्यू झाल्याची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकारी रुग्णालयामध्ये आले. मनीषने निशाचा मृत्यू हा नैसर्गिक असल्याचा बनाव करताना तिला किडनीचा आजार होता असा दावा केला. मात्र निशाच्या बहिणीने हा दावा फेटाळून लावला आहे. “मला खात्री आहे की तिच्या पतीनेच तिची हत्या केली आहे. तो तिला मारहाण करायचा आणि मानसिक त्रास द्यायचा,” असं निशाच्या बहिणीने प्रसारमाध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेत म्हटलं.

खोटा घटनाक्रम

मनीष शर्माला पत्नीचा अचानक मृत्यू कसा झाला याबद्दल विचारण्यात आलं असता त्याने फार रंगवून खोटा घटनाक्रम सांगितला. “तिला किडनीचा विकास होता. ती दर शनिवारी उपवास ठेवायची. तिला शनिवारी रात्री उलटी झाल्याने तिला औषध दिलं,” असं मनीषने पोलिसांना सांगितलं. झोपेतच निशाचा मृत्यू झाल्याचा मनिषचा दावा आहे.

“मला सकाळी जाग आली नाही आणि रविवार असल्याने तिला काही नव्हतं. मी मॉर्निंग वॉकला गेलो त्यानंतर 10 वाजता मोलकरीण आली. मी जेव्हा 2 वाजता घरी आलो तेव्हाही ती झोपेतून उठली नव्हती. मी तिला उठवण्याचा प्रयत्न केला. तिला सीपीआरही दिला. मी डॉक्टरांना फोन केला. त्यांनी मला तिला रुग्णालयात घेऊन ये, असं सांगितलं,” असा दावा मनीषने केला आहे.

तो रिपोर्ट ठरला महत्त्वाचा

डॉक्टरांनी नीशाला तपासल्यानंतर तिच्या नाकातून आणि तोंडातून रक्त येत होतं. पोलिसांनी तातडीने मनीष शर्माला अटक केली. पोलिसांनी या प्रकरणात मोस्ट मॉर्टम रिपोर्टबरोबरच मोलकरणीने नोंदवलेला जबाब आणि मशीनमध्ये सापडलेले रक्त लागलेले कपडे सबळ पुरावा म्हणून ग्राह्य धरले आहेत. उप पोलिस आयुक्त मुकेश श्रीवास्तव यांनी या प्रकरणात तातडीने तपास करत आरोपीला 24 तासांमध्ये अटक केल्याबद्दल 20 हजारांचं बक्षिस जाहीर केलं आहे.

Related posts