रॅलीत मुलगी हातात चित्र पकडून उभी होती; मोदींनी पाहिलं अन् म्हणाले ‘खाली बस…’

( प्रगत भारत । pragatbharat.com)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची गुरुवारी छत्तीसगडमध्ये प्रचारसभा पार पडली. यावेळी एका लहान मुलीने नरेंद्र मोदींचं लक्ष वेधून घेतलं. नरेंद्र मोदी सभेत भाषण करत असताना मुलगी हातात नरेंद्र मोदींचं चित्र घेऊन उभी होती. मुलीने स्वत: हे चित्र साकारलं होतं. मुलगी बराच वेळ उभी असल्याने नरेंद्र मोदी यांनी तिला खाली बसण्याची विनंती केली. “मी तुझं चित्र पाहिलं आहे. तू फार चांगलं काम केलं आहेस,” असं नरेंद्र मोदी तिला म्हणाले.

नरेंद्र मोदींनी यावेळी मुलीला तू जर अशीच उभी राहिलीस तर दमशील असंही आपुलकीने सांगितलं. “तू बराच वेळ झाला उभी आहेस. तू दमशील,” असं नरेंद्र मोदींनी मुलीला सांगितलं. नरेंद्र मोदी यानंतर तिथे उपस्थित पोलिसांना हे चित्र आपल्याकडे घेऊन या अशी विनंती केली. तसंच तिला या चित्राच्या मागे आपला पत्ता लिहिण्यास सांगत, मी तुला पत्र लिहीन असं आश्वासन दिलं. यानंतर उपस्थितांनीही टाळ्या वाजवत नरेंद्र मोदींच्या या कृतीचं कौतुक केलं. 

नरेंद्र मोदींची छत्तीसगडच्या कानेर येथे ‘विजय संकल्प’ रॅली पार पडली. या प्रचारसभेत नरेंद्र मोदींनी काँग्रेसवर जोरदार टीका करत एक आदिवासी देशाचे राष्ट्रपती झाल्याने विरोध करत असल्याचा हल्लाबोल केला. “समाजातील प्रत्येक घटकाला विकास आणि प्रगतीचा लाभ मिळावा, हे भाजपाचे धोरण आहे. इतिहासात पहिल्यांदाच आदिवासी कुटुंबातील मुलीला राष्ट्रपती करण्याचा निर्णय भाजपाने घेतला, मात्र काँग्रेसने त्याला विरोध केला,” अशी टीका नरेंद्र मोदींनी केली.

“भाजपाचं ध्येय छत्तीसगडची ओळख आणखी मजबूत करणं आहे. आदिवासी आणि मागासलेल्यांच्या हक्कांचे रक्षण करणे हेच भाजपाचे ध्येय आहे. छत्तीसगडला देशातील सर्वोच्च राज्यांमध्ये आणणे हे भाजपचे ध्येय आहे. काँग्रेस आणि विकास एकत्र असू शकत नाही,” असंही पंतप्रधान मोदी म्हणाले.

छत्तीसगडमध्ये सध्या निवडणूक प्रचार जोरात सुरू आहे. राज्यात 7 नोव्हेंबर आणि 17 नोव्हेंबरला दोन टप्प्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत. निवडणुकीचे निकाल 3 डिसेंबरला जाहीर होतील.

Related posts