YouTube वरुन लोकांना पालकत्वाचे धडे, पण घरात आपल्याच मुलांना मारहाण; कोर्टाने सुनावली 30 वर्षांची शिक्षा

( प्रगत भारत । pragatbharat.com)

लोका सांगे ब्रम्हज्ञान, आपण मात्र कोरडे पाषाण ही म्हण अमेरिकेतील एका महिलेने खरी करुन दाखवली आहे. रुबी फ्रँक नावाची महिला युट्यूबवरुन करोडो लोकांना पालकत्वाचे धडे देत होती. पण सहा महिलांची आई आपल्याच मुलांचा मानसिक आणि शारिरीक छळ करत होती. कोर्टाने तिला मोठी शिक्षा सुनावली आहे. दरम्यान कोर्टात सुनावणी सुरु असताना न्यायाधीशांसमोर रडली आणि आपल्या मुलांचा मानसिक, शारिरीक छळ केल्याबद्दल माफी मागितली. 

रुबी फ्रँकने आपला सहकारी युट्यूबर आणि व्यावसायिक भागीदारामुळे हे कृत्य केल्याचा दावा केला आहे. विशेष म्हणजे यावेळी तिने आपली शिक्षा कमी करण्यासाठी कोणतीही विनंती किंवा युक्तिवाद करणार नसल्याचं सांगितलं. याउलट  मुलांना आपल्यापासून वाचवल्याबद्दल स्थानिक पोलीस अधिकारी, डॉक्टर आणि सामाजिक कार्यकर्त्यांचे आभार मानले. आपण सहकाऱ्याच्या प्रभावाखाली असताना एखाद्या देवदूताप्रमाणे मुलांच्या मदतीसाठी ते धावले असल्याचं तिने म्हटलं आहे. 

कोर्टाने महिलेला 30 वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. उटाह येथील कायद्यात महिलांना जास्तीत जास्त 30 वर्षांची शिक्षा सुनावण्याची तरतूद आहे. तुरुंगवासात असताना वर्तनाच्या आधारे माफी किंवा पॅरोलसबंधी निर्णय घेतला जातो. कोर्टात सुनावणी सुरु असताना महिलेने, मी माझ्या मुलांना दुखावल्याबद्दल डोळ्यातील अश्रू थांबवू शकत नाही असं म्हटलं. यावेळी तिची मुलं कोर्टात हजर नव्हती. 

“तुमच्यासाठी सर्वस्व अर्पण करण्याची माझ्या इच्छेचं रुपांतर एका हिंसक गोष्टीत झालं. मी तुमच्याकडून फार काही हिरावून घेतलं,” असंही ती म्हणाली. फ्रँक (42) आणि हिल्डब्रँड (54) यांनी आपण दोषी असल्याचं कबूल केलं आहे. 

ऑगस्ट महिन्यात महिलेचा 12 वर्षीय मुलगा खिडकीतून पळाला होता. यानंतर त्याने शेजाऱ्यांच्या घरी जाऊन पोलिसांना फोन करण्यास सांगितलं होतं. यानंतर ही घटना उघडकीस आली होती आणि पोलिसांनी तिला अटक केली होती. अंगाने सडपातळ असणाऱ्या या मुलाच्या अंगावर जखमा होत्या. तसंच घोटा आणि मनगटाभोवती पट्टी होती. हिल्डेब्रँडने त्याचे हात आणि पाय दोरीने बांधले होते. तसंच जखमांवर पट्टी लावताना त्यावर लाल मिरची आणि मध वापरले होते असं त्याने पोलिसांना सांगितलं होतं. 

फिर्यादी वकील एरिक क्लार्क यांनी मुलांना एखाद्या शिबिरात असल्याप्रमाणे ठेवण्यात आल्याचं कोर्टात सांगितलं. त्यांनी त्याची तुलना नाझींनी उभारलेल्या छावणीशी केली, ज्यामध्ये ज्यू लोकांना आणि इतर अल्पसंख्याकांना उपाशी ठेवण्यासाठी, जास्त काम करण्यासाठी आणि फाशी देण्यासाठी ठेवण्यात आलं होतं. 

फ्रँकेने कोर्टात आपल्या कृत्याप्रती पश्चाताप व्यक्त केला आणि वकिलांन सहकार्य केले अशी माहिती क्लार्क यांनी दिली. पण हिल्डब्रँडने गुन्हा कबूल तर केलाच नाही याउलट पोलिसांवरच आरोप केले. एका निवेदनात, हिल्डब्रॅन्ड्टने माफी मागण्यास नकार दिला. परंतु महिलने आपण मुलांवर प्रेम करत असून ते लवकर बरे व्हावेत अशी इच्छा व्यक्त केली. तिने न्यायाधीश जॉन जे. वॉल्टन यांना आठवण करून दिली की तिने खटल्यात जाण्याऐवजी याचिका स्वीकारली कारण मुलांनी साक्ष देऊन त्यांच्या मनातील जखमांच्या खपल्या पुन्हा काढून येत असं आपल्याला वाटत होतं. 

रुबी फ्रँक आणि तिचा पती केविन फ्रँक यांनी 2015 साली युट्यूबवर  “8 Passengers” हे चॅनेल सुरु केलं होतं. यामधून त्यांनी आपल्या सहा मुलांचा सांभाळ करतानाचे अनुभव शेअर केले होते. अल्पावधीत या चॅनेलला अनेक फॉलोअर्स मिळाले होते. यानंतर रुबीने हिल्डब्रॅन्ड्टनेची काऊन्सलिंग कंपनी ConneXions Classroom मध्ये काम करण्यास सुरुवात केली होती. येथे पालकांसाठी सेमिनार आयोजित केले जात होते. यानंतर तिने आणखी एक युट्यूब चॅनेल सुरु केलं होतं. हाच कंटेंट इंस्टाग्राम खातं “Moms of Truth” वरही शेअर केला जात होता. 

रुबी फ्रँकेने तिच्या याचिकेत मुलाला बूट घातले असताना लाथ मारणं, तोंड पाण्यात धरणे आणि तिच्या हातांनी त्याचे तोंड व नाक बंद केल्याचं कबूल केलं आहे. तसंच उन्हाळ्याच्या उष्णतेमध्ये जास्त अन्न किंवा पाणी न घेता तासनतास शारीरिक श्रम करायला लावले. ज्यामुळे डिहायड्रेशन आणि सनबर्न झाल्याचीही कबूल दिली. धक्कादायक म्हणजे हे आपण प्रेमाखातर करत असल्याचं तिने मुलांना सांगितलं होतं असा याचिकेत उल्लेख आहे. 

हिल्डब्रँडने फ्रँकच्या सर्वात धाकट्या मुलीला जेव्हा ती 9 वर्षांची होती तेव्हा अनेक वेळा निवडुंगात उडी मारण्यासाठी आणि तिच्या पायांना फोड येईपर्यंत अनवाणी पायांनी कच्च्या रस्त्यावर धावायला लावल्याचं कबूल केलं आहे. 

पोलिसांनी अटकेची कारवाई केल्यानंतर मुलगा आणि मुलीला रुग्णालयात नेलं आणि इतर दोन भावंडांसह राज्याच्या कस्टडीत ठेवलं आहे. 

2023 मध्ये अटक होण्याआधी रुबी फ्रँक पालकांच्या विश्वात चांगलीच प्रसिद्ध होती. पण तिच्या काही पालकत्वाच्या व्हिडीओंवर टीकाही करण्यात आली होती. ज्यामध्ये तिने सर्वात मोठ्या मुलाला लहान भावाची चेष्टा केल्याबद्दल सात महिन्यांसाठी बेडरूममध्ये बंदी घालण्यात आली होती. तसंच एका व्हिडिओत, रुबी फ्रँकेने बालवाडीत जेवण घेऊन जाण्यास नकार दिल्याबद्दल आणि घरातील वस्तू कापल्याबद्दल तिला शिक्षा करण्यासाठी खेळण्यांचे डोके कापून टाकण्याची धमकी दिल्याबद्दल सांगितलं होतं.

Related posts