मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील गाडीचा भीषण अपघात; रस्त्याने जाणाऱ्या महिला आणि मुलीचा मृत्यू

( प्रगत भारत । pragatbharat.com)

CM Convoy Car Accident : उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये सरकारी गाडीचा मोठा अपघात झाला. या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला. उत्तर प्रदेशातील गोसाईगंजच्या अर्जुनगंजमध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या ताफ्याशी संबंधित वाहनाचा अपघात झाला. या अपघातात जखमी झालेल्या 11 जणांपैकी दोघांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये एक महिला आणि एका मुलीचा समावेश आहे. जखमी लोकांवर रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र यादरम्यान एक महिला आणि एका किशोरवयीन मुलीचा मृत्यू झाला.

लखनऊमध्ये अर्जुनगंजमध्ये शनिवारी संध्याकाळी साडेआठच्या सुमारास मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या ताफ्यासमोर परिस्थितीची पाहणी करत असलेले अ‍ॅन्टी डेमो वाहन काही प्राण्यामुळे रस्त्यावर उलटले. यामध्ये पाच पोलिसांसह रस्त्यावर तिथे उपस्थित असलेले 11 जण जखमी झाले. या अपघातामुळे एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणाची मुख्यमंत्री योगी आदित्यान यांनीही दखल घेतली आहे.

शनिवारी रात्री मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ त्यांच्या ताफ्यासह प्रवास करत असताना त्यांच्या ताफ्यापूर्वी रस्त्याची तपासणी करत असलेल्या अ‍ॅन्टी डेमो कारचा अपघात झाला. या अपघातात 5 पोलिसांसह एकूण 11 जण जखमी झाले आहेत. जखमींना आधी जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. त्यानंतर त्यांना इतर रुग्णालयामध्ये हलवण्यात आले. त्यानंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ रविवारी किंग जॉर्ज मेडिकल युनिव्हर्सिटी ट्रॉमा सेंटरमध्ये अपघातातील जखमींना पाहण्यासाठी पोहोचले होते. मात्र जखमींपैकी एक महिला आणि एका मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 2 लाख रुपये आणि जखमींना प्रत्येकी 50 हजार रुपयांची नुकसानभरपाई आणि योग्य उपचार करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.

कसा झाला अपघात?

उत्तर प्रदेशचे पोलीस महासंचालक प्रशांत कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्र्यांचा ताफा जाण्यापूर्वी या अ‍ॅन्टी डेमो कार जात होत्या. त्यावेळी रस्त्यात श्वान आल्याने त्याला वाचवण्याच्या नादात एक गाडी रस्त्यावर उलटली.  ही गाडी अहिमामौ चौकाजवळ इंटरसेप्टरच्या मागून जात होती. मारी माता मंदिराजवळ अचानक कुत्रा इंटरसेप्टरखाली आला. इंटरसेप्टरने पाठीमागून येणाऱ्या गाडीला इशारा केला मात्र वेग जास्त असल्याने ती नियंत्रणाबाहेर गेले आणि रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या दोन गाड्यांवर उलटली. त्यामुळे रस्त्याच्या कडेला असलेले काही पादचारी जखमी झाले. या गाडीत असणारे पोलिसही जखमी झाले. मात्र मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील अन्य कोणत्याही वाहनाचे नुकसान झाले नाही. 

दरम्यान, या अपघातातील जखमी प्रिया (14) आणि नीलम (35) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. जखमींमध्ये पोलीस कर्मचारी शिवम यादव, अवध नारायण, राम सिंग, विजय प्रताप यादव, मोहम्मद शमीम आणि विजय कुशवाह यांचा समावेश आहे. कार्तिक, हसनैन, अमशा सिद्दीकी, शहनाज, खालिद आझम आणि सुशीला यांच्यासह इतर वाहनातील प्रवासी जखमी झाले.

अ‍ॅन्टी डेमो कार म्हणजे काय?

मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याच्या दोन किमी आधी जिल्हा प्रशासनाच्या अ‍ॅन्टी डेमो कार पुढे निघतात. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या ताफ्यात बोलेरो डेमा कार होती. या बोलेरो कारच्या समोरून एक इंटरसेप्टर वाहन जात होते. इंटरसेप्टर हे वाहन आहे जे ताफ्याच्या अग्रभागी असते. ते रडार आधारित कॅमेरा सारख्या उपकरणांनी सुसज्ज असते आणि मागे येणाऱ्या वाहनांना सतर्क करते.

Related posts