तिसरीच्या विद्यार्थ्याची स्कूल फी 30 हजार रुपये, सोशल मीडियात पालकांचा रोष

( प्रगत भारत । pragatbharat.com)

School Fees Hike: शिक्षण हे सर्वांसाठी खूप महत्वाचे असते. पण आजकाल शिक्षणाचं व्यावसायिकरण झाल्याचं चित्र जागोजागी दिसत. आपल्या मुलाला चांगल शिक्षण मिळून त्याच भवितव्य उज्वल व्हावं, असं प्रत्येक पालकांना वाटतं. पालकांच्या या भावनेचा गैरफायदा घेत अनेक शैक्षणिक संस्था आपली दुकानं भरत आहेत. पण विद्यार्थ्यांचे शालेय शुल्क इतके वाढलंय की पालक फॅमिली प्लानिंग करताना हा विचार गांभीर्याने करु लागली आहेत. नुकतेच एका शाळेच्या फीचा मुद्दा ऐरणीवर आलाय. त्यामुळे बदलत्या शिक्षणव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. काय घडलाय हा प्रकार? सविस्तर जाणून घेऊया. 

गुरुग्राम येथे राहणाऱ्या रियल इस्टेट कन्सल्टंटने आपल्या मुलाच्या स्कूल फी संदर्भात तक्रार दाखल केली. विद्यार्थ्याची स्कूल फी 10 टक्क्यांनी वाढत चाललीय, असे त्यांचे म्हणणे आहे. 

महिन्याची फी 30 हजार रुपये 

बदलत्या आणि महागड्या शिक्षण व्यवस्थेला अनेक पालक बळी पडत आहेत. उदीत भंडारी हे त्यातीलच एक आहेत. त्यांनी आपल्या एक्स अकाऊंटवर एक पोस्ट लिहिली आहे. शालेय प्रशासनाने योग्य कारण न देता फी वाढल्याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली आहे. याबद्दल पालक प्रश्न विचारायला गेल्यास तुम्ही बिंधास्त दुसरी शाळा शोधा, असे शाळेकडून सांगण्यात येत असल्याचे उदीत यांनी म्हटलंय. 

काय लिहिलंय पोस्टमध्ये?

माझा मुलगा गुरुग्रामच्या एका प्रसिद्ध शाळेत इयत्ता तिसरीमध्ये शिकतो. तिथे प्रत्येक महिन्याला 30 हजार रुपये फी भरावी लागते. ही शाळा दरवर्षाला साधारण 10 टक्के फी वाढवत राहते. असे सुरु राहिल्यास बारावीला पोहोचेपर्यंत माझ्या मुलाची वर्षाची फी साधारण 9 लाख रुपये होईल, असे उदीत यांनी म्हटले.

पालकांच्या रोषानंतर झाला गोंधळ 

उदीत यांना शाळा प्रसानच्या कारभाराबद्दल लिहिलेली पोस्ट प्रचंड वेगाने व्हायरल झाली. आम्हीदेखील शाळा शुल्क वाढीच्या अडचणींचा सामना करत असल्याची प्रतिक्रिया पालक वर्गाकडून करण्यात आली आहे. पालक कमेंट सेक्शनमध्ये आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. आमच्या डीपीएसमध्येदेखील हीच अवस्था आहे. कोणत्याच गोष्टीचा विरोध करु शकत नाही. 10 टक्के फी तर वाढतेच. सोबत महागडी पुस्तके, विद्यार्थ्यांची स्टेशनरी  शाळा स्वत: देते. या वस्तू बाहेरुन घेऊ दिल्या जात नाहीत. दरवर्षी कपडे आणि शूज नवीन घ्यावे लागतात. कोणी जुन्या वस्तू वापरु नयेत, असे आवाहन शाळेकडून करण्यात आल्याचेही पालकांकडून सांगण्यात येत आहे. 

एका पालकाने दिलेल्या प्रतिक्रियेनुसार, त्याच्या मित्राची मुलगी बंगळूरच्या एका इंटरनॅशनल बोर्डमध्ये इयत्ता दुसरीला शिकतेय. तिची स्कूल फी साधारण 8 लाख रुपये इतकी आहे. यामध्ये जेवण आणि प्रवास आहे. ही फी दरवर्षी 10 टक्क्यांनी वाढते. विद्यार्थी एका वर्षातून दुसऱ्या वर्गात जातो तेव्हा फी 20 टक्क्यांनी वाढते. त्यामुळे बारावीला पोहोचेपर्यंत त्यांची फी 35 लाखापर्यंत पोहोचेल, अशी भीती व्यक्त केली जात आहे. 

जसे प्रश्न उपस्थित होतातय, त्याचप्रमाणे काही पालक या समस्येवर उत्तरदेखील देत आहेत. तुमच्या मुलांना घरीच शिक्षण द्या. कारण तसं पाहायला गेलं तर अनेक शाळांची स्थिती उदास आहे, असा सल्ला एकाने दिलाय. तर पालकांनी एक ग्रुप बनवला पाहिजे.  कोणत्या दुसऱ्या शाळेत प्रवेश घेतला पाहिजे, असेही सुचवण्यात आलंय.

Related posts