“सचिनला वडील मानतात मुलं, आता इथेच मरणार,” भारतीय तरुणासाठी पाकिस्तानी महिलेने ओलांडली सीमारेषा

( प्रगत भारत । pragatbharat.com)

भारतीय सचिन आणि पाकिस्तानी सीमा आता आयुष्याच्या नव्या सुरुवातीसाठी प्रयत्न करत आहेत. जामीन मिळाल्यानंतर त्यांची नवी दिल्लीच्या कारागृहातून सुटका कऱण्यात आली आहे. 4 जुलै रोजी सीमाला व्हिसा नसताना बेकायदेशीररित्या नेपाळमार्गे भारतात प्रवेश केल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. सीमासह तिची चार मुलंही आहेत, ज्यांचं वय 7 पेक्षा कमी आहे. दरम्यान, त्यांना आश्रय दिल्याप्रकरणी सचिनलाही बेड्या ठोकण्यात आल्या होत्या. “माझा पती हिंदू आहे, त्यामुळे आता मीदेखील हिंदू आहे. माझ्यात आता मी भारतीय असल्याची भावना आहे,” असं तिने म्हटलं आहे. 

एखाद्या चित्रपटाप्रमाणे सचिन आणि सीमा यांची लव्हस्टोरी आहे. करोना काळात पबजी खेळताना दोघांची ओळख झाली होती. यानंतर त्यांच्या ओळखीचं प्रेमात रुपांतर झालं. मार्च महिन्यात नेपाळमध्ये 30 वर्षीय सीमा आणि 25 वर्षीय सचिन यांनी लग्न केलं. ही त्यांची पहिलीच भेट होती. 

“हा फार मोठा आणि खडतर प्रवास होता. मी फार घाबरले होते. मी आधी कराचीहून दुबईला गेले. तिथे मी 11 तास वाट पाहत होते. मी अजिबात झोपू शकले नाही. यानंतर आम्ही नेपाळला गेले. तिथून पोखराला गेल्यानंतर मी सचिनला भेटले,” अशी माहिती सीमाने दिली आहे. 

यानंतर ती परत पाकिस्तानला गेली आणि सचिन भारतात परतला. दरम्यान, सीमाचे तिच्या पतीसह वाद सुरु होती. तिने पाकिस्तानात 12 लाखांना आपली जमीन विकली आणि नेपाळसाठी तिकीट आणि व्हिसाचा बंदोबस्त केला. 

मे महिन्यात सीमा दुबईमार्गे नेपाळला पोहोचली आणि पोखरा या पर्यटन शहरामध्ये काही काळ घालवला. त्यानंतर तिने काठमांडूहून दिल्लीसाठी बस पकडली आणि 13 मे रोजी तिच्या मुलांसह ग्रेटर नोएडाला पोहोचली. तिथे सचिनने तिची पाकिस्तानी ओळख उघड न करता भाड्याच्या घरात राहण्याची व्यवस्था केली होती, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

पण 4 जुलै रोजी त्यांच्या या प्रेमकथेला सुरुंग लागला आणि पोलिसांनी त्यांना अटक केली. सीमाला बेकायदेशीरपणे भारतात प्रवेश केल्याप्रकरणी, तर सचिनला बेकायदेशीर निर्वासितांना आश्रय दिल्याप्रकरणी बेड्या ठोकण्यात आल्या. दरम्यान, कोर्टाने सीमाला जामीन दिला असून आता भारतीय नागरिक होण्यासाठी तिची तयारी सुरु आहे. 

सुटका झाल्यानंतर सीमाने प्रतिक्रिया देताना सांगितलं की, जेव्हा मी बातमी ऐकली तेव्हा आनंदाने ओरडले. मला वाटलं होतं की मी आता महिनोमहिने जेलमध्ये असेन. 

सौदी अरेबियातून पाठवलेल्या एका व्हिडिओत सीमाचा पती गुलाम हैदर याने भारत सरकारला त्याची पत्नीशी पुन्हा भेट करु देण्यासाठी मदत करण्याची विनंती केली. मात्र, सीमाने प्रसारमाध्यमांशी बोलताना, तिला गुलाम हैदरकडे परत जायचे नाही आणि पाकिस्तानात परत गेल्यास तिच्या जीवाला धोका असल्याचं सांगितलं आहे. 

“सचिनला मुलं वडील मानतात. मी आता पुन्हा पाकिस्तानात गेले तर ते मला दगडांनी ठेचून मारतील. पाकिस्तानापेक्षा मी भारतात मरणं पसंत करेन,” अशा भावना सीमाने व्यक्त केल्या आहेत.

सीमाने सांगितलं की “सचिनने मला चारही मुलांसह स्वीकारलं आहे. माझा पहिला पती व्हिडीओच्या माध्यमातूम मला पुन्हा परत बोलावण्याचा प्रयत्न करत आहे. पण मला त्याच्याकडे परत जायचं नाही. माझा पती गुलाम मला मारहाण करायचा. अनेकदा चेहऱ्यावर मिरचा फेकायचा. यामुळेच मी गेल्या चार वर्षांपासून गुलामपासून वेगळं राहत आहे”.

Related posts