( प्रगत भारत । pragatbharat.com)
Muslim World League chief Al Issa In India: सौदी अरेबियाचे माजी न्यायमंत्री आणि मुस्लिम वर्ल्ड लीगचे विद्यमान महासचिव मोहम्मद बिन अब्दुलकरीम अल-ईसा भारत दौऱ्यावर आहेत. त्यांनी दिल्लीतील एका कर्यक्रमाला हजेरी लावली. या कार्यक्रमाला अल-ईसांबरोबर भारताचे मुख्य सुरक्षा सल्लागार अजित डोवालही उपस्थित होते. या कार्यक्रमामध्ये अल-ईसा यांनी भारतीय मुस्लिमांना ते भारतीय असल्याचा गर्व असल्याचं म्हटलं. तर अजित डोवाल यांनी आपल्या भाषणामध्ये भारतात कोणत्याही धर्मातील व्यक्तींबरोबर भेदभाव होत नाही असं म्हटलं. इस्लाम भारतातील इतर सर्व धर्मांइतकाच महत्त्वाचा धर्म असल्याचं डोवाल यांनी सांगताना भारतातील मुस्लिमांची संख्या ही मुस्लिम वर्ल्ड लीगमधील 33 देशांच्या एकूण मुस्लिम लोकसंख्येपेक्षा अधिक असल्याचंही नमूद केलं.
हिंसेला धार्मिक नेत्यांनी विरोध केला पाहिजे
मंगळवारी अल-ईसा आणि अजित डोवाल हे इस्लामिक कल्चर सेंटरमधील एका कार्यक्रमाला हजेर होते. कोणत्याही एका धर्माशी दहशतवाद संलग्न नाही असं डोवाल यांनी या कार्यक्रमातील भाषणात म्हटलं. आध्यात्मिक आणि धार्मिक नेत्यांचं हे कर्तव्य आहे की त्यांनी हिंसेच्या मार्गाने जाणाऱ्यांना विरोध केला पाहिजे, अशी अपेक्षाही डोवाल यांनी आपल्या भाषणात बोलून दाखवली.
भारतीय मुस्लिमांना ते मुस्लिम असल्याचा अभिमान
आपल्या भाषणामध्ये अल-ईसाने भारतामधील मुस्लिमांना भारतीय असल्याचा फार अभिमान असल्याचं नमूद केलं. सर्वजण एकमेकांच्या सहकार्याने राहू शकतो याचं सर्वात मोठं उदाहरण भारत असल्याचंही अल-ईसा यांनी म्हटलं. “आम्हाला ठाऊक आहे की मुस्लिम हे भारतामधील विविधतेतील एकतेमधील महत्त्वाचा भाग आहेत. भारतीय मुस्लिमांना ते भारतीय असल्याचा गर्व आहे. धर्म हा सहकार्याचा उत्तम मार्ग ठरु शकतो. ही समज विकसित होण्यासाठी आम्ही कोणाबरोबरची चर्चा करण्यासाठी तयार आहोत. भारताने मानवतेसाठी बरंच मोठं काम केलं आहे,” अशा शब्दांमध्ये अल-ईसा यांनी भारताचं कौतुक केलं. इस्लाममध्येही परस्पर सहकाऱ्याने राहण्याचा संदेश देण्यात आल्याचं अल-ईसा यांनी म्हटलं.
वेगवेगळ्या संस्कृतींचा संवाद महत्त्वाचा
मुस्लिम वर्ल्ड लीगच्या महासचिवांनी भारताच्या गौरवशाली इतिहासाचंही कौतुक केलं. वेगवेगळ्या संस्कृतींमध्ये अधिक संवाद घडवून आणणे ही काळाची गरज आहे. आम्ही भारताच्या इतिहासाचं आणि विविधतेचं कौतुक करतो. संस्कृतींदरम्यान संवाद प्रस्थापित होणे फार गरजेचं आहे. वेगवेगळ्या संस्कृतींमध्ये उत्तम संवाद असेल तर दृढ नाते संबंध निर्माण होतात असं इल-ईसा म्हणाले.
डोवाल म्हणाले, भारतात कोणताही धर्म संकटात नाही
याच कार्यक्रमामध्ये डोवाल यांनी भारतात कोणताही धर्म संकटात नाही असंही म्हटलं. भारत हा सर्वसमावेशक लोकशाही देश म्हणून सर्वच नागरिकांच्या धार्मिक, जातीय आणि संस्कृतिक पार्श्वभूमीची काळजी घेत सर्वांचा सन्मान करतो. एक गौरवशाली देश म्हणून भारत आपल्या आव्हानांना तोंड देण्यासाठी सहिष्णुता, संवाद आणि सहयोग वाढवण्यास प्राधान्य देत विश्वास निर्माण करतो. त्यामुळे हा काही निव्वळ योगायोग नाही की जवळजवळ 20 कोटी मुस्लिम लोकसंख्या अशतानाही जागतिक दहशतवादामध्ये भारतीय नागरिकांचा समावेश फार कमी स्वरुपात आहे, असंही डोवाल यांनी स्पष्ट केलं.
भारतातील मुस्लिमांची लोकसंख्या 33 देशांपेक्षा अधिक
भारतात असलेल्या अनेक धर्मामध्ये इस्लाम सुद्धा एक महत्त्वाचा धर्म आहे. मुस्लिम नागरिकांच्या लोकसंख्येसंदर्भात भारत हा जगातील दुसरा सर्वात मोठा देश आहे जिथे एवढ्या मोठ्या प्रमाणात मुस्लिम राहतात. भारतामधील मुस्लिमांची संख्या ही इस्लामिक सहयोग संघटनेतील 33 देशांमधील मुस्लिमांच्या एकूण संख्येइतकी आहे. भारत जगातील सर्व विचार, धर्म आणि संस्कृतींचं मोकळ्या मनाने स्वागत करत आला असल्याने हे शक्य झालं आहे. भारत हा जगातील सर्व धर्मांनी त्रास दिलेल्या लोकांसाठी एखाद्या हक्काच्या घरासारखा आहे, असं डोवाल म्हणाले.