“महागड्या भाज्यांसाठी मुस्लिम जबाबदार”, आसामच्या मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याने नवा वाद

( प्रगत भारत । pragatbharat.com)

CM Himanta Biswa Sarma : आसामचे (Assam) मुख्यमंत्री हिमंता बिस्वा शर्मा हे त्यांच्या वक्तव्यांमुळे कायमच चर्चेत असतात. आता पुन्हा एकदा मुख्यमंत्री शर्मा यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केले आहे. वाढत्या महामागईमुळे देशातील सर्वच जनता हैराण असताना मुख्यमंत्री शर्मा मुस्लिमांना यासाठी कारणीभूत ठरवलं आहे. आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी भाज्यांच्या दरवाढीसाठी मियाँ (मुस्लीम) व्यापारी जबाबदार आहेत, असं विधान केलं आहे. मियाँ मुस्लिमांची (Miya Muslims) मुळे बांगलादेशात आहेत, असेही शर्मा यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आता नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

आसाममध्ये गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात भाज्यांच्या दरात मोठी वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनता चिंतेत आहे. अनेक लोक सरकारवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. अशा वेळी आता हिमंता बिस्वा शर्मा यांनी मुस्लिमांना यासाठी जबाबदार ठरवलं आहे.

महागड्या भाज्यांबाबत विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना हिमंता बिस्वा शर्मा यांनी हे वक्तव्य केले आहे. “भाज्यांच्या दरवाढीमागे मियां (मुस्लीम) व्यापारी आहेत. हे मियां व्यापारी चढ्या दराने भाजीपाला विकतात. ग्रामीण भागात भाज्यांचे भाव खूपच कमी आहेत. आज राज्यात आसामी व्यापारी भाजी विकत असते तर त्यांनी आसामी लोकांकडून जास्त पैसे उकळले नसते. मात्र मियां व्यापारी आसामी लोकांकडून जास्त पैसे घेत आहेत,” असे शर्मा म्हणाले.

मिया मुस्लिम भाजी विक्रेत्यांना बाहेर काढणार – मुख्यमंत्री शर्मा

“मी आसामी तरुणांना पुढे येण्याचे आवाहन करतो. मी तुम्हाला आश्वासन देतो की मी शहरातील सर्व ‘मिया’ मुस्लिम भाजी विक्रेत्यांना हाकलून देईन. मियां व्यापारी ज्या उड्डाणपुलाखाली भाजीपाला आणि फळे विकतात, ती जागा रिकामी करणार आहे. आसाममध्ये कॅबपासून ते बससेवेपर्यंत, बहुतेक लोक आता मुस्लिम समाजातील या विभागातील आहेत,” असेही शर्मा म्हणाले.

असदुद्दीन ओवेसी यांचे प्रत्युत्तर

मुख्यमंत्री शर्मा यांच्या या विधानाला खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. “देशात अशी काही लोकं आहेत, ज्यांच्या घरात म्हैस दूध देत नसेल किंवा कोंबडी अंडी देत ​​नसेल, तर मियांजींना दोषी ठरवले जाईल. कदाचित मियांभाई त्यांच्या वैयक्तिक अपयशालाही दोष देतील. आजकाल मोदीजींची परदेशी मुस्लिमांशी घट्ट मैत्री आहे. त्यांच्याकडून टोमॅटो, पालक, बटाटे वगैरे मागवा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलीकडेच इजिप्तला भेट दिली आणि राष्ट्राध्यक्ष अब्देल फताह अल-सिसी यांच्या हस्ते त्यांना देशातील सर्वोच्च सन्मान ऑर्डर ऑफ द नाईल प्रदान करण्यात आला,” असे ओवेसी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

Related posts