( प्रगत भारत । pragatbharat.com)
PM Modi Praises Maharashtra CM Eknath Shinde: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी सहकुटुंब पंतप्रधान नरेंद्र मोदींची दिल्लीमध्ये भेट घेतली. शिंदे यांनीच आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन या भेटीचे काही फोटो शेअर केले होते. यावेळेस शिंदे यांच्याबरोबर त्यांचे खासदारपुत्र श्रीकांत शिंदेंसहीत कुटुंबातील एकूण सहाजण उपस्थित होते. दुपारी मुख्यमंत्री शिंदेंच्या कुटुंबियांना भेटल्यानंतर पंतप्रधान मोदींनी खास मराठीमध्ये या भेटीसंदर्भातील आपल्या भावना सोशल मीडियावरुन व्यक्त केल्या.
केंद्र सरकार पाठीशी…
“देशाचे पंतप्रधान म्हणून कणखर आणि सक्षम असलेल्या नरेंद्र मोदीजी यांनी आज माझे वडील, पत्नी, मुलगा खासदार श्रीकांत शिंदे, सून आणि नातू यांच्यासह मला सदिच्छा भेटीला बोलावून आपलेपणाने विचारपूस केली. माझ्या कुटुंबाशी निवांत गप्पा मारल्या. त्यांच्या व्यस्त कार्यक्रमातून आमच्यासाठी वेळ काढला,” अशा कॅप्शनसहीत एकनाथ शिंदेंनी ट्वीटरवरुन या भेटीचे फोटो शेअर केले होते. “महाराष्ट्रातील जनतेचे आयुष्य सुखकर करण्यासाठी राबविल्या जाणाऱ्या विकासकामांबाबत त्यांनी यावेळी चर्चा केली. इर्शाळवाडीतील दुर्घटनेमुळे राज्यावर दुःखाचा डोंगर कोसळला असून त्याबाबत सहवेदना व्यक्त करत या संकटात केंद्र सरकार पाठीशी असल्याचे ते म्हणाले. तसेच बचावकार्य आणि पुनर्वसनाबाबत माहिती घेतली,” असंही एकनाथ शिंदेंनी सांगितलं. “धारावी पुनर्विकास हा सर्वात मोठा प्रकल्प असून त्यामुळे मुंबईचा चेहरा बदलणार आहे. त्याचबरोबर गरीब नागरिकांना सुखाचे आयुष्य जगता येणार आहे. त्यामुळे हा प्रकल्प विनाअडथळा वेगाने पूर्ण करावा, रखडलेले पुर्नविकास प्रकल्प मार्गी लावावेत, असे त्यांनी सांगितले,” असंही शिंदेंनी नमूद केलं.
पंतप्रधानांची आपुलकी, आशीर्वादाचा हात आणि…
“पायाभूत सुविधांना बळ मिळाले की राज्याच्या समृद्धीचा मार्ग प्रशस्त होतो. त्यामुळे राज्यातील असे प्रकल्प त्वरित पूर्ण करावेत, अशी सूचना त्यांनी केली. याशिवाय वारंवार होणारी अतिवृष्टी, त्यामुळे येणारी संकटे यावर आस्थेवाईकपणे चर्चा केली. कोकणात उदंड पाऊस पडून पाणी समुद्राला मिळते. हे पाणी दुष्काळग्रस्त भागात कसे वळवता येईल, मराठवाडा वॉटर ग्रीड या राज्य सरकारच्या योजनांबाबतही त्यांनी यावेळी माहिती घेतली. याशिवाय राज्यातील आरोग्य व्यवस्था, उपलब्ध शैक्षणिक सुविधा, आवश्यक बदल या मुद्द्यांवरही त्यांनी चर्चा केली गेले वर्षभर केंद्र सरकारचे भक्कम पाठबळ राज्य सरकारला मिळत आहे. ते सहकार्य यापुढेही कायम मिळो, ही मागणी मान्य करत पंतप्रधानांनी आश्वस्तही केले. पंतप्रधानांची आपुलकी, आशीर्वादाचा हात आणि आस्था नवे बळ देणारी आहे,” अशा भावना मुख्यमंत्री शिंदेनी या भेटीसंदर्भात बोलताना व्यक्त केल्या.
Today met Hon. Prime Minister @narendramodi ji.
I thank Hon. Modiji for affectionately enquiring and sharing quality time with my family.
Had a discussion with Hon. Modiji regarding the various ongoing development projects in Maharashtra, Hon. Modiji assured full support from… pic.twitter.com/GVcFVBEna3
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) July 22, 2023
मोदी काय म्हणाले या भेटीसंदर्भात?
एकनाथ शिंदेंनी मोदींना भेटल्यानंतर ट्वीटरवरुन या भावना व्यक्त केल्यानंतर पंतप्रधानांनी रात्री पावणेअकराच्या सुमारास या ट्वीटला कोट करुन रिट्वीट केलं. “महाराष्ट्राचे गतिशील आणि कष्टाळू मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी यांना आणि त्यांच्या कुटुंबाला भेटून आनंद झाला. महाराष्ट्राच्या प्रगतीसाठीची त्यांची तळमळ आणि विनम्र स्वभाव कौतुकास्पद आहे,” असं पंतप्रधानांनी या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
महाराष्ट्राचे गतिशील आणि कष्टाळू मुख्यमंत्री @mieknathshinde जी यांना आणि त्यांच्या कुटुंबाला भेटून आनंद झाला. महाराष्ट्राच्या प्रगतीसाठीची त्यांची तळमळ आणि विनम्र स्वभाव कौतुकास्पद आहे.
— Narendra Modi (@narendramodi) July 22, 2023
मुख्यमंत्री झाल्यानंतर अनेकदा एकनाथ शिंदेंनी पंतप्रधान मोदींची भेट घेतली आहे. मात्र पहिल्यांदाच ते सहकुटुंब पंतप्रधानांना भेटण्यासाठी दिल्लीला गेले होते.