( प्रगत भारत । pragatbharat.com)
Goa Beach Sinking : गोवा… फक्त नाव जरी घेतलं तरी अनेकांच्याच चेहऱ्यावर काही असे भाव येतात जणू गोव्यात जाणं हेच त्यांचं अंतिम ध्येय्य आहे. हे ठिकाणच तसं आहे, त्यामुळं हे भाव येण्यात गैर काहीच नाही. कारण, अनेकांच्याच मते गोव्यात येताच आयुष्याचा वेग मोठ्या फरकानं मंदावतो. इथल्या स्थानिकांची आपुलकी, गोव्याची खाद्यसंस्कृती, निसर्ग आणि इतिहास कायमच पर्यटकांना आकर्षित करताना दिसतो. त्यामुळं हल्ली वर्षाचे सर्वच महिने गोवा पर्यटकांनी बहरलेलं असतं. गोव्याचे समुद्रकिनारे म्हणजे सर्वकाही… पण याच समुद्रकिनाऱ्यांचं अस्तित्वं नाहीसं झालं तर?
तुम्हीही चिंतेत पडलात ना? सध्या गोव्याची आणि गोव्यावर जीवापाड प्रेम करणाऱ्या अनेकांचीच चिंता वाढवणारी एक माहिती समोर आली आहे. जिथं गोव्याचे पर्यावरणमंत्री निलेश कबराल यांनी अपक्ष उमेदवार एलेक्सियो रेजिनाल्डो यांच्या प्रश्नाचं उत्तर देत याबाबतची माहिती दिली. समुद्रकिनारी असणारी वाळू सातत्यानं कमी होत असल्यामुळं गोव्यातील किनाऱ्यांचा ऱ्हास होत आहे.
कोणकोणच्या किनाऱ्यांना सर्वाधिक धोका?
कबराल यांनी दिलेल्या माहितीनुसार पेरनेम तालुक्यात असणाऱ्या मजोर्डा, बेतलबातिम, क्वेपेम, केरी आणि कनागिनी समुद्रकिनाऱ्यांसह बार्डेजमधील कोकोसह सालसोटेपासून मोबोर ते बेतूल पर्यंतच्या समुद्रकिनाऱ्यांवर हा धोका वाढताना दिसत आहे.
समुद्रकिनाऱ्यावरील वाळू आणि मातीचा मोठा भाग हा पाण्याच्या वेगानं समुद्रच गिळत असल्यामुळं हा धोका दिवसागणिक वाढताना दिसत आहे. 2021 मध्येच यासंदर्भातील अहवालही सादर करण्यात आला होता असं कबराल यांनी स्पश्ट केलं. जिथं राज्यस्तरीय जल प्रबंधन विभागाकडून हे निरीक्षण करण्याची जबाबदारी नॅशनल इन्स्टीट्यूट ऑफ ओशन टेक्नोलॉजी (NIOT) कडे सोपवण्यात आली होती.
काय आहे यामागचं मुख्य कारण?
समुद्राची पाणीपातळी वाढण्याचं सर्वात महत्त्वाचं कारण ठरत आहे ते म्हणजे जागतिक तापमानवाढ. गोव्यातही यामुळंच ही परिस्थिती ओढावल्याचं पाहायला मिळत आहे. नेदरलँडमध्येही हा संपूर्ण देशच समुद्रात जाण्याचा धोका उदभवला आहे. पण, तंत्रज्ञानाच्या बळावर या देशानं हे संकट थोपवून धरलं आहे.
कोणतं तंत्रज्ञान वापरतंय नेदरलँड, गोव्याला कला होईल फायदा?
गोव्यातील बिघडणारी परिस्थिती पाहता गोवा कोस्टल मॅनेजमेंट एनवायरमेंट सोसायटीनं या किनाऱ्यांची सुरक्षितता आणि बचावासाठी एक अभियान सुरु केलं असून, प्राथमिक स्तरावर नेदरलँडच्या काही संस्थांमधील तज्ज्ञांची मदत घेतली असल्याचं कळत आहे. त्यांच्याकडून गोव्याच्या किनाऱ्यांचा होणारा ऱ्हास कसा रोखता येईल याबाबतचं मार्गदर्शन केलं जाईल. याच पार्श्वभूमीव सध्या गोव्यातील समुद्रकिनाऱ्यांवर कॉन्क्रीटचे ठोकळे टाकत माती- वाळू वाहून नेण्याच्या मोठ्या प्रमाणावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला जात आहे.
नेदरलँडचं सांगावं तर, या देशाचा 26 टक्क्यांहून अधिक भाग हा समुद्रात आहे. या देशाच्या चाहुबाजूंनी अतिशय कल्पक पद्धतीनं बांधकामं करण्यात आली आहेत. यामद्ये सर्वात मोठा स्टॉर्म सर्ज बॅरिअर मेस्लेंट आहे. दोन आयफेल टॉवरच्या उंचीचे हे अडथळे असल्याचं स्पष्ट होत आहे. रॉटरहॅम या युरोपातील सर्वात मोठ्या बंदर भागात त्सुनामी, सागरी वादळ आणि तत्सम संकटांपासून रक्षण करण्यात या तंत्राची मदत होते.