देवदर्शनाला आलेली रशियन तरुणी पडली भारतीयाच्या प्रेमात, म्हणते ‘आता हेच माझं घर’

( प्रगत भारत । pragatbharat.com)

प्रेम कधी, कुठे आणि कसं कोणाला मिळेल हे सांगू शकत नाही. एखाद्या ठिकाणी अचानक झालेली भेट ही काहींना आयुष्याभराचा जोडीदार देते. असाच काहीसा अनुभव भारतात देवदर्शनासाठी आलेल्या एका रशियन तरुणीला आला आहे. 36 वर्षीय तरुणी भारत दौऱ्यावर आली असता तिला आपला जोडीदार सापडला आहे. इतकंच नाही तर तिने त्याच्याशी लग्नगाठही बांधली. हिंदू परंपरेप्रमाणे त्यांचा विवाहसोहळा पार पडला. यानंतर तिने आपल्या भारतीय पतीसह गोसेवाही केली. 

वृंदावनला धार्मिक शहर म्हणून ओळखलं जातं. अनेकांच्या ह्रदयात वृंदावनसाठी एक वेगळं महत्त्व आहे. फक्त भारतातूनच नाही तर जगभरातील असंख्य भाविकांना वृंदावन आकर्षित करत असतं. लाखो विदेशी नागरिकही वृंदावन येथे देवदर्शन तसंच मनाच्या शांतीसाठी येत असतात. त्यातच रशियामधील एक तरुणीही याच कारणासाठी वृंदावन येथे पोहोचली होती. पण यावेळी असं काही घडलं की आता तिने कायमचं तिथेच राहण्याचा निर्णय घेतला आहे. 

36 वर्षीय युनाला वृंदावनमध्ये आपल्या आयुष्यातील प्रेम सापडलं आहे. युनाची 35 वर्षीय राजकरण यांच्याशी भेट झाली होती. काही दिवसात त्यांच्यात इतके दृढ संबंध निर्माण झाले की त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. 

युनाची भगवान कृष्णावर फार भक्ती असून, वृंदावनच्या आध्यात्मिक आकर्षणाने तिला या पवित्र स्थानाकडे आकर्षित करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. येथे आली असता गेल्या दोन दशकांपासून वृंदावनमध्ये राहणाऱ्या राजकरणशी तिची भेट झाली.  राजकरण गुरूंच्या सूचनेनुसार गाईंची कर्तव्यभावनेने सेवा करतात.

युना आणि राजकरण यांनी हिंदू परंपरेप्रमाणे लग्न केलं. यानंतर युनाने वृंदावनात गोसेवाही केली. दोघंही एकत्र काम करत असताना जवळ आले होते आणि एकमेकांच्या प्रेमात पडले होते. एप्रिल 2023 मध्ये त्यांनी दिल्लीत हिंदू पद्धतीने लग्न केलं. आता दोघंही संसारात व्यग्क असून गाईंची काळजी घेत आहेत. तसंच इस्कॉन मंदिराजवळ लोकांना अन्न देत आहेत. याशिवाय त्यांना पुस्तकं आणि चंदनही देत आहेत. 

विशेष म्हणजे, राजकरण यांचं शिक्षण झालेलं नाही आणि दुसरीकडे युनाला हिंदी भाषेचं ज्ञान नाही. मात्र तरीही दोघांमधील प्रेमाची भाषा एकमेकांना समजली आहे. लग्न झाल्यापासून, युनाने भारतीय संस्कृती मनापासून स्वीकारली आहे. तिने कुंकू लावण्यापासून ते गळ्यात मंगळसूत्र घालण्यापर्यंत सर्व गोष्टी केल्या आहेत. 

त्याचप्रमाणे, स्वीडनमधील क्रिस्टन लिबर्टने प्रेमाला सीमा नाहीत हे सिद्ध केलं होतं. सुमारे 6,000 किलोमीटर अंतर पार करत ती आपल्या प्रेमसाठी भारतात पोहोचली होती. उत्तर प्रदेशातील एटा येथील पवन कुमारशी तिची फेसबुकवरुन भेट झाली होती.

Related posts