एकत्र स्वातंत्र्य मिळूनही पाकिस्तान भारताच्या एक दिवस आधीच 14 ऑगस्टला स्वातंत्र्यदिन का साजरा करतं?

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Pakistan Independence Day: भारत 15 ऑगस्टला आपला 77 वा स्वातंत्र्यदिन साजरा करणार आहे. तर दुसरीकडे पाकिस्तानमध्ये आज स्वातंत्र्यदिन साजरा केला जात आहे. पण, एकत्र स्वातंत्र्य मिळालेलं असतानाही आपला शेजारी देश पाकिस्तान एक दिवस आधी म्हणजेच 14 ऑगस्टला स्वातंत्र्यदिन साजरा का करतं? हा प्रश्न तुम्हालाही पडला असेल ना. इंग्रजांनी भारत आणि पाकिस्तानमध्ये 15 ऑगस्टला स्वातंत्र्याची घोषणा केली होती. पण असं असतानाही पाकिस्तान मात्र 14 ऑगस्टलाच स्वातंत्र्यदिन साजरा करतं. यामागे एक मोठा इतिहास असून, तो आज जाणून घेऊयात. 

पाकिस्तानचा स्वातंत्र्यदिन नेमका कधी?

इतिहासाची पानं चाळली तर पाकिस्तानचा स्वातंत्र्यदिन नेमका कधी आहे यावरुन थोडा संभ्रम असल्याचं दिसतं. याचं कारण अनेक दस्तावेजांवर 15 ऑगस्ट 1947 याच तारखेची नोंद आहे. पाकिस्तानात 1948 साली छापण्यात आलेल्या टपाल तिकीटावरही पाकिस्तानचा स्वातंत्र्य दिवस म्हणून 15 ऑगस्ट 1947 याच तारखेची नोंद आहे. याशिवाय भारत आणि पाकिस्तानच्या स्वातंत्र्याचा उल्लेख असणाऱ्या ‘द ट्रान्सफर ऑफ पॉवर’ या ग्रंथातही हिच तारीख लिहिण्यात आली आहे. 

लॉर्ड माऊंटबॅटन यांचा गोंधळ

ब्रिटिश सरकारने पाकिस्तान आणि भारत या दोन्ही देशांना 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य बहाल करण्यात येईल अशी घोषणा केली. यानंतर भारताचे शेवटचे व्हॉईसरॉय लॉर्ड माऊंटबॅटन यांच्याकडे दोन्ही देशांकडे सत्ता सोपवण्याची जबाबदारी सोपवण्यात आली होती. इथेच नेमकी त्यांची अडचण झाली. लॉर्ड माऊंटबॅटन हे ब्रिटीश सत्तेतील भारताचे शेवटचे आणि एकमेव प्रतिनिधी होते. 

लॉर्ड माऊंटबॅटन यांना दोन्ही देशांकडे एकाच वेळी सत्ता सोपवायची असली तरी एकाच वेळी दिल्ली आणि कराचीतही उपस्थित राहणं त्यांना शक्य नव्हतं. तसंच जर त्यांनी भारताकडे सत्ता सोपवून पाकिस्तान गाठलं असतं तर ते गव्हर्नर जनरल राहिले नसते. ज्यामुळे त्यांच्याकडे दुसऱ्या देशाला सत्ता सोपवण्याचा अधिकार राहिला नसता. यामुळे त्यांनी प्रथम पाकिस्तानात जाऊन सत्ता सोपवण्याचा निर्णय घेतला.
लॉर्ड माऊंटबॅटन 13 ऑगस्ट 1947 ला कराचीत गेले. 14 ऑगस्टला सकाळी त्यांनी पाकिस्तानमध्ये संविधान सभेला संबोधित करत सत्ता हस्तांतरित केली. आज रात्री म्हणजे 14 आणि 15 ऑगस्टच्या मध्यरात्री पाकिस्तान स्वतंत्र देश असेल अशी घोषणाही यावेळी त्यांनी केली. 

मोहम्मद जिन्ना यांनीही त्यांच्या भाषणात 15 ऑगस्ट हाच स्वातंत्र्यदिन म्हणून उल्लेख केला होता. याशिवाय डॉन वृत्तपत्रानेही 15 ऑगस्ट याच तारखेचा स्वातंत्र्यदिन म्हणून उल्लेख केला होता. पण नंतर अचानकपणे या तारखेत बदल करत पाकिस्तान 14 ऑगस्टला स्वातंत्र्यदिन साजरा करु लागला. 

पाकिस्तानच्या पहिल्या मंत्रिमंडळाने 14 ऑगस्टला स्वातंत्र्यदिन साजरा करण्याचा निर्णय घेतला आणि त्याला बॅरिस्टर जिन्ना यांनीही समर्थन दिलं. त्यानंतर पाकिस्तानने 14 ऑगस्ट 1948 ला आपला पहिला स्वातंत्र्यदिन साजरा केला. तेव्हापासून त्यांची ही परंपरा तशीच सुरु आहे. पण इतिहास आणि ऐतिहासिक दस्तावेज मात्र पाकिस्तानच्या स्वातंत्र्य दिनाची तारीख 15 ऑगस्टच असल्याचं दर्शवत आहेत 

रमजानचा संबध

पाकिस्तान 14 ऑगस्टला स्वातंत्र्यदिन साजरा करण्यामागे रमजानचाही संदर्भ दिला जातो. 14 ऑगस्ट 1947 रोजी रमजानचा 27 वा दिवस होता. याच दिवशी ‘शब-ए-कद्र’ साजरी करण्यात येते. या दिवशी कुराण पूर्ण झाली होती, त्यामुळे ती पवित्र रात्र मानली जाते. पण पण, कॅलेंडर बघितलं तर लक्षात येतं की, त्या दिवशी गुरुवार होता. आणि रमजानचा 27वा नाही तर 26वा दिवस होता.

Related posts