तुटून पडणारे डोंगर अन् कोलमडणाऱ्या इमारती…; हिमाचल- उत्तराखंडमध्ये वरुणराजाच ठरतोय काळ; दृश्य पाहून बसेल धक्का

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Uttarakhand, Himachal Rain : महाराष्ट्रात पावसानं काहीशी विश्रांती घेतलेली असतानाच तिथं देशाच्या उत्तरेकडील राज्यांमध्ये मात्र पाऊस धुमाकूळ घालताना दिसत आहे. आयएमडी, अर्थात भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या माहितीनुसार हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये पुढील चार दिवस अतीवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. तर बहुतांश भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह, मेघगर्जनेत पाऊस बरसणार आहे. उत्तराखंडमध्ये 19 20 तारखेपर्यंत पाऊस थैमान घालणार आहे. 

सध्याच्या घडीला समोर आलेल्या माहितीनुसार हिमाचलमध्ये पावसामुळं नद्यांना उधाण आलं असून, पूरस्थिती कायम आहे. आतापर्यंत इथं विविध भागांमध्ये पुरामुळं 71 जणांचा मृत्यू ओढावला आहे. तर, तब्बल 10 हजार कोटी रुपयांची वित्तहानी झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. स्थानिक प्रशासन आणि एनडीआरएफकडून या ठिकाणी असणाऱ्या पूरप्रभावित क्षेत्रांमध्ये बचावकार्याला वेग आला आहे. 

उत्तराखंडमध्ये यलो अलर्ट… 

तिथं उत्तराखंडमध्येही परिस्थिती वेगळी नाही. हवामान विभागानं या भागात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवली असून, देहरादून, टिहरी, पौड़ी, नैनीताल, बागेश्वर, चंपावत आणि पिथोरगढ या भागांसाठी पावसाचा यलो अलर्ट दिला आहे. पावसाचं एकंदर चित्र पाहता या भागात सध्या चारधाम यात्रा मार्गही प्रभावित झाला असून, यात्राही थांबवण्यात आली आहे. 

अतिप्रचंड पावसामुळं उत्तराखंडमध्ये अनेक भागांमध्ये भूस्खलनाच्या घटना घडल्या असून, सर्वत्र चिखलाचं साम्राज्य पाहायला मिळत आहे. इथं सुरु असणाऱ्या पावसामुळं 323 रस्त्यांवरीह वाहतूक पूर्णपणे बंद आहे. यामध्ये 12 राज्य महामार्ग, 7 मुख्य जिल्हा मार्ग, 9 इतर जिल्हा मार्ग, 135 ग्रामीण पथ आणि 160 पीएमजीएसवाई रस्त्यांचा समावेश आहे. 

Related posts