एकाच कुटुंबातील तीन मुलींचा मृत्यू; 7 जण गंभीर, भोपळ्याच्या भाजीमुळं आक्रित घडलं?

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Food Poisoning News: एकाच घरातील तीन मुलांचा धक्कादायकरित्या मृत्यू झाला आहे तर, याच घरातील सात सदस्यांची प्रकृती गंभीर असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हरियाणातील रोहतक येथील बालंद गावातून ही घटना समोर येत आहे. समोर आलेल्या माहितीनुसार कुटुंबातील सदस्यांची ही अवस्था जेवण झाल्यानंतर झाली आहे. रात्रीच घरातील सदस्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आली आहे. तर, तीन मुलांचा मात्र दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

कुटुंबीयांना 15 ऑगस्ट रोजी घरात भोपळ्याची भाजी (पेठे की सब्जी) बनवली होती. ती खाल्ल्यानंतरच सगळ्यांची प्रकृती बिघडली होती. राकेश आणि राजेश दोघे सख्खे भाऊ एकाच घरात राहत आहेत. राकेश शेतीची कामे करतो. राजेश ट्रान्सपोर्टमध्ये काम करतो. राजेश यांना 4 मुली आहेत. तर, छोटा भाऊ राकेशला 4 वर्षांचा एक मुलगा असून त्याचे नाव जतिन आहे. मंगळवारी संपूर्ण कुटुंबाने एकत्र बसून जेवण केले होते. तेव्हा जेवणात भोपळ्याची भाजी होती. बुधवारी सकाळीही रात्रीचे उरलेले शिळे अन्न त्यांनी खाल्ले होते. 

दुपारचे जेवणे जेवल्यानंतर एक-एक करुन घरातील सदस्य आजारी पडू लागले, सगळ्यांना चक्कर आणि उलटीचा त्रास सुरू झाला. घरातील सदस्यांची तब्येत  जास्त खराब झाल्यानंतर त्यांना शहरातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिचे त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र उपचारादपम्यान बुधवारी रात्री राजेशच्या तीन मुली दिया, लक्षिता आणि 1 वर्षांची ख्याती हिचा मृत्यू झाला. 

डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार फुड पॉइझनमुळं तिघांचा मृत्यू झाल्यांचे समोर आले आहे. मृतांची  7 वर्षीय दिया, 5 वर्षीय लक्षिता आणि 1 वर्षांची ख्याति अशी नावे आहेत. तर, कुटुंबातील इतर सदस्य कृष्ण, राजेश, सीमा, राकेश, मोनिका, ५ वर्षीय कनिका आणि ४ वर्षीय जतिन यांची प्रकृती गंभीर आहे. सगळ्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

दरम्यान, पोलिसांकडून या प्रकरणी सखोल चौकशी करण्यात येत आहे. कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला असून तिघीही मुली आहेत. घरातील इतर सदस्यांवर उपचार सुरू आहेत. आता कोणीही बोलण्याच्या मनस्थितीत नाहीयेत. लवकरच त्यांचा जबाब घेण्यात येणार आहे. तसंच, अन्नाचे नमुनेही घेतले जाणार आहेत, असं शिवाजी कॉलनी पोलिस स्टेशनचे तपास अधिकारी अशोक कुमार यांनी सांगितले आहे. 

Related posts