दानपेटीत मिळाला 100 कोटींचा चेक; वटवण्यासाठी बँकेत पोहोचल्यानंतर मंदिर प्रशासनाला बसला धक्का

( प्रगत भारत । pragatbharat.com)

मंदिर हे श्रद्धेचं, प्रार्थनेचं ठिकाण असून अनेकजण गुप्तदान करत देवाप्रती आपली श्रद्धा व्यक्त करत असतात. काही भक्त हे दान जाहीरपणे करतात, तर काहीजण मात्र आपलं नाव समोर येणार नाही याची काळजी घेत गुप्तपणे करतात. यामध्ये सोने, चांदी किंवा करोडो रुपये असतात. दरम्यान, विशाखापट्टणम येथील एका मंदिरात भक्ताने तब्बल 100 कोटींचा चेक दानपेटीत टाकला होता. पण जेव्हा मंदिर प्रशासन बँकेत पोहोचल तेव्हा त्यांना धक्काच बसला. बँकेत असलेली रक्कम पाहून  मंदिर प्रशासनाचा विश्वासच बसत नव्हता. 

आंध्र प्रदेशच्या विशाखापट्टणम येथे ही अजब घटना घडली आहे. येथे एका भक्ताने दानपेटीत चक्क 100 कोटींचा चेक टाकला होता. पण मंदिर प्रशासनाने चेक वटवण्यासाठी बँकेशी संपर्क साधला तेव्हा त्यांना आश्चर्याचा धक्का बसला. याचं कारण चेकवर ज्या बँक खात्याचा क्रमांक होता त्यामध्ये फक्त 17 रुपये शिल्लक होते. यानंतर या चेकचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तसंच युजर्सही यावर वेगवेगळ्या कमेंट करत आहेत. 

विशाखापट्टणमच्या सिम्हाचलम मधील श्री वराह लक्ष्मी नरसिम्हा स्वामी वारी देवस्थानम मंदिरात हा प्रकार घडला आहे. इतर मंदिरांप्रमाणे या मंदिरातील दानपेटीची काही ठराविक वेळाने प्रशासन पाहणी करत होतं. यावेळी नोटांच्या ढिगाऱ्यात मंदिर प्रशासनाला एक चेकही दिसला. दरम्यान, हा चेक पाहिला असता त्यावर लिहिलेली रक्कम पाहून सगळेच आश्चर्यचकित झाले. कारण या चेकवर 100 कोटींची रक्कम लिहिली होती. ही रक्कम पाहिल्यानंतर मंदिर प्रशासनही आनंदी झालं होतं. 

खात्यात फक्त 17 रुपये

यानंतर मंदिर प्रशासनाचे लोक चेक वटवण्यासाठी बँकेत दाखल झाले होते. हा चेक कोटक महिंद्रा बँकेचा होता. या चेकवर नमूद असलेल्या खाते क्रमाकांची पाहणी करण्यात आली असता, मंदिर प्रशासन चक्रावलं. कारण चेकवर 100 कोटी लिहिले असले तरी त्या खात्यात फक्त 17 रुपये होते. यामुळे मंदिर प्रशासनाच्या अपेक्षांवरही फोल ठरल्या. 

हे प्रकरण सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे. तसंच 100 कोटींच्या चेकचे फोटोही समोर आले आहेत. दरम्यान याप्रकरणी कोणतीही पोलीस तक्रार दाखल करण्यात आलेली नाही. कोणीतरी मुद्दामून चेकवर रक्कम लिहून दानपेटीत टाकला असावा अशी शंका आहे. 

Related posts