मोदी पुण्यातून लोकसभा निवडणूक लढवणार? भाजपाने स्पष्टच सांगितलं की…

( प्रगत भारत । pragatbharat.com)

BJP On PM Modi Contesting Pune Lok Sabha Election: केंद्र सरकारने 18 ते 22 सप्टेंबदरम्यान संसदेचं 5 दिवसांचं विशेष अधिवेशन बोलवण्यात येत असल्याची घोषणा गुरुवारी केली. केंद्रीय संसदीय कामकाजमंत्री प्रल्हाद जोशी यांनी सोशल नेटवर्किंगच्या माध्यमातून ही घोषणा केली असून या विशेष अधिवेशनामागचा हेतू स्पष्ट करण्यात आलेला नसल्याने चर्चांना उधाण आलं आहे. त्यातच ‘एक देश, एक निवडणूक’, समान नागरी संहिता त्याचप्रमाणे महिलांच्या आरक्षणासंदर्भातील विधेयकांसाठी हे अधिवेशन बोलावल्याची चर्चा आहे. अशाच एका शक्यतेनुसार लोकसभेची मुदत पूर्ण होण्याआधीच या वर्षाच्या शेवटी लोकसभा निवडणूक होईल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणामध्ये थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी पुणे विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची चर्चाही सुरु झाली आहे. याचसंदर्भात आता भारतीय जनता पार्टीने स्पष्टीकरण दिलं आहे. 

कशी सुरु झाली चर्चा?

केंद्र सरकारने अचानक बोलावलेलं विशेष अधिवेशन, मुदत पूर्ण होण्याआधीच लोकसभा निवडणूक होणार असल्याची शक्यता या सर्व पार्श्वभूमीवरच लोकसभेच्या निवडणुकीसाठी आढावा घेणाऱ्या भाजपाच्या कमिटीचा अहवाल वरिष्ठांकडे पाठवण्यात आल्याची बातमी राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चेला आली. या अहवालामध्ये
मोदींसाठी पुणे लोकसभा मतदारसंघाची चाचपणी झाली आणि परिस्थिती यासाठी सकारात्मक असल्याचं सांगण्यात आल्याच्या बातम्या काही प्रसारमाध्यमांनी चालवल्या. उत्तर प्रदेशनंतर मोदींचं मिशन महाराष्ट्र असणार का अशीही चर्चा या अहवालाच्या हवाल्याने सुरु झाली.

मोदी पुण्यातून लढल्यास फायद्याचीही चर्चा

मोदी पुण्यातून लढल्यास भाजपाला अधिक फायदा होईल. मोदी पुण्यातून लढत असल्याने महाराष्ट्रात भाजपा अधिक सक्रीय होईल असं यासंदर्भात बोलताना सांगितलं गेलं. मोदी पुण्यातून लढले तर महाविकास आघाडीला मजबूत टक्कर मिळेल. महाराष्ट्रातील भाजपाच्या आणि मित्र पक्षांच्या लोकसभेच्या जागा वाढतील असंही सांगण्यात आलं. भाजपासाठी पुण्यातील वातावरण अनुकूल असल्याचंही अहवालात असल्याचं सांगितलं गेलं.

नक्की वाचा >> ‘आपण गणपतीपेक्षा मोठे आहोत असं समजू नका’; विशेष अधिवेशावरुन आव्हाडांचा टोला

भाजपाने दिलं स्पष्टीकरण

मात्र भारतीय जनता पार्टीचे नेते संजय काकडे यांनी ‘झी 24 तास’शी बोलताना हे वृत्त फेटाळून लावलं आहे. पुणे लोकसभा जागा पंतप्रधान मोदी लढवतील यासंदर्भातील बातम्यांमध्ये तथ्य नाही, असं भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी सांगितलं आहे. पंतप्रधान मोदी पुणे लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची माहिती राजकीय गॉसिप असून त्यात कोणत्याही प्रकारचं तथ्य नसल्याची माहिती काकडेंनी ‘झी 24 तास’ला दिली.

मोदी 2 मतदारसंघांमधून लढले

नरेंद्र मोदी 2012 साली वाराणसी आणि वडोदरा मतदारसंघांमधून निवडणूक लढले होते. तर 2019 साली नरेंद्र मोदी वाराणसीमधून मोदी लढले होते. गिरीश बापट यांच्या निधनानंतर लोकसभेची जागा रिक्त आहे. मात्र या ठिकाणी पोटनिवडणूक होण्याची शक्यता कमी आहे. 

Related posts