( प्रगत भारत । pragatbharat.com)
मध्य प्रदेशच्या जबलपूर येथे पोलिसांनी महिलांच्या एका टोळीला अटक केली आहे. महिलांची ही टोळी रेल्वे स्थानकांवर सोने, चांदीचे दागिने चोरी करत असत. यानंतर त्या शेतामध्ये खड्डा करुन हे सर्व दागिने त्यात लपवत असत. पोलिसांनी तब्बल 12 महिलांना याप्रकरणी अटक केली आहे. तसंच त्यांच्याकडून चोरीचा सर्व मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलीस सध्या सर्व महिलांची चौकशी करत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, महिलांची ही टोळी नागपूरमधील आहे. रेल्वे पोलिसांनी या टोळीचा पर्दाफाश करत त्यांचे गुन्हे उघड केले आहेत. पोलिसांनी सांगितलं आहे की, मध्य प्रदेशात वास्तव्य करत या महिला रेल्वे स्थानकांवर चोरी करत होत्या. या टोळीतील 12 महिलांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत..
या महिलांनी काही दिवसांपूर्वी गाडरवारा रेल्वे स्थानकावर एका महिलेला लुटलं होतं. रेल्वेच्या पोलीस अधिक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार, रक्षाबंधनाच्या दिवशी गाडरवारा रेल्वे स्थानकावर महिलेचे दागिने चोरण्यात आले होते. याप्रकरणी तक्रार मिळाल्यानंतर रेल्वे पोलीस सतर्क झाले होते. यानंतर पोलिसांनी संशयितरित्या वावरणाऱ्या 12 महिलांना ताब्यात घेत त्यांची चौकशी केली होती.
रेल्वे पोलीस अधिक्षक सिमाला प्रसाद यांनी सांगितलं की, चौकशीदरम्यान आरोपी महिलांनी गाडरवाराच्या महिलेला लुटल्याची कबुली दिली होती. पोलिसांना जेव्हा त्यांची अजून कसून चौकशी केली तेव्हा आणखी काही धक्कादायक खुलासे झाले.
महिलांची ही टोळी नागपूरच्या भगवानपूर येथे राहणारी आहे. फार सहजपणे त्या या चोरी करत होत्या. त्यांच्याविरोधात खंडवा, गाडरवारा सहित अन्य ठिकाणी चोरीप्रकरणी वॉरंट जारी झाला आहे. पोलीस मागे अनेक काळापासून त्यांचा शोध घेत होते.
महिलांनी एक डझनहून अधिक चोरी केल्याची कबुली दिली आहे. त्यांच्याकडून 6 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलिसांनी चौकशी केली असता, महिलांनी चोरीचा माल शेतात लपवला असल्याची कबुली दिली.
यानंतर महिलांनी दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी शेतात खोदून पाहिलं असता तिथे दागिने लपवले असल्याचं दिसलं. महिलांनी चोरीचा मुद्देमाल जमिनीच्या आत लपवून ठेवला होता. यानंतर रेल्वे पोलिसांनी सर्व पोलीस स्थानकांना या महिला टोळीची माहिती दिली असून अलर्ट केलं आहे. महिलांच्या चौकशीत आणखी काही धक्कादायक खुलासे होऊ शकतात असं पोलिसांचं म्हणणं आहे.