लडाखवरून परतताच राहुल गांधी यांनी शेअर केला नवा Video; आरोप नव्हे, पण सत्ताधाऱ्यांचं वास्तव समोर आणत म्हणाले…

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Rahul Gandhi Ladakh Trip : ‘भारत जोडो यात्रा’ पहिल्या टप्प्यात यशस्वी ठरल्याचं पाहिल्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी (Congress) यांनी आता याच यात्रेच्या दुसऱ्या टप्प्यासाठी प्रवास करणार असल्याची चिन्हं सुचवली आणि त्या रोखानं प्रवासही सुरु केला. संसदेत त्यांनी लडाखला भेट दिली नसल्याचा मुद्दा विरोधकांनी उचलला आणि पुढच्या काही दिवसांतच राहुल गांधी थेट लडाखला पोहोचल्याचं पाहायला मिळालं. 

दुचाकीवरून त्यांनी लडाखमधील गावांना भेट दिली. शाळकरी मुलांपासून लडाखमधील स्थानिक नागरिकांपर्यंत, तरुण वर्गापासून वयोवृद्धांपर्यंत सर्वांचीच भेट घेतली आणि त्यांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला. एक नेता म्हणून नव्हे तर, त्यांच्यातलंच कुणीतरी आपुलकीनं विचापूस करतंय अशाच भूमिकेत गांधी यांनी हा दौरा पूर्ण केला आणि त्यानंतर या दौऱ्यातील काही खास क्षणही सर्वांच्या भेटीला आणले. 

राहुल गांधींनी नकळतच विरोधकांवर साधला निशाणा… 

नुकताच राहुल गांधी यांनी एक व्हिडीओ त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून शेअर केला. जिथं त्यांनी लडाख, तिथलं निसर्ग सौंदर्य आपल्याला किती भावलं हे शब्दांत मांडलं आणि ओघाओघानं विरोधकांवर निशाणाही साधला. 

‘माझे वडील कायम सांगायचे की, पँगाँग त्सो लेक ही पृथ्वीवरील सर्वात सुंदर जागा आहे. तेव्हापासून मी तिथं जाण्याची इच्छा व्यक्त करत राहिलो. आता जेव्हा मी भारत जोडो यात्रा पुढे नेत आहे, तेव्हा लडाखला दुचाकीनं भेट देण्याहून वेगळा पर्याय नसेल असाच विचार मी केला’, असं लिहित त्यांनी लडाखी नागरिकांकडून मिळालेल्या प्रेमाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. लडाखविषयी त्यांच्या मनातील प्रेम अतुलनीय असल्याचंही ते म्हणाले. 

 

लडाख हा देशासाठी एका मौल्यवान दागिन्याहून कमी नाही, असं म्हणताना इथल्या नागरिकांचा झालेला विश्वासघात पाहून आपल्यालाही दु:ख झाल्याचं ते म्हणाले. लडाखच्या भूभागावर चीनचं अधिपत्य असल्याची खोटी बाब सांगत पंतप्रधानांकडून नागरिकांची फसवणूक झाल्याचंही त्यांनी इथं स्पष्ट केलं. 

येथील नागरिकांना प्रोत्साहन देणं अपेक्षित असून, लडाखमगध्ये एका चांगल्या प्रशासनाची गरज त्यांनी इथं अधोरेखित केली. लडाखचा आवाद केंद्रापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचा विश्वास राहुल गांधी यांनी व्यक्त केला. त्यांच्या या व्हिडीओला आतापर्यंत 439.2k इतके  व्ह्यूज मिळाले असून, हा आकडा वाढतच आहे. शिवाय त्यांच्या या व्हिडीओवर आणि त्यांनी मांडलेल्या भूमिकेवरही अनेकांनीच आपली मतंही मांडली आहेत. 

Related posts