ISRO च्या माजी प्रमुखांकडून चांद्रयान 3 बाबतची मोठी अपडेट, ‘अजून तरी कहाणीचा शेवट नाही!’

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Chandrayaan 3 Latest Update : भारतीय अंतराळ संशोधन संस्थेनं जुलै महिन्याच्या 14 तारखेला चांद्रयान 3 अवकाशात पाठवलं. चंद्राच्या दक्षिण ध्रुवाच्या दिशेनं या चांद्रयानाचा प्रवास सुरु झाला आणि पाहता पाहता 45 दिवसांच्या प्रवासानंतर हे यान चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचलं. चांद्रयानाच्या विक्रम लँडरनं चंद्राच्या भूमीला स्पर्श केला आणि जागतिक स्तरावर या यशाची नोंद झाली. पुढं लँडरमधून प्रज्ञान रोवर बाहेर पडला आणि त्यानंही चंद्रावर मुक्त संचार सुरु केला. पुढल्या 14 दिवसांसाठी चंद्रावरील लहानमोठी माहिती लँडर आणि रोवर पाठवत राहिले. पण, त्यानंतर मात्र ते शांत झाले.

यामागचं कारण होतं, चंद्रावर झालेली रात्र. इस्रोच्या यानातील ही उपकरणं सौरउर्जेवर कार्यान्वित होणारी असल्यामुळं तिथं पृथ्वीपासून कैक मैल दूर सूर्यास्त झाला आणि त्यांच्या हालचालीही शमल्या. आता पुन्हा एकदा चंद्रावर सूर्याची किरणं पोहोचली असून, चांद्रयानातील विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोवर पुन्हा जागे होणार का याकडेच संपूर्ण जगाचं लक्ष लागलं आहे.

इथं सर्वांची उत्सुकता शिगेला पोहोचली असतानाच इस्रोचे माजी प्रमुख आणि चांद्रयान 2 मोहिम हाताळणाऱ्या के. शिवन यानी काही महत्त्वाच्या गोष्टी स्पष्ट करत आश्वासक वक्तव्य केलं

 

‘आपल्याला आता वाट पाहावी लागणार आहे. कारण ते (लँडर आणि रोवर) चंद्रावरील रात्रीला सामोरे गेले आहेत. आता तिथं दिवस सुरु झाला आहे. त्यामुळं आता लँडर आणि रोवर पुन्हा जागे होण्याचा प्रयत्न करतील. आतापर्यंत त्यांच्यामध्ये असणारी यंत्रणा व्यवस्थित कार्यरत असल्याच पुढील प्रक्रियाही सुकर असेल. हाच कहाणीचा शेवट नाही आहे’, असं ते म्हणाले.

सर्वकाही संपलं असं नाही, हे सांगताना भविष्यात नव्यानं विज्ञान प्रगती करेल असा विश्वास व्यक्त केला. चांद्रयान 1 मधून मिळणारी माहिती आजही वापरली जात असून, त्या माध्यमातून अनेक गोष्टी आजही साध्य झाल्या आहेत. त्यामुळं नव्या गोष्टी नक्कीच प्रकारशात येतील असं म्हणताना ही गोष्ट इथंच थांबत नाही हा मुद्दा त्यांनी अधोरेखित केला.

 

Related posts