एक्सप्रेसवर दरोडा! महिलांचे दागिने खेचले, पुरुषांना रक्तबंबाळ केलं, लहान मुलांना उलटं पकडून…

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Muri Express Robbery:  झारखंडमधील लतेहार येथे एका ड्रेनवर दरोडेखोरांनी हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हल्लेखोरांनी केवळ प्रवशांचे पैसे आणि सामन चोरलं असं नाही तर त्यांना बेदम मारहाणही केली. या हल्ल्यात अनेक प्रवाशी जखमी झाले आहेत. अनेकजण अगदी रक्तबंबाळही झाले. हा हल्ला बरकानाना रेल्वे क्षेत्रामधील बरवाडीह आणि छिपादोहर रेल्वे स्थानकांदरम्यान झाला.

महिलांची छेडही काढली

मूरीवरुन जम्मूतवीला जात असलेली मूरी एक्सप्रेस ट्रेन लातेहार आणि बारवाडीह स्थनकांदरम्यान असतानाच दरोडेखोरांनी ट्रेनवर हल्ला केला. दरोडेखोरांनी या ट्रेनमधील अनेक प्रवाशांना बेदम मारहाण केली. हा हल्ला रात्री 12 ते 1 दरम्यान झाला. सर्व दरोडेखोर हे लातेहार रेल्वे स्टेशनवर ट्रेनमध्ये चढले होते. प्रवाशांनी दिलेल्या माहितीनुसार, 7 ते 8 दरोडेखोरांनी हा हल्ला केला. ही ट्रेन लातेहारमध्ये रात्री 11 वाजता पोहोचली. ट्रेनचे दरवाजे उघडण्यात आल्यानंतर दरोडेखोर ट्रेनमध्ये शिरले आणि त्यांनी मारहाण, लूटमार सुरु केली. त्यांनी एस 9 डब्यामध्ये बसलेल्या महिलांची छेडही काढली. त्यांच्याबरोबरच दुर्व्यवहारही या दरोडेखोरांनी केला. 

डब्यात 8 ते 10 गोळ्या झाडल्या

प्रवाशांना धमकावून सामानाची लूटमार करण्याच्या हेतूने दहशत पसरवण्याच्या दृष्टीने या दरोडेखोरांनी ट्रेनच्या डब्यात हवेमध्ये 8 ते 10 गोळ्या झाडल्या. प्रवाशांकडील मैल्यवान वस्तू, पैसे आणि सामान चोरल्यानंतर दरोडेखोर बरवाडीह स्टेशनवर चैन उढून उतरले. डाल्टेनगंज स्टेशनवर ट्रेन पोहोचली तेव्हा प्रवाशांनी घडलेल्या प्रकारासंदर्भात रेल्वे स्थानकातील मास्तरांना आणि अधिकाऱ्यांना जाब विचारण्यास सुरुवात केली. यावरुन बराच आरडाओरड, बाचाबाची झाल्याने गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. डाल्टेनगंज स्टेशनवर 2 तासांहून अधिक काळ ट्रेन थांबवून ठेवण्यात आली होती. 

विश्व हिंदू परिषदेच्या नेत्यालाही मारहाण

विश्व हिंदू परिषदेचे लातेहार जिल्हा मंत्री विकास मित्तल हे सुद्धा या ट्रेनने प्रवास करत होते. त्यांच्याकडील 17 हजार रुपयांवर दरोडेखोरांनी डल्ला मारला. त्यांनाही मारहाण करण्यात आली. मित्तल हे त्यांच्या कुटुंबियांसोबत वैष्णोदेवीला जात होते. सर्व जखमी प्रवाशांवर डाल्टेनगंज रेल्वे स्थानकामध्ये उपचार करण्यात आले. सध्या पोलीस या प्रकरणाची चौकशी करत असून दरोडेखोरांचा शोध सुरु आहे. मात्र ट्रेनच्या सुरक्षेमध्ये अशाप्रकारचा बेजबाबदारपणा फारच संतापजनक असल्याचं प्रवाशांचं म्हणणं आहे. या लुटमारीमध्ये दरोडेखोरांनी लाखो रुपयांचा मुद्देमाल चोरल्याचा प्रवाशांचा दावा आहे.

बाळाला उलटं पकडून धमकावलं, महिलांच्या अंगावरील दागिने खेचले

संभळपूरवरुन मिर्झापूरला जाणाऱ्या फिरोज अहमद नावाच्या प्रवाशाने दिलेल्या माहितीनुसार, दरोडेखोरांनी चेहऱ्यावर काळ्या रंगाचं कापड बांधलं होतं. त्यांच्या हातात बंदुका होत्या. दरोडेखोरांनी अनेकांच्या पार्स आणि पैसे लुटले. सोन्याचे दागिनेही लुटले. अनेक महिलांच्या अंगावरील सोन्याचे दागिने खेचून घेतले. रायबरेली येथील रहिवाशी असलेल्या महेश यांनी दिलेल्या माहितीनुसार दरोडेखोरांनी त्यांच्याकडी 30 हजार रुपये खेचून घेतले. महेश यांच्या पत्नीचे दागिनेही दरोडेखोरांनी लुटले. विरोध केला असता महेश यांच्या लहान मुलाला उलटं पकडून धमकावण्यात आलं. घाबरलेल्या अनेक महिलांनी जीवाच्या भीतीने स्वत: दागिने काढून या दरोडेखोरांना दिले.

जवान आणि सुरक्षा डब्यात का नव्हती?

सामान्यपणे रेल्वेच्या डब्यांमध्ये सीआरपीएफ म्हणजेच केंद्रीय रेल्वे पोलिसांचे जवान तैनात असतात. मग याच डब्यात जवान कसा नव्हता? दरोडेखोरांना याची कल्पना होती का? नेमका हा डाका कसा टाकण्यात आला याची चौकशी सध्या पोलीस करत आहेत.

Related posts