बाप्पा पाहतोयस ना! गणपती विसर्जनात DJ च्या तालावर नाचता नाचता राडा, पोरांनी लाथा-बुक्क्यांनी तुडवलं

( प्रगत भारत । pragatbharat.com)

सध्या गणेशोत्सव सुरु असून आता आगमानाचा दिवसही उजाडला आहे. गुरुवारी महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात गणपतीच्या विसर्जनासाठी तयारी सुरु झाली आहे. दरम्यान, त्याआधी दीड, पाच आणि सात दिवसांच्या गणपतीचं भक्तांनी वाजतगाजत विसर्जन केलं आहे. सार्वजनिक मंडळं तर मिरवणूक काढत आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देतात. यादरम्यान विसर्जनाला गोलबाट लावणाऱ्या काही घटनाही घडतात. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये विसर्जन सोडून तरुण हाणामारी करत असल्याचं दिसत आहे. 

सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये काही तरुण ट्रॅक्टर चालकाला मारहाण करताना दिसत आहे. विसर्जन मिरवणूक जात असतानाच ट्रॅक्टर ड्रायव्हरने दुचाकीला धडक देत फरफटत नेलं. यानंतर विसर्जनात सहभागी तरुणांनी चालकाला खाली खेचलं आणि बेदम मारहाण केली. उत्तर प्रदेशच्या गाजियाबादमध्ये ही घटना घडली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी कोणीही तक्रार दाखल केलेली नाही. जर कोणी तक्रार दाखल केली, तर कारवाई केली जाईल. सध्या दोन्ही पक्षांनी आपापसात प्रकरण मिटवलं आहे. 25 सप्टेंबरच्या रात्री ही घटना घडली आहे. सात दिवसांच्या गणपतीचं विसर्जन केलं जात असताना हा प्रकार घडला होता. 

डीजेवर नाचता नाचता अचानक ट्रॅक्टर चालकाला मारहाण

व्हिडीओत दिसत आहे की, गणपती विसर्जनानिमित्त रस्त्यावरुन मिरवणूक निघालेली असते. यावेळी विसर्जन मिरवणुकीत तरुण बेभान होऊन नाचत होते. त्याचवेळी एक ट्रॅक्टर वेगाने येतो. ट्रॅक्टर एका दुचाकीला धडक देतो आणि तिला फरफटत घेऊन जातो. बाईकस्वाराने उडी मारल्याने त्याचा जीव वाचतो. दरम्यान हा अपघात पाहिल्यानंतर मिरवणुकीत नाचणारे तरुण ट्रॅक्टर चालकावर तुटून पडतात. ते चालकाला खेचून खाली घेतात आणि बेम मारहाण करतात. 

रस्त्याच्या मधोमध ट्रॅक्टर चालकाला मारहाण सुरु होते. यादरम्यान, ट्रॅक्टरमध्ये बसलेल्या इतरांनाही खाली उतरवलं जातं. या हाणामारीमुळे रस्त्यावर काही क्षणांसाठी गोंधळ उडतो. रस्त्याच्या मधोमध राडा सुरु झाल्याने वाहतुकीचाही खोळंबा होतो. यादरम्यान काही लोक पोलिसांना फोन करुन घटनेची माहिती देतात. घटनास्थळी दाखल झाल्यानंतर पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. 

दरम्यान याप्रकरणी दोन्ही बाजूंकडून कोणीही तक्रार दाखल केलेली नाही. यामुळे पोलिसांनी कारवाई केलेली नाही. दोन्ही पक्षांनी आपापसात प्रकरण मिटवलं आहे.

Related posts