( प्रगत भारत । pragatbharat.com)
Politics Over CM Playing Candy Crush: छत्तीसगढमध्ये विधानसभा निवडणुकीची घोषणा झाली आहे. या निवडणुकीच्या मतदानासाठी अवघे काही दिवस शिल्लक आहेत. असं असतानाच सत्ताधारी आणि विरोधी पक्षाकडून एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न सुरु आहे. मंगळवारी मध्य रात्रीपर्यंत काँग्रेस स्क्रीनिंग कमेटीची बैठक सुरु होती. याच दरम्यान राज्याचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये बैठकीत प्रेझेन्टेशन सुरु असताना मुख्यमंत्री त्यांच्या मोबाईलवर कॅण्डी क्रश खेळताना दिसत आहेत. हा फोटो समोर आल्यानंतर भारतीय जनता पार्टीने मुख्यमंत्र्यांना लक्ष्य केलं आहे. या प्रकरणामध्ये मुख्यमंत्र्यांनी स्वत: ट्वीट करुन प्रत्युत्तर दिलं आहे.
भाजपाने साधला निशाणा
हा फोटो समोर आल्यानंतर भारतीय जनता पार्टीच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी बघेल यांचा हा फोटो शेअर करत त्यांच्यावर टीका केली आहे. “छत्तीसगढचे मुख्यमंत्री भूपेश बघेल निश्चिंत आहेत. त्यांना ठाऊक आहे की कितीही काहीही केलं तर सरकार पुन्हा स्थापन करता येणार नाही. त्यामुळेच त्यांनी काँग्रेस उमेदवार निवडण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीमध्ये लक्ष देण्याऐवजी कॅण्डी क्रश खेळण्यास प्राधान्य दिलं,” असा टोला मालवीय यांनी लगावला आहे. छत्तीसगढ भाजपाचे प्रदेशाध्यक्ष अरुण साव यांनी ट्वीटरवरुन मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे.
मुख्यमंत्र्यांनी दिलं उत्तर
मुख्यमंत्र्यांनी भाजपावर निशाणा साधला आहे. “आधी भाजपाचा विरोध होता की मी गेडीवर का चढतो. मी भोवरा का खेळतो. मी विटी-दांडू का खेळतो. आपल्या राज्यात छत्तीसगढ स्टाइल ऑलम्पिक का होत नाही? काल एका बैठकीच्या आधीचा फोटो काढून व्हायरल करण्यात आला. यामध्ये मी कॅण्डी क्रश खेळताना दिसत आहे. आता भाजपाचा यावरही आक्षेप आहे. खरं तर त्यांना माझ्या अस्तित्वाचाच त्रास आहे. मात्र कोण राहणार आणि कोण जाणार हे छत्तीसगढमधील लोकच ठरवतील. मी गेडीवरही चढणार, विटी-दांडूही खेळणार. कॅण्डी क्रश माझा आवडता खेळ आहे. मी बऱ्याच लेव्हल पार केल्या आहेत. हे सुद्धा मी खेळत राहाणार. बाकी छत्तीसगढच्या लोकांना ठाऊक आहे की कोणाला आशीर्वाद द्यायचा,” असं मुख्यमंत्री बघेल यांनी म्हटलं आहे.
मी कारमध्येही कॅण्डी क्रशच खेळत होतो
“कॅण्डी क्रश खेळणं हा काही गुन्हा आहे का? मी तणावामध्ये राहत नाही. भाजपाचे लोक निवडणूक आल्यावर सक्रीय होतात. मी 5 वर्ष लोकांमध्ये राहून काम केलं आहे. निवडणूक जवळ येत आहेत तसा माझा तणाव कमी होत आहे. प्रचार सुरु झाल्यावर मी तणावमुक्त होईल. मी रोज जेवण झाल्यानंतर कॅण्डी क्रश खेळतो. मला महाराजींनी (टी. एस सिंहदेव यांनी) रात्री भोजनासाठी आमंत्रित केलं होतं. तिथूनच मी बैठकीसाठी गेलो. मी कारमध्येही कॅण्डी क्रशच खेळत होतो. मी बैठक सुरु होण्याआधीची कॅण्डी क्रश खेळत होतो. बैठक सुरु होताच मी मोबाईळ बंद केला. कॅण्डी क्रश खेळलो त्यात अडचण असण्यासारखं काय आहे?” असा प्रतिप्रश्न बघेल यांनी केला आहे.
मैं कोई तनाव नहीं लेता हूँ.
मैं भोजन के बाद Candy Crush खेलता हूँ.कल महाराज साहब @TS_SinghDeo जी के घर भोजन के ठीक बाद हम मीटिंग में गए. मीटिंग शुरू होने से पहले कार से ही मेरा गेम Continue था. pic.twitter.com/yvyoiyLg3O
— Bhupesh Baghel (@bhupeshbaghel) October 11, 2023
सध्या निवडणुकीचं बिगुल वाजलेल्या छत्तीसगडमध्ये कॅण्डी क्रशवरुन सुरु झालेलं हे राजकारण चांगलेच तापले आहे.