‘संसदेत ते दोघं उड्या मारत होते, तसंच….’, अधीर रंजन चौधरी यांनी सांगितलं नेमकं काय झालं?

( प्रगत भारत । pragatbharat.com)

लोकसभेतील कामकाजादरम्यान सुरक्षेतील मोठी त्रूट समोर आली आहे. सभागृहाचं कामकाज सुरु असतानाच 2 तरुणांनी खासदारांच्या बाकांवर उडी मारली. लोकसभेतील काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी सभागृहात नेमकं काय घडलं हे सविस्तरपणे सांगितलं आहे. त्यांनी सांगितलं की, दोन तरुणांनी कामकाज सुरु असतानाच उड्या मारल्या. यानंतर आमच्या सहकाऱ्यांनी त्यांना पकडलं. त्यावेळी कोणताही सुरक्षा कर्मचारी तिथे उपस्थित नव्हता. खासदारांनीच त्या तरुणांना पकडलं.  

अधीर रंजन चौधरी यांनी सांगितलं की, “त्यांच्या हातात जड काही होतं, ज्यामधून गॅस निघत होता. संसदेतील आमच्या सहकाऱ्यांनी त्यांना पकडलं. त्यावेळी तिथे कोणताच सुरक्षारक्षक नव्हता. यानंतर सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्यांना बाहेर काढलं. या घटनेनंतर सभागृह 2 वाजेपर्यंत स्थगित करण्यात आलं”.

ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी सगळा घटनाक्रम उलगडताना सांगितलं की, “अचानक दोन तरुणांनी गॅलरीतून उड्या मारल्या. उडी मारण्याआधी ते खांबाला लटकत होते. एकानंतर दुसऱ्यानेही उडी मारली. यानंतर त्यांनी बाकावरुन उड्या मारण्यास सुरुवात केली. शूज काढल्यानंतर तो कुठे पळू असा विचार करत असतानाच सर्व खासदारांनी त्यांना घेरलं आणि पकडलं. त्यांना पकडल्यानंतर अचानक गॅस येण्यास सुरुवात झाली. पिवळ्या रंगाच्या या गॅसमुळे नाकात जळजळ होत आहे”.

धक्कादायक बाब म्हणजे त्यातील एक तरुण महाराष्ट्राच्या लातूर जिल्ह्यातील असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, याशिवाय संसद परिसराबाहेरही गोंधळ झाला. तिथे हरियाणाच्या एका महिलेने आणि महाराष्ट्रातील अमोल शिंदे या तरुणाने गोंधळ घातला. दोघेही हुकूमशाही चालणार नाही अशा घोषणा दिल्या. संसदेबाहेर पकडलेल्या लोकांच्या हातात स्मॉग गन होत्या, ज्यातून पिवळा धूर निघत होता. या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे दिल्ली पोलिसांचे म्हणणे आहे. या लोकांना आत जाण्याची परवानगी कशी मिळाली हा पहिला प्रश्न आहे. लोकसभेत उड्या मारणारे लोक आणि बाहेर गोंधळ घालणारे लोक यांचा काही संबंध आहे का? या प्रकरणाचाही शोध घेतला जाईल.

 

Related posts