‘या घटनेमागेचा हेतू…’; संसदेतील सुरक्षेबाबत पंतप्रधान मोदींची पहिली प्रतिक्रिया

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Parliament Security Breach : संसदेच्या आवारात आणि लोकसभेच्या सभागृहात धुराच्या नळकांड्या  गोंधळ घातल्याप्रकरणी सहा आरोपींना पोलिसांनी अटक केली. 13 डिसेंबर रोजी संसदेत घडलेल्या या प्रकारानंतर मोठी खळबळ उडाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे संसद हल्ल्याला 22 वर्षे पूर्ण झाल्याची दिवशीच ही धक्कादायक घडना घडली आहे. पोलिसांसह विविध तपास यंत्रणा या प्रकरणाचा अधिक तपास सुरु केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी याप्रकरणी आता महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे.

संसदेच्या सुरक्षेत मोठ्या प्रमाणात गहाळपणा झाल्याच्या घटनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. संसदेच्या संकुलात घडलेली घटना चिंताजनक असून त्याच्या खोलात जाण्याची गरज असल्याचे पंतप्रधान मोदींनी म्हटले आहे. त्यामुळे तपास यंत्रणा या घटनेचा काटेकोरपणे तपास करत आहेत. यासोबतच  राजकीय पक्षांनी या मुद्द्यावर राजकारण करण्यापासून दूर राहण्याचे आवाहनही पंतप्रधानांनी केले आहे. एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत पंतप्रधान मोदींनी याबाबत भाष्य केले आहे.

काय म्हणाले पंतप्रधान?

पंतप्रधान मोदींनी यापूर्वी आपल्या वरिष्ठ मंत्र्यांना लोकसभेतील या सगळ्या प्रकाराची गंभीर दखल घेण्याचे निर्देश दिले आहेत. “संसदेत घडलेल्या घटनेला अजिबात कमी लेखता कामा नये. त्यामुळे सभापती पूर्ण गांभीर्याने आवश्यक ती पावले उचलत आहेत. तपास यंत्रणा काटेकोरपणे तपास करत आहेत. यामागे कोणते घटक आहेत आणि त्यांचे हेतू काय आहेत? त्याच्या खोलात जाणेही तितकेच महत्त्वाचे आहे. उपायही शोधले पाहिजेत. प्रत्येकाने अशा विषयांवर वादविवाद किंवा विरोध टाळावा,” असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

दरम्यान, संसदेत घडलेल्या प्रकारानंतर विरोधी पक्षाने सुरक्षेतील त्रुटींवरून सरकारवर सातत्याने हल्लाबोल केला आहे. विरोधकांनी गेले दोन दिवस सभागृहाचे कामकाज चालू दिलेल नाही. या प्रकरणी प्रथम केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दोन्ही सभागृहात निवेदन द्यावे आणि त्यानंतर संसदेच्या सुरक्षेबाबत चर्चा करावी, अशी विरोधकांची मागणी आहे.

संसदेतील घुसखोरीप्रकरणी दिल्ली पोलिसांच्या हाती महत्त्वाचा सुगावा

संसद भवनाची सुरक्षा भंग करणाऱ्या आरोपीचे राजस्थानसोबत कनेक्शन समोर आले आहे. दिल्ली पोलिसांच्या माहितीनुसार, नागौर जिल्ह्यात आरोपींचे फोन जळालेले आढळले आहेत. मुख्य आरोपी ललित झा याच्या सांगण्यावरून आगीत जळालेले फोन जप्त करण्यात आले आहेत. पुढील तपास करण्यात येत आहे.

Related posts