‘कृपया सोहळ्याला येऊ नका!’, राम मंदिरासाठी लढा उभारणाऱ्या अडवाणी, एम एम जोशींकडे ट्रस्टची विनंती

( प्रगत भारत । pragatbharat.com)

अयोध्येत राम मंदिर उभं राहावं यासाठी लढा उभारणारे भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी आणि मुरली मनोहर जोशी पुढील महिन्यात मंदिराच्या अभिषेक सोहळ्यास अनुपस्थित राहण्याची शक्यता आहे. राम मंदिराच्या विश्वस्त मंडळाने दोन्ही नेते वय आणि आपल्या आरोग्यामुळे हजर राहण्याची शक्यता कमी असल्याची माहिती दिली आहे.  

“दोन्ही नेते कुटुंबातील ज्येष्ठ सदस्य असून त्यांचं वय पाहता न येण्याची विनंती केली आहे. दोन्ही नेत्यांनी ही विनंती स्विकारली आहे,” अशी माहिती राम मंदिराच्या विश्वस्त मंडळाचे सरचिटणीस चंपत राय यांनी प्रसारमाध्यमांना दिली आहे. 

चंपत राय यांनी 22 जानेवारीला अभिषेक सोहळा होणार असून, तयारी पूर्ण जोरात सुरु असल्याची माहिती दिली आहे. तसंच या अभिषेक सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हजर राहणार असल्याचंही सांगितलं आहे. 15 जानेवारीपर्यंत सर्व तयारी पूर्ण होईल. यानंतर 16 जानेवारीपासून प्राणप्रतिष्ठेसाठी पूजा सुरु होईल. ही पूजा 22 तारखेपर्यंत सुरु असणार असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. 

चंपत राय यांनी यावेळी कार्यक्रमासाठी आमंत्रित करण्यात आलेल्या पाहुण्यांची यादी वाचून दाखवली. यावेळी त्यांनी लालकृष्ण अडवाणी, जोशी हे आरोग्य आणि वयामुळे हजर राहू शकणार नाहीत अशी माहिती दिली. लालकृष्ण अडवाणी सध्या 96 तर जोशी 90 वर्षांचे आहेत. 

माजी पंतप्रधान देवेगौडा यांना भेट देण्यासाठी आणि त्यांना समारंभाचे निमंत्रण देण्यासाठी तीन सदस्यीय टीम तयार करण्यात आली आहे, राय म्हणाले, “सहा दर्शनाचे शंकराचार्य (प्राचीन शाळा) आणि सुमारे 150 संत आणि ऋषी आणि समारंभात सहभागी होतील,” अशी माहिती राय यांनी दिली आहे. ते पुढे म्हणाले की या सोहळ्यासाठी सुमारे 4000 संत आणि 2200 इतर पाहुण्यांना आमंत्रित करण्यात आलं आहे.

काशी विश्वनाथ, वैष्णोदेवी यांसारख्या महत्त्वाच्या मंदिरांचे प्रमुख तसंच धार्मिक आणि संवैधानिक संस्थांच्या प्रतिनिधींनाही आमंत्रित करण्यात आलं असल्याची माहितीही त्यांनी दिली. 

अध्यात्मिक नेते दलाई लामा, केरळमधील माता अमृतानंदमयी, योगगुरू बाबा रामदेव, रजनीकांत, अमिताभ बच्चन, माधुरी दीक्षित, अरुण गोविल, दिग्दर्शक मधुर भांडारकर आणि प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी, अनिल अंबानी, प्रसिद्ध चित्रकार वासुदेव कामत, इस्रोचे संचालक निलेश देसाई यासह अनेक मान्यवरांना या कार्यक्रमासाठी आमंत्रित करण्यात आलं आहे, असं राय यांनी सांगितलं.

अभिषेक सोहळ्यानंतर 24 जानेवारीपासून विधी परंपरेनुसार 48 दिवस ‘मंडल पूजा’ होणार आहे. 23 जानेवारीला मंदिर भाविकांसाठी खुले केले जाईल, असं ते म्हणाले आहेत. राय म्हणाले की, अयोध्येत तीनपेक्षा अधिक ठिकाणी पाहुण्यांच्या मुक्कामाची व्यवस्था करण्यात आली आहे. याशिवाय विविध मठ, मंदिरे आणि घरगुती कुटुंबांनी 600 खोल्या उपलब्ध करून दिल्या आहेत.

Related posts