अजित डोभाल म्हणाले, “…तर भारताची फाळणी झाली नसती”; काँग्रेसने कठोर शब्दांत सुनावलं

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Ajit Doval On Subhash Chandra Bose: ‘नेताजी सुभाष चंद्र बोस (Subhash Chandra Bose) भारताला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा जिवंत असते तर भारताची फाळणी झाली नसती,’ असं विधान राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल (NSA Ajit Doval) यांनी शनिवारी केलं. या विधानावरुन काँग्रेसने डोभाल यांच्यावर निशाणा साधला आहे. दिल्लीमध्ये आयोजित असोसिएटेड चेंबर्स ऑफ कॉमर्स अ‍ॅण्ड इंडस्ट्री ऑफ इंडियाच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमामध्ये डोभाल बोलत होते. नेताजी सुभाष चंद्र बोस स्मृती व्याख्यानाच्या पहिल्याच वर्षाच्या कार्यक्रमात डोभाल यांनी हे विधान केलं आहे.

काँग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर…

अजित डोभाल यांनी नेताजींनी आपल्या आयुष्यातील वेगवेगळ्या टप्प्यांवर साहस दाखवल्याचं म्हटलं. तसेच नेताजींनी गांधींना आव्हान देण्याचंही साहस दाखवल्याचंही राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार असलेल्या डोभाल यांनी म्हटलं. “मात्र महात्मा गांधी त्यांच्या राजकीय जीवनामध्ये फार उच्च स्तरावर होते. त्यामुळे त्यांनी (सुभाष चंद्र बोस यांनी) राजीनामा दिला. त्यानंतर काँग्रेसमधून बाहेर पडल्यावर त्यांनी नव्याने संघर्ष सुरु केला,” असं डोभाल यांनी म्हटलं.

नेताजींना जपान सोडून कोणीच साथ दिली नाही

“चांगलं किंवा वाईट यात मला पडायचं नाही मात्र भारताचा इतिहास आणि जागतिक इतिहासामध्ये असे फार कमी लोक आहेत ज्यांनी प्रवाहविरोधात जाण्याची हिंमत दाखवली. हा मार्ग सोपा नाही. ‘मी इंग्रजांविरोधात लढणार, मी स्वातंत्र्यासाठी भीक मागणार नाही. हा माझा अधिकार आहे आणि मला तो मिळवलाच पाहिजे,’ असा विचार त्यांच्या डोक्यात आला,” असंही डोभाल यांनी म्हटलं. असा विचार करणारे नेताजी एकटे होते. यामध्ये त्यांना जपान सोडून इतर कोणीही साथ दिली नाही, असंही डोभाल यांनी यावेळी नमूद केलं.

…तर फाळणी झाली नसती

“सुभाष चंद्र बोस असते तर भारताची फाळणी झाली नसती. जिन्नांनी असं म्हटलं होतं की ते केवळ एका नेत्याचं नेतृत्व स्वीकारतात आणि तो नेता म्हणजे सुभाष चंद्र बोस,” असं विधान डोभाल यांनी भाषणादरम्यान केलं. “एक प्रश्न कायम मनात येतो. जीवनामध्ये आपले प्रयत्न महत्वाचे अशतात की परिणाम… सुभाष चंद्र बोस यांनी केलेल्या प्रयत्नांवर कोणीही शंका घेऊ शकत नाही. गांधीजीही त्यांचं कौतुक करायचे. मात्र अनेकदा लोकांकडे त्यांच्या प्रयत्नांचे काय परिणाम झाले या दृष्टीने पाहिलं जातं. असं असेल तर सुभाष चंद्र बोस यांचे सर्व प्रयत्न व्यर्थ ठरले असं म्हणता येईल का?” असा प्रश्न डोभाल यांनी विचारला.

मोदी पुन्हा या इतिहासाला झळाळी देण्याचा प्रयत्न करत आहेत

“त्यांच्या मृत्यूनंतरही आपण त्यांच्या राष्ट्रवादाच्या विचारांना का घाबरतो, असा मला प्रश्न पडतो,” असंही डोभाल म्हणाले. इतिहास हा नेतांजींबद्दल कायमच निर्दयी राहिला आहे. मात्र पंतप्रधान मोदी या इतिहासाला पुन्हा झळाळी देण्याचा प्रयत्न करत असल्याचं मला समाधान आहे, असंही डोभाल म्हणाले.

काँग्रेसचा हल्लाबोल

डोभाल यांनी केलेल्या विधानांवरुन काँग्रेसने त्यांना लक्ष्य केलं आहे. काँग्रेसचे महासचिव जयराम रमेश यांनी ट्वीटरवरुन या प्रकरणावर भाष्य केलं आहे. “नेताजींनी गांधींना आव्हान दिलं होतं का? नक्कीच त्यांनी दिलं आव्हान दिलं होतं. ते उजव्या विचारसणीचे होते का? नक्कीच होते. नेताजी सेक्युलर होते का? नक्कीच होते आणि यावर ते ठाम होते. नेताजी जिवंत असते तर देशाची फाळणी झाली नसती का? असं सांगता येऊ शकत नाही कारण 1940 पर्यंत नेताजींनी फॉरवर्ड ब्लॉक तयार केला होता. यावर तुमची वेगळी मतं असू शकतात मात्र हा फार विरोधाभास निर्माण करणारा प्रश्न आहे,” असं जयराम रमेश यांनी म्हटलं आहे.

“एक गोष्ट डोभाल यांनी सांगितली नाही. नेताजींचे थोरले बंधू शरत चंद्र बोस यांच्या कठोर विराधानंतरही बंगलाच्या विभाजनाचं समर्थन करणारी व्यक्ती श्यामा प्रसाद मुखर्जी होते. मी डोभाल यांनी रुंद्रांशु मुखर्जी यांचं 2015 मध्ये प्रदर्शित झालेलं पॅरेलल लाइव्ज नावाचं पुस्तकाची प्रत पाठवणार आहे. त्यांनी किमान काही खरा इतिहास जाणून घेतला पाहिजे,” असं टोला जयराम रमेश यांनी लगावला.

Related posts