मोदींना मुस्लिमांसंबंधी प्रश्न विचारल्याने महिला पत्रकार ट्रोल, थेट White House नेच दिलं उत्तर, म्हणाले “हे अजिबात…”

( प्रगत भारत । pragatbharat.com)

White House: पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) अमेरिका दौऱ्यावर (US Tour) असताना त्यांनी व्हाईट हाऊसमध्ये (White House) पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांना भारतातील मुस्लिमांबद्दल (Indian Muslim) विचारण्यात आला होता. दरम्यान हा प्रश्न विचारणाऱ्या पत्रकाराचा ऑनलाइन छळ करण्यात आला. यावर आता थेट व्हाईट हाऊसने प्रतिक्रिया दिली आहे. “हे पूर्णपणे अमान्य असून लोकशाही तत्त्वांच्या विरोधी”, असल्याचं म्हटलं आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या अमेरिका दौऱ्यावर होते. यावेळी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्यासह त्यांनी व्हाईट हाऊसमध्ये संयुक्त पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेत वॉल स्ट्रीट जर्नलच्या (Wall Street Journal) सबरीना सिद्दीकी (Sabrina Siddiqui) यांनी मोदींना भारतातील मुस्लिमांचे आणि इतर अल्पसंख्याकांचे हक्क सुधारण्यासाठी सरकार काय करत आहे? अशी विचारणा केली होती.

नरेंद्र मोदी यांनी या प्रश्नावर उत्तर देताना सांगितलं होतं की, “आमच्या नसांमध्ये लोकशाही वाहते. आमच्या देशात जात, पंथ किंवा धर्माच्या आधारावर भेदभाव करण्यास अजिबात जागा नाही”. 

सोमवारी पत्रकार परिषदेत पत्रकार Kelly O’Donnell यांनी हा भारतातील मुस्लिमांबद्दल प्रश्न विचारणाऱ्या सबरीना सिद्दीकी यांना भारतातील काही लोकांकडून ऑनलाइन छळाला सामोरं जावं लागत असल्याचं सांगितलं. यामधील काही राजकारणी असल्याचीही माहिती दिली. तसंच यावर व्हाईट हाऊसची काय प्रतिक्रिया आहे अशी विचारणा त्यांनी केली. 

“आम्हाला या ऑनलाइन छळाची माहिती आहे.  हे पूर्णपणे अस्वीकारार्ह आहे. आम्ही कोणत्याही परिस्थितीत पत्रकारांच्या कोणत्याही छळाचा पूर्णपणे निषेध करतो आणि हे लोकशाहीच्या तत्त्वांच्या विरोधी आहे ,” असं राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे येथे धोरणात्मक संप्रेषण समन्वयक जॉन किर्बी यांनी सांगितलं. 

पंतप्रधान मोदींना विचारण्यात आला अल्पसंख्यांकांच्या हक्काचा प्रश्न

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी (23 जून) अमेरिकेत पार पडलेल्या पत्रकार परिषदेत मुस्लीम आणि इतर अल्पसंख्याकांच्या हक्कांमध्ये सुधारणा करण्यासाठी सरकारकडून काय पावले उचलली जात आहेत? असं विचारण्यात आलं. त्यावर त्यांनी भारतात भेदभावाला जागा नाही असं उत्तर दिलं होतं. 

“आमच्याकडे लोकशाही आहे. भारत आणि अमेरिकेच्या डीएनएमध्ये लोकशाही आहे. लोकशाही आमच्या आत्म्यात असून आम्ही ती जगतो. आमच्या संविधानातही ती लिहिली आहे. आमच्या देशात जात, पंथ किंवा धर्माच्या आधारावर भेदभाव करण्यास अजिबात जागा नाही”. पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी रात्री अमेरिका आणि इजिप्तच्या दौऱ्यावरुन परतले आहेत. 

Related posts