निवृत्तीच्या आदल्या दिवशी न्यायाधीशांचा रेकॉर्ड; हत्या, बलात्कार ते तब्बल 65 प्रकरणांचा लावला निकाल

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Delhi High Court : दिल्ली उच्च न्यायालयाच्या (Delhi HC) न्यायाधीशांनी कामाच्या शेवटच्या दिवशी तब्बल 65 प्रकणांचा निकाल दिले आहेत. हा एक प्रकारचा रेकॉर्ड असल्याचे म्हटलं जात आहे. न्यायमूर्ती मुक्ता गुप्ता (judge Mukta Gupta) यांनी वेगवेगळ्या खंडपीठांच्या अध्यक्षतेखाली विविध प्रकरणांमध्ये निकाल दिले आहेत. या प्रकरणांमध्ये खून ते बलात्कारापर्यंतच्या प्रकरणातील अपील आणि फाशीच्या कैद्याची शिक्षा 20 वर्षांपर्यंत जन्मठेपेत बदलण्याचा निर्णय यांचा समावेश आहे. न्यायमूर्ती गुप्ता मंगळवारी निवृत्त होत आहेत. त्याआधीच त्यांनी एकाच दिवसात 65 प्रकणांचा निकाल दिले आहेत.

न्यायमूर्ती मुक्ता गुप्ता या उच्च न्यायालयाच्या 14 वर्षांच्या दीर्घ कारकीर्दीनंतर मंगळवारी निवृत्त झाल्या आहे. उन्हाळी सुट्टी सुरू होण्यापूर्वी 2 जून रोजी त्यांना उच्च न्यायालयाने सेवानिवृत्तीचा निरोप दिला असला, तरी सोमवारी म्हणजेच 26 जून रोजी त्यांचा शेवटचा कामकाजाचा दिवस होता. त्याच दिवशी त्यांनी 65 प्रकरणांचा निकाल दिला. न्यायमूर्ती मुक्ता गुप्ता या दिल्ली उच्च न्यायालयाच्या सहाव्या सर्वात वरिष्ठ न्यायाधीश होत्या आणि दिल्ली उच्च न्यायालयाच्या 10 वरिष्ठ न्यायाधीशांपैकी एकमेव महिला न्यायाधीश होत्या. न्यायमूर्ती मुक्ता गुप्ता या दिवाणी आणि फौजदारी प्रकरणातील तज्ञ होत्या.

न्यायमूर्ती मुक्ता गुप्ता यांनी न्यायालयीन सुटीत त्यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठांमध्ये सुरू असलेली अनेक प्रकरणे निकाली काढण्याचे काम केले आहे. सामान्यत: न्यायालयाच्या सुटीच्या दिवशी कोणत्याही प्रकरणात निकाल दिला जात नाही. सुट्टीतील खंडपीठ केवळ ठराविक दिवशी सुनावणीसाठी बसते आणि ते केवळ फक्त तातडीच्या प्रकरणांची सुनावणी करते. असे असतानाही न्यायमूर्ती मुक्ता गुप्ता यांनी कारकिर्दीच्या शेवटच्या दिवशी इतक्या प्रकरणांमध्ये निकाल देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे सोमवारचा दिवस वकिलांसाठी तसेच याचिकाकर्त्यांसाठी दिल्ली उच्च न्यायालयात अत्यंत व्यस्त होता.

कोण आहेत न्यायमूर्ती मुक्ता गुप्ता?

न्यायमूर्ती मुक्ता गुप्ता यांचा जन्म 28 जून 1961 रोजी झाला आणि त्यांचे सुरुवातीचे शिक्षण दिल्लीतील मॉन्टफोर्ट शाळेत झाले. यानंतर, 1980 मध्ये, त्यांनी दिल्ली विद्यापीठाच्या हिंदू कॉलेजमधून लाइफ सायन्सेसमध्ये बॅचलरची पदवी प्राप्त केली. न्यायमूर्ती गुप्ता यांचे वडीलही वकील असल्याने त्यांनी न्यायलयात काम करण्याचा निर्णय घेतला आणि डीयूच्या कॅम्पस लॉ सेंटरमध्ये प्रवेश घेतला. 1983 मध्ये त्यांनी कायद्याचा अभ्यास पूर्ण केला आणि पुढच्याच वर्षी दिल्लीच्या बार कौन्सिलमध्ये प्रवेश घेतला आणि वकिलीची प्रॅक्टिस सुरू केली. 1993 मध्ये त्यांची दिल्ली उच्च न्यायालयात अतिरिक्त सरकारी वकील म्हणून नियुक्ती झाली. यानंतर, ऑगस्ट 2001 मध्ये, त्यांना दिल्ली उच्च न्यायालयात दिल्ली सरकारचे स्थायी वकील (गुन्हेगार) म्हणून नियुक्त करण्यात आले. ऑक्टोबर 2009 मध्ये मुक्ता गुप्ता यांना वकिलावरून न्यायाधीशपदी बढती मिळाली. त्यांची दिल्ली उच्च न्यायालयात अतिरिक्त न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. यानंतर 29 मे 2014 रोजी त्या कायम न्यायाधीश झाल्या. 

वकील म्हणून न्यायमूर्ती गुप्ता यांनी अनेक दिवाणी आणि फौजदारी खटल्यांचे प्रतिनिधित्व केले. 1993 मध्ये त्यांची दिल्ली सरकारने अतिरिक्त सरकारी वकील म्हणून नियुक्ती केली होती. न्यायमूर्ती मुक्ता गुप्ता यांनी जेसिका लाल खून प्रकरण, नितीश कटारा खून प्रकरण आणि नयना साहनी यांसारखे प्रसिद्ध खटले लढवले आणि या हायप्रोफाईल प्रकरणांमध्ये आरोपींना शिक्षा मिळवून दिली.

Related posts