वहिनीसोबत लग्न केल्यानंतर प्रेयसीसोबतही बांधली लग्नगाठ; सत्य समोर येताच एकीला गेलं गायब

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Crime News : बिहारची (Bihar Crime) राजधानी पाटणा (Patna) येथून एक अजब घटना समोर आली आहे. पाटण्याच्या जक्कनपूर परिसरात दोन महिलांशी लग्न करणाऱ्या रिक्षाचालकाने एकीचा खून केल्याचे समोर आले आहे. आरोपी रिक्षाचालकाने आधी स्वतःच्याच वहिणीसोबत लग्न केले होते. त्यानंतर आरोपीने वहिणीसोबतच्या लग्नाची माहिती प्रेयसीला न देता तिच्यासोबतही लग्नगाठ बांधली. मात्र प्रेयसीला रिक्षाचालकाच्या पहिल्या लग्नाची माहिती मिळताच त्याने तिची हत्या केली. त्यानंतर प्रेयसीचा मृतदेह गोणीत बांधून गंगा नदीत फेकून दिला. पोलिसांनी (Bihar Police) याप्रकरणी आरोपी रिक्षाचालकाला अटक केली आहे. 

23 जूनच्या रात्री हा धक्कादायक प्रकार घडला आहे. याप्रकरणी जक्कनपूर पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी आरोपी उमेश पासवान (25) याला अटक केली आहे. तो मूळचा पुनपुन येथील असल्याची माहिती समोर आली आहे. तर आरोपी उमेश पासवान हा पाटण्यातील जक्कनपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जनार्दन गल्लीत भाड्याच्या घरात राहत होता. आरोपीने सुनीता नावाच्या मुलीच्या हत्येनंतर तिचा मृतदेह गोणीत भरला आणि रिक्षाने जेपी सेतू येथे नेत गंगा नदीत फेकून दिला. मृत सुनीताच्या कुटुंबियांनी याप्रकरणी आरोपीविरुद्ध हुंडाळबळीचा गुन्हा दाखल केला होता. उमेशने सुनीताची हत्या करून मृतदेह गायब केला असा आरोपही पालकांनी केला होता. त्यामुळे पोलिसांनी उमेशला अटक केली.

आरोपीने तीन महिन्यांपूर्वीच सुनीतासोबत प्रेमविवाह केला होता. तेव्हापासून उमेश तिच्यासोबत जक्कनपूर येथे भाड्याचे घर घेऊन राहत होता. लग्नानंतर उमेशचे लग्न त्याच्या वहिणीशीसुद्धा झाल्याचे सुनीताला कळले होते. सहा वर्षांपूर्वी उमेशच्या भावाचा मृत्यू झाला होता. त्यानंतर त्याने त्याच्या वहिणीसोबत लग्न केले होते. उमेशची वहिनी तीन मुलांची आई आहे ही माहिती कळताच सुनीताने उमेशला त्याच्या वहिणीपासून दूर राहण्यास सांगितले होते. मात्र त्याने सुनीताचीच हत्या करत तिला शांत केले. हत्येनंतर उमेश जक्कनपूर येथे राहणाऱ्या वहिणीकडे लपला होता.

बरेच दिवस सुनीताच्या कुटुंबियांनी तिला फोन करण्याचा प्रयत्न केला. मात्र तिचा फोन बंद येऊ लागला. बरेच दिवस फोन बंद असल्याने त्यांचा संशय बळावला आणि कुटुंबिय उमेशच्या भाड्याच्या खोलीत पोहोचले. मात्र त्यांना घराचा दरवाजा बंद असल्याचे दिसले. त्याचदरम्यान, कुटुंबियांना उमेशची वहिणी रेल्वे रुळांजवळ भेटली. वहिणीने सुनीता कुठेतरी निघून गेली आहे असे सांगितले. या सर्व प्रकारामुळे सुनीताच्या कुटुंबियांचा संशय आणखी बळावला आणि त्यांनी थेट पोलीस ठाणे गाठून पोलिसांकडे याबाबत तक्रार दाखल केली. 

दरम्यान, तक्रार दाखल होताच पोलिसांनी उमेशला ताब्यात घेत त्याची चौकशी केली. मात्र चौकशीत उमेशने वेगळंच काही सांगितलं.  भांडणानंतर सुनीताने गळफास घेतल्याचे उमेशने पोलिसांना सांगितले. पत्नीला फासावर लटकलेले पाहून मी घाबरलो. भीतीपोटी सुनीताचा मृतदेह गोणीत भरुन गंगेत फेकून दिला, असे उमेशने सांगितले. पोलीस आता या प्रकरणाचा दोन्ही बाजूने तपास करत आहेत.

Related posts