( प्रगत भारत । pragatbharat.com)
Crime News: उत्तर प्रदेशची (Uttar Pradesh) राजधानी लखनऊत (Lucknow) एका छोट्या वादातून ई-रिक्षा चालकाला कारच्या खिडकीला लटकवत तब्बल 2 किमीपर्यंत फरफटत नेण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी बॅरिकेड्स लावून कारला रोखलं. पोलिसांनी आरोपींविरोधात अपहरणासह जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपाखाली गुन्हा दाखल केला आहे.
लखनऊच्या जानकीपुरम परिसरात सत्तार यांचं सलून आहे. याशिवाय यांची ई-रिक्षाही आहे. हर्षित नावाच्या तरुणाला त्यांनी ई-रिक्षा चालवण्यास दिली आहे. रात्री सलून बंद केल्यानंतर हर्षित आणि सत्तार ई-रिक्षाने घरी जात होते. यावेळी एका कारला ई-रिक्षाचा स्पर्श झाला. यामुळे कारमधील तरुणांसह त्यांचा वाद सुरु झाला.
आरोप आहे की, यावेळी कारमधील तरुणांनी शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. सत्तार यांनी शिवीगाळ करु नका सांगितलं आणि कारच्या खिडकीवर हात ठेवून आत बसलेल्या तरुणांना समजावू लागले. दरम्यान, यानंतर काही वेळातच सत्तार यांना समजण्याआधी तरुणांनी त्यांना आत खेचलं आणि गाडी वेगाने पळवण्यास सुरुवात केली.
सत्तार जवळपास दोन किमीपर्यंत कारच्या खिडकीला लटकलेले होते. सत्तार आरडाओरड करत असतानाही आरोपी मात्र त्यांचा हात सोडण्यास तयार नव्हते. त्याचवेळी बिठोली क्रॉसिंगजवळ गस्त घालणाऱ्या पोलिसांना एक व्यक्ती कारच्या खिडकीवर अडकला असून मदतीसाठी ओरडत असल्याचं दिसलं. पोलिसांनी तात्काळ बॅरिकेड्स उभे केले आणि गाडी रोखली.
याचवेळी आरोपींनी सत्तार यांना रस्त्यावर फेकून दिलं आणि पळून जाण्याचा प्रयत्न केला. पण पोलिसांनी घेराबंदी करत कारमधील बृजेश आणि आकाश या दोघा तरुणांना अटक केली आहे. दुसरीकडे रस्त्यावर खाली पडल्याने सत्तार गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून, उपचार सुरु आहेत.
पोलीस उपायुक्त सैय्यद कासीम आब्दी यांनी दिलेल्या माहितीनुसार, ई-रिक्षाचे मालक सत्तार यांनी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली आहे. तक्रारीच्या आधारे बृजेश आणि आकाश यांच्याविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींना अटकही करण्यात आली आहे. याप्रकरणी अधिक तपास केला जात आहे.