“काँग्रेसला पंतप्रधानपदात रस नाही, आपण एकत्र आलं पाहिजे कारण…”; खरगेंचं विरोधकांच्या बैठकीत विधान

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Opposition Meet Mallikarjun Kharge On PM Post: देशात पुढील वर्षी म्हणजेच 2024 साली होणाऱ्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व विरोधी पक्षांची मोट बांधण्याचा प्रयत्न सध्या सुरु आहे. याचसंदर्भात आज काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांनी पंतप्रधान पदासंदर्भात मोठं विधान केलं आहे. काँग्रेस पक्षाला पंतप्रधान पदामध्ये रस नाही असं खरगेंनी म्हटलं आहे. आम्हाला सत्ता किंवा पंतप्रधान पदामध्ये रस नसल्याचं खरगेंनी विरोधी पक्षांच्या बैठकीत म्हटलं आहे. काँग्रेसने विरोधकांना एकत्र येण्यास विरोध असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात होऊ लागल्यानंतर पक्षाकडून आज जाहीरपणे ही भूमिका घेण्यात आली. पहिल्यांदाच काँग्रेसने सत्तेमध्ये इतर पक्ष वाटेकरी म्हणून मान्य असल्याचं अप्रत्यक्षपणे मान्य केलं.

एकट्यासाठी सत्ता मिळवण्याचा हेतू नाही

बंगळुरुमध्ये सोमवारपासून विरोधी पक्षांच्या नेत्यांची बैठक सुरु आहे. या बैठकीच्या दुसऱ्या दिवसाच्या सुरुवातीला दिलेल्या भाषणामध्ये खरगे यांनी, “या बैठकीचा हेतू फक्त स्वत:साठी सत्ता मिळवण्याचा नाही. तर ही बैठक आपल्या संविधानाचं, लोकशाहीचं, धर्मनिरपेक्षतेचं आणि सामाजिक न्यायाचं संरक्षण करण्याच्या दृष्टीकोनातून आयोजित करण्यात आली आहे,” असं म्हटलं.

…म्हणून एकत्र आलं पाहिजे

विरोधी पक्षांमधील काही पक्षांशी मतभेद असल्याचंही खरगे यांनी भाषणादरम्यान मान्य केलं. मात्र हे मतभेद वैचारिक नसल्याचंही त्यांनी म्हटलं. “आपल्यातील मतभेद हे एवढे मोठे नाहीत की आपण त्यांना मागे ठेऊन सर्वसामान्यांसाठी आणि मध्य वर्गीयांसाठी एकत्र येऊ शकत नाही. हे तेच सर्वसामान्य मध्य वर्गीय आहेत ज्यांना आझ महागाईच्या झळा बसत आहेत. आज तरुणांसमोर बेरोजगारीचा मोठा प्रश्न आहे. पडद्यामागे शांतपणे ज्या गरीब, दलित, आदिवासी आणि अल्पसंख्यांचे हक्क चिरडले जात आहेत, त्यांच्यासाठी एकत्र आलं पाहिजे,” असं खरगे यांनी विरोधकांच्या बैठकीला संबोधित करताना म्हटलं.

भाजपाचे नेते घेतात सभा

आज या ठिकाणी 26 पक्ष एकत्र आले आहेत जे 11 राज्यांमध्ये सत्तेत आहेत, असं म्हणत खरगेंनी विरोधकांची ताकद किती आहे हे अधोरेखित करण्याचा प्रयत्न केला. “भाजपाला एकट्याच्या जीवावर 303 जागा मिळवता येणार नाहीत. ते त्यांच्या सहकारी पक्षांच्या मतांचा वापर करतात आणि सत्तेत येतात. त्यानंतर त्या पक्षांना बाजूला करतात. आज भाजपाचे अध्यक्ष आणि नेते प्रत्येक राज्यात राज्यांमध्ये जाऊन सभा आणि रॅली घेताना दिसत आहेत,” असंही खरगे म्हणाले. भाजपाला पराभूत करण्याच्या उद्देशाने आज बंगळुरुमध्ये 26 पक्षांचे नेत्यांची बैठक पार पडली. ईव्हीएम मशीन, लोकसभेमधील जागा वाटप यासारख्या विषयांवर या पक्षांनी चर्चा केल्याचं समजतं.

Related posts