( प्रगत भारत । pragatbharat.com)
China Foreign Minister Missing: चीनचे परराष्ट्रमंत्री चिन गांग (China Foreign Minister Qin Gang) गेल्या 23 दिवसांपासून कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमात दिसलेले नाहीत. यामुळे चर्चांना उधाण आलं असून, वेगवेगळे अंदाज लावले जात आहेत. 57 वर्षीय चिन गांग 25 जूनला शेवटचे दिसले होते. गतवर्षी डिसेंबर महिन्यात परराष्ट्रमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आलेले चिन गांग यांना चीनचे राष्ट्राध्यक्ष क्षी जिनपिंग (China President Xi Jinping) यांचं निकटवर्तीय मानलं जातं.
चिनी सरकारच्या प्रसिद्ध चेहऱ्यांमध्ये गणल्या जाणार्या चिन गँग यांच्या अनुपस्थितीमुळे मुत्सद्दी मंडळींसह चीनवर नजर ठेवणाऱ्यांनाही आश्चर्यचकित करत आहे. चीनमधील सर्वसामान्य नागरिकांनाही याचं आश्चर्य वाटत आहे. सोमवारी चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यांना चिन गांग यांच्याबद्दल विचारण्यात आलं असता, त्यांनी सध्या कोणतीही माहिती दिली जाऊ शकत नाही असं म्हटलं.
चीनमध्ये इतकी मोठी व्यक्ती अचानक गायब झाल्याने काहीतरी काळंबेरं असल्याची शंका व्यक्त करण्यास जागा निर्माण करत आहेत. त्यात परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी उत्तर न दिल्याने भुवया उंचावल्या आहेत.
चीनमध्ये कोणतंही स्पष्टीकरण न देता कोणताही वरिष्ठ अधिकारी इतक्या मोठ्या काळासाठी सार्वजनिकपणे गैरहजर असणं असामान्य गोष्ट नाही. यापूर्वीही अशी अनेक प्रकरणे समोर आली आहेत, ज्यामध्ये असे लोक नंतर गुन्हेगारी तपासात सापडले आहेत. अनेक प्रकरणांत ते काही काळ गायब झाले, पण नंतर ते पुन्हा आघाडीवर आले. यानंतर ते गायब का होते याची माहिती कधीच जाहीर होत नाही.
चिन गांग पक्षाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये गणले जात असल्याने, ते इतका वेळ गायब असणं अनेक प्रश्न उपस्थित करत आहे. गेल्या आठवड्यात चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने प्रकृतीच्या कारणास्तव चिन गांग इंडोनेशियात होणाऱ्या राजनैतिक बैठकीत सहभागी होणार नाही असं सांगण्यात आलं होतं. पण सरकारी वेबसाईटवरुन नंतर ही माहिती हटवण्यात आली होती.
इतकंच नाही तर काही दिवसांपूर्वी चीनचे राष्ट्राध्यक्ष क्षी जिनपिंग आणि फिलिपाइन्सचे राष्ट्राध्यक्ष यांच्यात झालेल्या बैठकीतही चिन गँग दिसले नव्हते. यावेळी वांग यी यांच्यासह परराष्ट्र मंत्रालयाचे इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. चिन गांग बेपत्ता असल्याने तेथील सोशल मीडियावरही प्रचंड चर्चा सुरु आहे. तेथील सर्ज इंजिनवर मोठ्या प्रमाणात त्यांच्या नावे सर्च केलं जात आहे.
अमेरिकन पत्रकाराशी अफेअरच्या चर्चा
चीनच्या सोशल मीडियावर चिन गांगा यांचं अमेरिकेतील चिनी वंशाची पत्रकार फू शियाओशियनशी (Fu Xiaotian) संबंध असल्याची चर्चा सुरु आहे. चीनमध्ये जन्म झालेली आणि केंब्रिजमध्ये शिक्षण घेतलेल्या या टीव्ही अँकरने गतवर्षी नोव्हेंबर महिन्यात एका बाळाला जन्म दिला. चीनचे परराष्ट्रमंत्री सध्या 27 वर्षांचे आहेत. याआधी ते अमेरिकेचे राजदूत होते.
कथित प्रेयसीही बेपत्ता
टीव्ही अँकरशी असणाऱ्या संबंधांमुळेच चिन गांग आणि क्षी जिनपिंग यांच्या नात्यात कटुता आल्याचं बोललं जात आहे. विशेष म्हणजे ही कथित प्रेयसी आणि महिला अँकरही बेपत्ता आहे. या अफेअरमुळे क्षी जिनपिंग यांनी चिन गांग यांना पदावरुन हटवल्याची शक्यता व्यक्त होत आहे. तसंच काहीजण त्यांच्या विवाहबाह्य संबंधांची चौकशी सुरु असल्याचं बोलत आहेत.