भारतीय लष्करातील जवानांना फ्रेंड रिक्वेस्ट का पाठवली? सीमा हैदरचे ATS चौकशीत धक्कादायक खुलासे

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Seema Haider ATS Investigation: पाकिस्तानमधील कराचीमधून भारतात आलेली सीमा हैदर आणि सचिन यांची परिकथेसमान लव्हस्टोरी आता मात्र संशयाच्या भोवऱ्यात अडकली आहे. सीमा हैदर पाकिस्तानच्या सिंध परिसरात असणारं आपलं घर विकून सचिनच्या प्रेमाखातर भारतात आली. यानंतर तिने आपला पती हैदर मारहाण करायचा असे अनेक गंभीर आरोप केले आहेत. पाकिस्तानमध्ये महिलांची स्थिती योग्य नाही असंही तिचं म्हणणं आहे. यादरम्यान सचिन आणि सीमाच्या लग्नाचे फोटोही समोर आले आहेत. भारत आणि पाकिस्तानमधील या लव्हस्टोरीत नेपाळनेही महत्त्वाची भूमिका निभावली आहे. तेथूनच सीमा हैदरने आपल्या मुलांसह भारतात घुसखोरी केली आहे. 

सीमाने नेपाळच्या पशुपतीनाथ मंदिरात लग्न केल्याचा दावा केला होता. नंतर मात्र तिने हॉटेलमध्ये लग्न केल्याचं सांगितलं आहे. त्यामुळे सचिन आणि सीमाचे दावे संशयाच्या भोवऱ्यात आहेत. दरम्यान, नेपाळमधील सत्यस्थितीचा आढावा घेतला असता सीमाने अनेक खोटे दावे केल्याचा संशय निर्माण होत आहे. 

सध्या तरी सीमाने बेकायदेशीरपणे आपल्या 4 मुलांसह सीमा ओलांडत भारतात प्रवेश केल्याचं दिसत आहे. दरम्यान, सीमाला भारताचं नागरिकत्व मिळणार की पाकिस्तानात परत पाठवलं जाणार हे कायदा ठरवणार आहे. पण सीमा मात्र पाकिस्तानात परतण्यास नकार देत आहे. जर पाकिस्तानात परत जायचं असेल तर आपला मृतदेह जाईल असं ती सांगत आहे. दरम्यान एटीएस चौकशीत सीमाला एकूण 7 प्रश्न विचारण्यात आले. ‘आज तक’शी बोलताना तिने या प्रश्नांचा खुलासा केला आहे. 

सीमा हैदरचे ATS चौकशीत धक्कादायक खुलासे, म्हणाली ‘सचिन हा पहिला नाही, त्याच्याआधी…’

 

सीमाने सांगितलं की, एटीएसला माझ्यावर शंका आहे. मी त्यांना सर्व सत्य सांगितलं आहे. दरम्यान नेपाळच्या हॉटेल विनायकमधील 204 नंबर रुममध्ये राहताना चुकीचं नाव का लिहिलं होतं? असं विचारण्यात आलं असता सीमाने हॉटेल कर्मचारी खोटं बोलत असल्याचा दावा केला. “हॉटेलवाले खोटं बोलत आहेत. त्यांनी आमच्याकडून नाव लिहून घेतलं नाही. तिथे नाव लिहिण्याची सक्ती नव्हती. ते आता स्वत:ला वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. ते लोक रोज आमच्याकडून 500 रुपये घेत होते”.

“मी प्रिती नाव लिहिलंच नव्हतं. त्यांनी ना मला माझं नाव विचारलं होतं, ना कधी माझं नाव लिहिलं होतं. सचिननेच त्यांना माझी पत्नी राहायला येईल असं आधी सांगून ठेवलं होतं,” असा सीमाचा दावा आहे.

तुम्हाला पब आणि बारमध्ये जायचं होतं असं हॉटेल कर्मचाऱ्यांनी सांगितल्यासंबंधी विचारलं असता तिने म्हटलं की, “अजिबात नाही, मी कधीच तिथे जाण्यासंबंधी विचारलं नाही. घरात मुलं असताना मला हे कसं काय शक्य होतं? माझ्याकडे फक्त 7 दिवस होते आणि मला परत जायचं होतं. आम्ही हसत-खेळत तिथे राहिलो. तेव्हा माझ्या डोक्यात भारतात येण्याचा विचारही नव्हता”.

“मी गेल्या एक वर्षापासून हिंदू आहे. लोकच मी हिंदू असल्याचं नाटक करत असल्याचं बोलत आहेत. पण मी पाकिस्तानातही मनाने हिंदू होती. पण तिथे मोकळ्यापणे राहू शकत नव्हती. कारण जर मला हिंदू व्हायचं आहे सांगितलं असतं, तर त्यांनी मला जिवंत जाळलं असतं,” असं सीमाने सांगितलं आहे.

भाऊ पाकिस्तानी लष्करात असल्यासंबंधी विचारण्यात आलं असता सीमाने सांगितलं की, “मी अनेकवेळा सांगितलं आहे की, मी आणि सचिन भेटले तेव्हा माझा भाऊ मजूर होता. तो 12 वी पर्यंत शिकला आहे. त्याला काही काम मिळत नव्हतं. वडिलांच्या मृत्यूनंतर तो नोकरीवर लागला. तो एक साधा शिपाई आहे. त्याच्याकडे जितक्या संशयितपणे पाहिलं जात आहे, त्याची गरज नाही. माझा त्याच्याशी संबंध नाही”.

दरम्यान भारतीय लष्करातील जवानांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवण्यासंबंधी विचारण्यात आलं असता सीमाने हे खोटं असल्याचा दावा केला आहे. “अजिबातच नाही, मी तर फेसबुकही वापरत नाही. माझ्याकडे फोनही नाही. माझ्या अकाऊंटला फक्त 5 मित्र होते. सचिन आणि सचिनचे जवळचे मित्र त्यात आहेत. आता मला लाखो लोक रिक्वेस्ट पाठवत आहेत. आता माझं अकाऊंट दुसऱ्याच्या मोबाइलमध्ये लॉग इन असेल तर त्याने स्वीकारली असेल. पण मी कोणालाही फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली नाही. मी फक्त इन्स्टाग्राम वापरते,, ते फेसबुकशी जोडलेलं आहे”

 

Related posts